लॉटरी म्हणजे पैसे मिळविण्यासाठी नशीब आजमावण्याचा समाज आणि सरकारमान्य जुगार मानला जातो. याकडे पाहण्याचा दृष्टिकोन मात्र फारसा बरा नाही. मात्र अमेरिकेतील काही राज्यांनी या व्यवस्थेचा शिक्षणासाठी निधी उभारणारी यंत्रणा म्हणून वापर सुरू केला.

गेल्या दहा ते बारा वर्षांत ‘नॉर्थ कॅरोलिन एज्युकेशन लॉटरी’द्वारे कोटय़वधी डॉलरचा निधी शिक्षणावर खर्च करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. आपल्या देशात जशा विविध राज्य सरकारच्या लॉटरी मंडळांकडून विविध सणांनिमित्ताने लखपती आणि करोडपती बनवून देणारी बक्षिसे जाहीर केली जातात तसेच याचेही स्वरूप असते. मात्र त्यातील विधायक भाग हा असतो की तिकिटांच्या विक्रीतील ३० टक्के रक्कम सरकारच्या शिक्षण खर्चाला मदत म्हणून राखून ठेवली जाते.

दोन हजारच्या दशकात येथील शिक्षण विभाग मोठय़ा आíथक अडचणींचा सामना करीत होता. राज्यातील अर्थसंकल्पामध्ये शिक्षणासाठी राखीव निधी विविध योजना आणि उपक्रमांना पुरत नव्हता. तसेच काही काळानंतर मूलभूत खर्चात झालेली वाढ यामुळे निधी पुरवायचा कसा, हा प्रश्न निर्माण झाला होता. यावर उपाय म्हणून एका लोकप्रतिनिधीने लॉटरीद्वारे शिक्षणासाठी निधी जुळवायची कल्पना सुचविली आणि २००५मध्ये या राज्याने कायदा करून लॉटरीतील पसा शिक्षणनिधी उभारण्यासाठी वापरण्याचे जाहीर केले. सुरुवातीला या योजनेची खिल्ली उडविण्यात आली. मात्र चांगल्या कामासाठी मदत या भावनेतून या एज्युकेशन लॉटरीला तुफान प्रतिसाद मिळायला लागला. अलाबामा, अलास्का, नेवाडा आणि आणखी काही राज्यांनी हा कित्ता गिरवला आणि अशा प्रकारे मोठी मदत होऊ शकते, हे सिद्ध करून दाखविले. गेल्या आठवडय़ामध्ये लॉटरीच्या व्यवहाराचे या वर्षांतील तपशील जाहीर झाले तेव्हा तो मोठय़ा बातमीचा भाग झाला होता. या वर्षांत या यंत्रणेने तब्बल ६७.७ कोटी डॉलर इतका निधी शिक्षणासाठी उभा केला. गेल्या तेरा वर्षांतील हा विक्रमी निधी होता. लॉटरीला सरकार प्रोत्साहन देते. त्यात नशीबवानाच्या वाटेला बक्षिसाची रक्कम येत असली, तरी तिकीट खरेदी करणाऱ्या लाखोंचा भ्रमनिरास होतो. अर्थात आपल्याला लॉटरी जरी लागली नाही तरी आपला पैसा चांगल्या कारणासाठी खर्च होणार, ही जाणीव बक्षीस न मिळालेल्या बहुतेकजणांना सुखावते. परिणामी या लॉटरीची विक्री मोठय़ा प्रमाणावर होते. या लॉटरीच्या निधीतील ७० टक्के निधी बक्षिसासाठी वापरला जात असल्याने त्याची रक्कमही घसघशीत असते. लॉटरीतून शिक्षण व्यवस्थेची आíथक बाजू मजबूत करणाऱ्या या राज्याने जगासमोर एक वेगळेच उदाहरण ठेवले आहे.

संकलन – रसिका मुळ्ये