कोलकात्याचे इंडियन म्युझियम हे संग्रहालय कला, संस्कृती, विज्ञान अशा प्रमुख शाखांमध्ये विभागलेले आहे.  त्या कला, पुरातत्त्वशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, भूशास्त्र आणि मानववंशशास्त्र या सहा उपशाखांविषयीचे माहितीचे भांडार सामावलेले आहे.
भारतीय उपखंडातील आद्य आणि विशाल असे ‘इंडिअन म्युझिअम’ हे वस्तुसंग्रहालय कोलकाता, पार्क स्ट्रीट (पश्चिम बंगाल) येथे सुरुवातीला एशियाटिक सोसायटीच्या इमारतीत उभारण्यात आले. देशाच्या इतिहासाची आणि सांस्कृतिक समृद्धतेची जपणूक करणाऱ्या या संग्रहालयाची स्थापना १८१४ मध्ये बंगालच्या एशियाटिक सोसायटीतर्फे करण्यात आली. खरे तर याच वस्तुसंग्रहालयाच्या निर्मितीपासून आपल्या देशात वस्तुसंग्रहालयांची परंपरा मूळ धरू लागली. सुरुवातीच्या काळात हे एशियाटिक सोसायटी म्युझियम, अथवा इम्पेरिअल म्युझियम या नावाने ओळखले जात असे.
इंडियन म्युझियम कला, संस्कृती, विज्ञान अशा प्रमुख शाखांमध्ये आणि कला, पुरातत्त्वशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, भूशास्त्र आणि मानववंशशास्त्र अशा सहा उपशाखांमध्ये विभागलेले आहे. हे फक्त एक संग्रहालय नसून एक स्वयंपूर्ण संस्था आहे. प्रदर्शनीय संग्रहांचे जतन आणि पुनरुज्जीवन यासाठी संग्रहालयात स्वतंत्र विभाग चालवला जातो. येथे वेगळा प्रकाशन विभागही कार्यरत आहे. कर्मचारीवर्गासाठी आरोग्य प्राथमिक सेवा विभाग आहे.
केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या अखत्यारीतील या संग्रहालयाच्या कार्यालयीन कामकाजावर ‘डायरेक्टोरेट ऑफिस ऑफ इंडिअन म्युझिअम’ यांचा अंकुश असतो. आपण संग्रहालयातील वैशिष्टय़पूर्ण दालनांची ओळख करून घेऊ.
पुरातत्त्वशास्त्र दालन : या दालनात हडप्पा संस्कृतीची ओळख सांगणाऱ्या काही पुरातन वस्तू जतन केल्या आहेत. मौर्य आणि संगकालीन शिल्पकृतींचे नमुने आहेत.
बुद्ध धर्मासंदर्भातील कलादालन : संगकालीन बुद्ध शिल्प आणि बुद्ध स्तूप यांचे अवशेष या दालनात जतन केले आहेत.
गांधार कलादालन : शिल्पकलेचे गांधार शैलीतील नमुने येथील दालनात संग्रहित आहेत.
पुरातत्व दालन : या दालनात दुसऱ्या शतकापासून बाराव्या शतकापर्यंतच्या काळातील कुशाण, गुप्त, पाला-सेना, चान्देल्ला, होयसळ, चोळ या राजांच्या काळातील शिल्पकृती पाहायला मिळतात.
नाणी संग्रह : या संग्रहालयात ५२ हजारांहून अधिक दुर्मीळ नाण्यांचा वैशिष्टय़पूर्ण संग्रह आपल्याला पाहायला मिळतो. ख्रिस्तपूर्व चौथ्या-पाचव्या शतकापासून ते आजपर्यंत भारतीय उपखंडातील नाणी काही मूळ स्वरूपात तर काहींच्या प्रतिकृती पाहायला मिळतात.
कलादालन : पुरातन काळातील काही शिल्पकृती, टेराकोटा शिल्पकृती, मध्य आशिया, दक्षिण-पूर्व आशिया या भागातील पुरातन कलावस्तू येथे पाहायला मिळतात. येथील प्रमुख आकर्षण म्हणजे जतन केलेले गौतम बुद्धाच्या हाडांचे दोन पुरावशेष.
इजिप्शियन कलादालन : इजिप्तच्या कलाइतिहासाची ओळख करून देणारे पुरातन नमुने या दालनात समाविष्ट करण्यात आले आहेत. यात ‘इजिप्शिअन ममीज’चाही अंतर्भाव करण्यात आला आहे. पर्यटक आणि कला रसिक यांच्यासाठी हे दालन आकर्षणाचे प्रमुख केंद्र ठरते.
तळमजल्याच्या मार्गिकांमध्ये भारताच्या पूर्वेकडील प्रदेशांतील मध्ययुगीन काळातील कलेचे अवशेष, जीवाश्म तरू, जीवाश्म, संग्रहालयाच्या बागेत ठेवलेले बिहारमधील स्तूप आणि सुंदर कोरीव काम केलेले नक्षीदार खांब या दर्शनीय कलावस्तू आहेत.
चित्रकला विभाग
मुघल चित्रकला : या कलादालनात पíशयन शैलीतील लघुचित्रे, मुघल, राजस्थान, पहारी, दक्खनी, तलचित्रे पाहायला मिळतात.
बंगाल चित्रकला : यांत भूर्जपत्रावरील, कागदावरील चित्रकला नमुने पाहायला मिळतात. त्याचबरोबर एकोणिसाव्या, विसाव्या शतकातील बंगालमधील नवचित्रकला तसेच अबनिन्द्रनाथ टागोर, नंदलाल बोस, सुनयनी देवी, जमिनी रॉय या कलावंतांची चित्रे, काही पुरातन पटचित्रे, शिलालेख पाहायला मिळतात.  
शोभेच्या कलावस्तू आणि वस्त्रदालन
या दालनात दुर्मीळ आणि सौंदर्यपूर्ण कलावस्तू संग्राहित केल्या आहेत. मातीकाम, धातूकाम, चांदी, तांबे, हस्तिदंत यापासून बनलेल्या शोभेच्या वस्तू येथे पाहता येतील. पिढय़ान्पिढय़ा या कला जोपासलेल्या कारागिरांची ही करामत, त्यांचे नपुण्य नक्कीच उल्लेखनीय म्हणावे लागेल.
वस्त्रदालनातील वस्त्रप्रावरणे प्रामुख्याने सुती, रेशमी आहेत. काश्मिरी शाली, पंजाबची फुल्कारी चादर, काठियावाडची सिसेदार, चंबाचे रुमाल, बनारसी साडय़ा, ढाका, बंगाल, हैदराबाद इथले वैशिष्टय़पूर्ण साडीप्रकार, गालिचे, सतरंज्या असे अनेक प्रकार येथे पाहता येतात.
दक्षिण पूर्व आशिया कलादालन
या संग्रहालयात फक्त भारतातीलच नव्हे तर चीन, जपान, जावा-कंबोडिया, म्यानमार, नेपाळ येथील धातू, लाकूडकाम, काचकाम, हस्तिदंत यापासून बनलेल्या वैविध्यपूर्ण वस्तू मांडण्यात आल्या आहेत.
मानववंशशास्त्र विभाग
या विभागात मानवाची उत्क्रांती अवस्था विशद करणारे तक्ते, प्रतिकृती, अश्मयुगीन मानव ते मूलभूत गरजा भागवण्यासाठी मानवाने लावलेले निरनिराळे शोध, उपलब्ध साधनांतून निर्माण केलेली आयुधे, उपकरणे आणि शिकारी अवस्थेपासून निर्मितीक्षम शेतकरी अवस्थेपर्यंतचा मानवाच्या प्रगतीचा अभ्यास दिसतो.
मानववंशशास्त्र – सांस्कृतिक दालन : या दालनात देशाच्या विविध प्रांतांमधील निरनिराळ्या सांस्कृतिक परंपरा, भाषिक, आíथक, व्यावहारिक वैविध्य यांचे दर्शन घडवण्याचा प्रयत्न दिसून येतो.  
मुखवटे दालन : या दालनातील प्रदर्शनीय मुखवटे देशाच्या विविध प्रांतांच्या लोककलेचे आणि संस्कृतीचे प्रतिनिधित्व करतात. पश्चिम बंगाल, ओडिसा, कर्नाटक, शिवाय न्यू गिनी तसेच आपले शेजारी राष्ट्र भूतान आणि न्यू गिनी येथील मुखवटेही या संग्रहात समाविष्ट करण्यात आले आहेत. मानवी भावनांचे प्रगटीकरण प्रभावीपणे करण्यासाठी मुखवटय़ांचा माध्यम म्हणून उपयोग केलेला दिसतो. मुखवटे बनवण्याच्या पारंपरिक लोककलेची तोंडओळखही या दालनातून होते.
वाद्य दालन : देशाच्या अभिजात संगीत परंपरेचा महत्त्वाचा भाग म्हणजे संगीत वाद्य्ो. सतराव्या-अठराव्या शतकात वापरली गेलेली वाद्य्ो या दालनात संग्राहित करण्यात आली आहेत.
विज्ञान विभाग
भूगर्भ विभाग : या विभागात पृष्ठवंशीय-अपृष्ठवंशीय प्राण्याची जीवाश्मे, अतिप्राचीन काळात अस्तित्वात असलेले दगड, मृदा, क्षार, उल्कापातात जमिनीवर सापडलेल्या उल्कांचे अवशेष यांचे नमुने जतन करण्यात आले आहेत.
प्राणिशास्त्र विभाग : या विभागात मत्स्य दालन, उभयचर- सरपटणारे प्राणी, सस्तन प्राणी, कीटक, पक्षी, पर्यावरण अशी सहा दालने आहेत.
वनस्पतीशास्त्र विभाग : या विभागात भारतीय वनस्पतींची ओळख करून देणारी कायमस्वरूपी दालने आहेत. याद्वारे लाकूड निर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या वनस्पती, अन्नधान्य, औषधी वनस्पती, वस्त्रनिर्मिती, तेलबिया, रंग निर्मिती व्यावसायिक आणि घरगुती लागवडीच्या वनस्पती यांची माहिती मिळते.
तसेच चहा निर्मिती, वनस्पतीपासून कागद निर्मिती, रेशीमनिर्मिती, तेलबिया विभागात वनस्पतींपासून इंधनाचे तेल, खाद्य तेल, याची विस्तृत माहिती होते. याव्यतिरिक्त ऊस, गहू उत्पादनाची माहितीही उपलब्ध आहे.
इंडिअन म्युझियमच्या विस्तृत पसाऱ्यातून माहिती आणि मनोरंजन यांचा मेळ उत्तम प्रकारे साधलेला दिसून येतो.
पत्ता : इंडिअन म्युझिअम, २७, जवाहरलाल नेहरू रोड, पार्क स्ट्रीट एरिया, कोलकाता, पश्चिम बंगाल- ७०००१६
वेळ : सकाळी १० ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत (मार्च ते नोव्हेंबर)/ संध्याकाळी साडेचार वाजेपर्यंत (डिसेंबर ते फेब्रुवारी) सोमवार आणि सुट्टीच्या दिवशी संग्रहालय बंद राहील.    
geetazsoni@yahoo.co.in

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा