उपलब्ध जागेचा इंच न् इंच उपयोगात आणतानाच त्याचे सौंदर्यशास्त्र जपण्याचा प्रयत्न ‘इंटिरिअर डिझायनिंग’मध्ये करण्यात येतो. या क्षेत्राशी संबंधित अभ्यासक्रम आणि व्यवसाय संधींची सविस्तर माहिती-
दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या घरांच्या किमती, वाढत जाणाऱ्या गरजा, कमी-कमी होत जाणारे घरांचे आकारमान, आधुनिकीकरण, राहणीमान अशा अनेक कारणांमुळे इंटिरिअर डिझायिनग ही काळाची गरज झाली आहे. उपलब्ध जागेचा प्रत्येक इंच न इंच उपयोगात आणायचं हे काम स्पेस मॅनेजमेंटचं, स्पेस डिझायनरचं अर्थात् इंटिरियर डिझायनरचं असतं. कमीतकमी जागेत घरातील मालमत्ता जास्तीतजास्त बसविण्याचं कसब त्याच्याकडे असावं लागतं.
इंटिरिअर डिझायॅनिंग ही केवळ कला नसून शास्त्रही आहे. हे शास्त्र शिकण्यासाठी इंटिरिअर डिझायनिंग व डेकोरेशनच्या पदविका अभ्यासक्रमाची निवड करता येऊ शकते.
इंटिरिअर डिझायनिंग व डेकोरेशन पदविका अभ्यासक्रमास (ID, IN) राज्य सरकारची मान्यता असून तंत्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण महामंडळाच्या वतीने हा अभ्यासक्रम महाराष्ट्रातील अनेक केंद्रांतून चालवला जातो. हा अभ्यासक्रम केवळ गृहसजावटीपुरता मर्यादित नसून एकूणच प्रत्येक वास्तूचं अंतरंग वापरानुसार, गरजेनुसार खुलवणं, सजवणं मग ती वास्तू निवासी असो अथवा व्यावसायिक. हे कौशल्य शिकून आत्मसात करता येऊ शकतं. प्रत्येक वास्तूमध्ये सौंदर्याचा साक्षात्कार घडविण्याचं काम हे इंटिरिअर डिझायनरकरवी होत असतं. आर्किटेक्चर तसेच आर्किटेक्चरल असिस्टंटशिप यासारखाच असणारा हा अभ्यासक्रम पूर्णत: अंतर्गत संरचनेवर आधारित आहे.
इंटिरिअर डिझायनिंग व डेकोरेशन पदविका
(ID, IN)
शैक्षणिक अर्हता : किमान ३५ टक्के गुण मिळवून दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांला त्याचा अ‍ॅप्टिटय़ूट बघून या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळू शकतो.
प्रवेश पद्धती : या अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची थेट मुलाखत घेऊन तसेच तंत्रशिक्षण संचालनालयाच्या प्रवेश पद्धतीनुसार प्रथम येणाऱ्यास प्राधान्य याप्रमाणे गुणानुक्रमाप्रमाणे प्रवेश दिला जातो. तंत्रशिक्षणाचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी आवश्यक ते सर्व निकष प्रवेशाच्या वेळी सर्व शैक्षणिक संस्थांमधून लावले जातात.
केवळ दहावी- एस.एस.सी.पर्यंतचे शिक्षण घेऊन ज्यांना व्यावसायाभिमुख अभ्यासक्रम निवडण्याची इच्छा आहे त्यांना ID हा दोन वर्षे पूर्णवेळ कालावधीचा सुमारे ३० वर्षांपासून चालविला जाणारा, पण तरीही सुधारित नवा करिअर मार्ग निश्चितच फक्त उपयुक्त नव्हे तर फायद्याचा ठरेल. दहावीनंतर अवघ्या दोनच वर्षांत हा अभ्यासक्रम पूर्ण करून लगेचच नोकरी-व्यवसायात पदार्पण करता येऊ शकतं. ज्यांना पूर्णवेळ या अभ्यासक्रमासाठी काही कारणामुळे देता येणं शक्य नसेल त्यांना हाच अभ्यासक्रम तीन वर्षांत अर्धवेळ स्वरूपात पूर्ण करण्याची सोय उपलब्ध आहे. पूर्णवेळ अभ्यासक्रमाचा ID, तर अर्धवेळ अभ्यासक्रमाचा IN हा तंत्रशिक्षण महामंडळाने दिलेला कोड आहे. इतर शिक्षण, नोकरी, व्यवसाय करणाऱ्यांसाठी IN हा अर्धवेळ अभ्यासक्रम सोयीचा ठरू शकतो.
प्रवेशप्रक्रिया : केवळ दोन वर्षांमध्ये (ID) तर तीन वर्षांमध्ये (IN) विभागलेल्या या ‘८’ स्कीममध्ये राबविल्या जाणाऱ्या अनुक्रमे पूर्णवेळ व अर्धवेळ अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची प्रक्रिया दहावी (एस.एस.सी.) बोर्डाकडून अंतिम परीक्षांचा निकाल जाहीर केल्यानंतर सुरू होते.
कालावधी : ‘ID’ या अभ्यासक्रम दोन वर्षे पूर्णवेळ कालावधीत करता येतो, तर ‘IN’ या अभ्यासक्रमांतर्गत तीन वर्षे अर्धवेळ याप्रमाणे संपर्कसत्रांचे आयोजन केले जाते. प्रत्येक विषयानुरूप थिअरी व प्रॅक्टिकल्स यांच्या तासांची विभागणी केलेली असते. पण एकूणच प्रॅक्टिकल्सवर जास्त भर दिला जातो. ‘ID’ या अभ्यासक्रमात प्रत्येक आठवडय़ात सुमारे ३१ घडय़ाळी तासांचे वेळापत्रक बनवून संपर्कसंत्रांचे नियोजन केले जाते.
परीक्षापद्धती : राज्य तंत्रशिक्षण महामंडळाच्या परीक्षा विभागाकडून वर्षांतून केवळ एकदाच- उन्हाळी परीक्षा या विषयासाठी- अभ्यासक्रमासाठी घेतल्या जातात. या परीक्षेत अयशस्वी ठरणाऱ्यांसाठी हिवाळी परीक्षा घेतल्या जातात. साधारणपणे या दोन्ही परीक्षांचे अंतिम निकाल तीन ते चार आठवडय़ांमध्ये परीक्षा विभागाकडून जाहीर केले जातात. याशिवाय वर्षभर घेतल्या जाणाऱ्या विविध स्किल टेस्टदेखील अंतिम निकालाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असतात.
अभ्यासक्रम : बेसिक डिझाइन या विषयांतर्गत अंतर्गत संरचनेची मूलतत्त्वे अभ्यासता येतात. या अभ्यासक्रमाचा हा मूळ गाभा आहे. डिझाइन या संज्ञेची फिलॉसॉफी याद्वारे अभ्यासली जाते. ही मूलतत्त्वे अभ्यासत असताना ऱ्हिदम म्हणजे काय? बॅलेन्स मोनोटोनी, सिमेंट्री, अ-सिमेंट्री, कंटिन्युइटी, मासेस, व्हॉइड्स, स्पेस, प्रपोरशन्स, कलर थिअरी, अँथ्रोपोमेट्री अशा विविध अंगांची याद्वारे माहिती होते. रेसिडेन्शियल तसेच कमर्शिअल इंटिरिअर अशा दोन्ही पातळींवर कराव्या लागणाऱ्या डिझायनिंगचा सराव या अभ्यासक्रमाद्वारे करून घेतला जातो. इंटिरिअर डिझायनिंगच्या दृष्टिकोनातून आवश्यक अशा सर्व प्राथमिक तसेच अद्वितीय अशा सव्‍‌र्हिसेस जसे प्लंबिंग, ड्रेनेज, साऊंडप्रूफिंग- रेकॉर्डिग- इन्स्युलेशन, एअरकंडिशनिंग लायटिंग- इलेक्ट्रिकल व थर्मल इन्क्युलेशन, व्हेंटिलेशन सिस्टीम्स, लिफ्ट्स- एस्कलेटर्स, अ‍ॅकॉस्टिकल वर्क इत्यादी बाबींचा तांत्रिक दृष्टीने अभ्यास यात सामावलेला आहे. फर्निचर तसेच इंटिरिअर डिझायनिंग करताना कराव्या लागणाऱ्या प्रत्येक कामाच्या कन्स्ट्रक्शनशी संबंधित सर्व बाजू यासोबत शिकता येतात. आज बाजारात इंटिरिअर मटेरिअल्स रोजच नवनवीन उपलब्ध होत असतात. अशा मटेरिअलच्या संबंधित त्याच्या तांत्रिक बाबींचा अभ्यास करून त्या कोठे, कधी, कशा, किती, का वापरायच्या याचं प्रात्यक्षिकासह सखोल ज्ञान यात मिळतं.
इंटिरिअर डिझायनर व्यक्त होण्यासाठी जी भाषा वापरतो ती म्हणजे ग्राफिकल लँग्वेज. या ग्राफिकल लँग्वेजसाठी या अभ्यासक्रमांतर्गत टू आणि थ्री डायमेन्शनल ड्रॉइंग्ज करायला शिकता येतं.
प्रोफेशनल प्रॅक्टिससारख्या तसेच कम्युनिकेशन आणि पर्सनॅलिटी स्किल्स अशा विषयांद्वारे व्यावसायिक शिक्षण घेता येतं. संपूर्ण अभ्यासक्रम अधिकतर प्रॅक्टिकल स्वरूपाचा असून जोडीला ठरावीक विषयांतर्गत थिअरीचा अभ्यासदेखील करावा लागतो.
करिअर संधी :
हा अभ्यासक्रम करत असताना व्यक्तिगत आवड लक्षात घेऊन एखाद्या विशिष्ट विषयात स्पेशलायझेशन करता येऊ शकतं- जसं रो-हाऊसेस, बंगले, स्टुडिओ अपार्टमेंट, रेस्टॉरंट्स, कॉर्पोरेट ऑफिसेस, शोरूम्स, रिटेल शॉप्स, बुटिक अशा क्षेत्रांमध्ये सेल्फ स्टडीच्या माध्यमातून स्वत:चं एक वेगळेपण निर्माण करता येऊ शकतं. या स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी ते फायद्याचं ठरेल.
सराव, अंतिम परीक्षेचा अभ्यास
या अभ्यासक्रमातील शिकविल्या जाणाऱ्या विषयांमध्ये सर्वाधिक कार्य प्रात्यक्षिके स्वरूपाचं असतं. त्यामुळे वर्षांच्या प्रारंभापासून होणारी सर्व प्रात्यक्षिके वेळोवेळी समजून घेऊन वर्गातच करणे योग्य ठरते. संबंधित शिक्षकांच्या मार्गदर्शनाने तसेच त्यांच्या देखरेखीखाली होणाऱ्या प्रात्यक्षिक कार्याची पूर्तता योग्य तऱ्हेने होऊ शकते. याद्वारे होणारा सरावच अंतिम परीक्षेसाठी उपयोगात येतो. अर्थातच थिअरीचा अभ्यास स्वतंत्रपणे करावा लागतो. संपर्कसत्रांमध्ये शिकवल्या जाणाऱ्या विषयांमध्ये मटेरिअल्ससंबंधित अभ्यास करताना बाजारात उपलब्ध होणाऱ्या नवनवीन मटेरिअल्सची माहिती सतत मिळवत राहावी लागते. त्यामुळे परीक्षेची वाट न बघता दररोज सातत्याने केलेला अभ्यास ‘ID’ तसेच ‘IN’च्या परीक्षेसाठी निश्चितच पुरेसा असतो.
अभ्यासक्रमाद्वारे व्यावसायिक शिक्षण
‘ID’ व ‘IN’ या दोन्ही अभ्यासक्रमात अगदी सुरुवातीपासूनच व्यावसायिक शिक्षण उपलब्ध केलेले आहे. यात कम्युनिकेशन व पर्सनॅलिटी स्किल्स, प्रोफेशन प्रॅक्टिस, मटेरिअल्स व मार्केट सव्‍‌र्हे, एस्टिमेशन अशा विषयांद्वारे त्यांना आवश्यक असे व्यावसायिक शिक्षण मिळत जाते.
उच्चशिक्षणाचे शैक्षणिक पर्याय
इंटिरिअर डिझायनिंग व डेकोरेशन हा पदविका अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर तंत्रशिक्षण महामंडळाचाच एक वर्ष कालावधीचा अ‍ॅडव्हान्स डिप्लोमा अर्थात पोस्ट डिप्लोमा इन इंटिरिअर डिझाइन करता येऊ शकतो. त्याचशिवाय हा पदविका अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण करणारे इंटिरिअर डिझाइनच्या पदवी अभ्यासक्रमाच्या थेट द्वितीय वर्षांच्या प्रवेशासाठी पात्र ठरू शकतात. दूर शिक्षणाच्या माध्यमातून ही पदवी पूर्ण करता येऊ शकते.
व्यावसायिक संधीची ठिकाणे
अलीकडच्या काही वर्षांमध्ये अनेक बांधकाम व्यावसायिक त्यांच्या तयार होणाऱ्या स्किम्समध्ये तयार इंटिरिअर तसेच अत्याधुनिक फर्निचर बनवून घरासोबत फर्निचरचं पॅकेजच देत आहेत. अशा प्रकल्पांसाठी इंटिरिअर डिझाइनरची नेमणूक करावी लागते. तसेच प्रथितयश इंटिरिअर डिझायनर व आर्किटेक्ट यांच्या व्यवसायात त्यांना मदतनीसांची जरुरी भासत असते, अशा ठिकाणीदेखील नोकरीच्या संधी उपलब्ध असतात. पुरेसा अनुभव घेतल्यानंतर स्वत:चा व्यवसाय करणे हे तर केव्हाही शक्य असते. शिक्षण संस्थांमध्येदेखील सुरुवातीला सहव्याख्याता म्हणून नोकरी करता येते. अलीकडच्या काही वर्षांत हे क्षेत्र व्यावसायिकदृष्टय़ा फारच मोठय़ा प्रमाणात विकसित होत गेलं. अंतर्गत रचनेसाठी सल्लागार नेमण्याची व त्याच्याकरवी काम करवून घेण्याची गरज दिवसेंदिवस वाढत गेली. त्यामुळे शहरांप्रमाणेच विकसनशील छोटय़ाछोटय़ा गावांमध्येदेखील इंटिरिअर डिझायनरकडून काम करवून घेण्याची पद्धत सुरू झाली आहे. यावरून एकच महत्त्वाची गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे आणि ती म्हणजे जगाच्या पाठीवर कोठेही जाऊन संधी मिळविण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच इंटिरिअर डिझायनर म्हणून स्वतंत्र ओळख निर्माण करून काम करता येऊ शकतं.
अपेक्षित वार्षिक उत्पन्न
नोकरी करणाऱ्यांना सुमारे रुपये एक लाख ते दोन लाख पन्नास हजार इतके वार्षिक उत्पन्न मिळू शकते. स्वत:चा स्वतंत्र असा व्यवसाय करण्याचे ठरविल्यास किमान रुपये चार ते रुपये सहा लाख उत्पन्न अर्थातच आवश्यक आणि सतत घेतलेल्या मेहनतीवर जरी उत्पन्न ठरत असले तरीही हे शक्य होऊ शकते.
अधिक माहितीसाठी : महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण महामंडळाच्या http://www.msbte.com या संकेतस्थळावर ‘ID’ व ‘IN’ या अभ्यासक्रमासंबंधित सविस्तर माहिती, मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्था, अभ्यासक्रम शुल्क इत्यादी सर्व उपलब्ध आहे.
शैलेश कुलकर्णी
प्राचार्य, महावीर इन्स्टिटय़ूट, पुणे
shakul1011@gmail.com