विद्यार्थी मित्र-मत्रिणींनो, मागील लेखात निबंध या लेखन प्रकाराविषयी चर्चा केली होती. या लेखन प्रकाराचे स्वरूप, वैशिष्टय़े आणि त्यात नेमकेपणा व प्रभावीपणा आणण्यासाठी काय करायचे याविषयी जाणून घेतले. आजच्या लेखात येत्या डिसेंबरमधील मुख्य परीक्षा समोर ठेवून, त्यात केलेले महत्त्वपूर्ण बदल लक्षात घेऊन निबंधाच्या विविध विषयांची तयारी आणि प्रत्यक्ष परीक्षा हॉलमधील नियोजन यासंबंधी काही महत्त्वपूर्ण बाबींचा विचार करणार आहोत. त्यादृष्टीने दोन बाबी लगेचच हाती घ्याव्यात. एक म्हणजे १९९३ पासून २०१३ पर्यंत आयोगाने विचारलेल्या सर्व निबंधांच्या विषयांचे सूत्रबद्ध वर्गीकरण करून पाच-सहा व्यापक विषय तयार करावेत. असा विचार केल्यास अर्थव्यवस्था- वृद्धी आणि विकास तसेच त्यासंबंधी कळीचे मुद्दे, शिक्षण, भारतीय समाज- संस्कृती- मूल्यव्यवस्था, भारतीय राज्यव्यवस्था- शासनप्रक्रिया आणि प्रशासन तसेच प्रसारमाध्यमे, स्त्रीसक्षमीकरण आणि स्त्रियांसंबंधी कळीचे मुद्दे, तात्त्विक विषय, विज्ञान-तंत्रज्ञान- पर्यावरण आणि आंतरराष्ट्रीय कळीचे मुद्दे अशी प्रमुख क्षेत्रे हाती येतात. दुसरी बाब म्हणजे, गेल्या वर्षांभरातील महत्त्वपूर्ण घडामोडींचा विचार करून किमान निबंधाचे १०-१२ संभाव्य व्यापक विषय अधोरेखित करावेत. उदाहरणार्थ- ‘सार्वत्रिक निवडणुका व लोकशाही’, ‘आघाडी शासनाचा अंत’, ‘किमान शासन कमाल कारभार’, ‘सद्य भारतासमोरील आव्हाने’, ‘स्वतंत्र न्यायव्यवस्था व लोकशाही’; ‘वाढती बालगुन्हेगारी’, ‘स्त्रियांची सुरक्षितता’, ‘आरोग्य सुरक्षेची हमी’; ‘वित्तीय समायोजनाचे आव्हान’; ‘पर्यावरणीय संकट, अगतिकता आणि उपाय’, ‘विकास की पर्यावरण द्वंद्व?’, ‘गरज संतुलित व समन्यायी विकासाची’, ‘ऊर्जा संकटाचा सामना’, ‘जागतिक व्यवस्थेसमोरील आव्हाने’, ‘लोकशाहीची नवी लाट’, ‘परराष्ट्र धोरणाचे बदलते स्वरूप’अशा काही महत्त्वपूर्ण विषयांची यादी तयार करता येईल.
उपरोक्त यादीत समाविष्ट केलेल्या विषयासंबंधी विविधांगी माहिती संकलित करावी. त्या विषयाची पाश्र्वभूमी, सद्यस्थिती, त्याचे विविध आयाम, समस्या-आव्हाने, त्यामागील कारणमीमांसा, त्यासंबंधी शासकीय, बिगरशासकीय उपायांचे अवलोकन, संभाव्य उपाय अशी वैचारिक चौकट तयार करून संबंधित विषयाचा अभ्यास करावा. त्यासंबंधी विविध मतमतांतरे, भूमिका, आकडेवारी, प्रयोग, दाखले यांचे संकलन करून त्याचा सूक्ष्मपणे विचार करावा. नियोजनबद्धरीत्या प्रस्तावित विषयावर निबंध लिहावा व तज्ज्ञांकडून तपासून घ्यावा. मागील लेखात म्हटल्याप्रमाणे निबंध लिहिताना ‘आशय’ आणि ‘सादरीकरण’ या दोन्ही बाजूंकडे संतुलित लक्ष दिले जाते याची खातरजमा करावी.
आयोगाने २०१४ सालच्या मुख्य परीक्षेपासून ‘बहुल निबंध विषयाचे लेखन’ असे म्हटल्यामुळे, विद्यार्थ्यांना आता २५० गुणांसाठी, तीन तासांत एकापेक्षा अधिक (कदाचित २ अथवा ३) विषयांवर निबंधलेखन करावे लागणार आहे. स्वाभाविकच अनेक विषय अधोरेखित करून निबंध लेखनाचा सराव वाढवावा लागणार, म्हणजे तयारीची विषयात्मक व्याप्ती वाढवावी लागेल. त्याचप्रमाणे किती निबंध आणि कोणत्या विषयावर लिहायचे आहेत हे प्रत्यक्ष परीक्षा हॉलमध्ये गेल्यानंतर कळणार असल्याने त्यासंबंधी नियोजनाची पूर्वतयारी आत्ताच करावी लागेल. म्हणजे दोन निबंध लिहायचे झाल्यास वेगळे नियोजन, तर तीन विषय दिल्यास आणखी वेगळ्या रीतीने विचार करावा लागेल. याबाबत शब्दमर्यादा ही बाब मध्यवर्ती ठरणार यात शंका नाही. निबंध कदाचित ५०० शब्दांतही लिहावा लागेल अथवा १२५० शब्दांतही. त्यामुळे या दोन्ही प्रकारांची शक्यता लक्षात घेऊन तयारी करायच्या विषयांची यादी वाढवणे, प्रत्यक्ष तयारी करताना नेमकेपणा आणणे आणि लेखनाचा शक्य तेवढा सराव करून नियोजनाचा अंदाज घेणे या बाबी कटाक्षाने पाळाव्या लागतील. थोडक्यात, विद्यार्थ्यांच्या आकलन व लेखन कौशल्याचा वेळेच्या कमतरतेमुळे आणखीनच कस लागणार, यात शंका नाही. अर्थात, वेळीच हाती घेतलेला सराव हेच त्यावरील उत्तम उत्तर! (भाग २)
admin@theuniqueacademy.com
निबंधाची तयारी आणि नियोजन
विद्यार्थी मित्र-मत्रिणींनो, मागील लेखात निबंध या लेखन प्रकाराविषयी चर्चा केली होती. या लेखन प्रकाराचे स्वरूप, वैशिष्टय़े आणि त्यात नेमकेपणा व प्रभावीपणा आणण्यासाठी काय करायचे याविषयी जाणून घेतले.
आणखी वाचा
First published on: 08-09-2014 at 01:04 IST
मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aptitude preparation and planning