संस्थेची ओळख – ‘नालंदा’ या नावावरून अभ्यासकांच्या डोळ्यासमोर उभी राहते ती, भारतातील विद्यापीठीय शिक्षणाची ऐतिहासिक परंपरा. याच परंपरेला पुनरुज्जीवित करण्याचे काम नालंदा विद्यापीठाच्या उभारणीच्या माध्यमातून सुरू झाले आहे. आंतरराष्ट्रीय सहकार्यातून सुरू झालेले आणि आंतरविद्याशाखीय दृष्टिकोनाला चालना देणारे अभ्यासक्रम, संशोधनावर भर देणारे पदव्युत्तर शिक्षण, केंद्र सरकारने दिलेला ‘इन्स्टिटय़ूशन ऑफ नॅशलन इम्पॉर्टन्स’चा दर्जा अशा वैशिष्टय़ांसह हे विद्यापीठ सुरू झाले आहे. देशातील केंद्रीय विद्यापीठांच्या यादीमध्ये ते तुलनेने अगदी नवे विद्यापीठ म्हणावे लागते. मात्र, विद्यापीठाच्या नावामागचे ऐतिहासिक महत्त्व आणि जवळपास १७ देशांच्या सहकार्याने प्रादेशिक पातळीवरील विद्यापीठाची होत असलेली उभारणी पाहता, देशातील शैक्षणिक क्षेत्रातील एक अभिनव प्रयोग म्हणूनच बिहारमधील हे विद्यापीठ स्वत:ची एक नवी ओळख निर्माण करत आहे. विद्यापीठाचे https://www.nalandauniv.edu.in हे संकेतस्थळ सध्या या विद्यापीठाची जगाला ओळख करून देऊ पाहात आहे.

भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी २००६ साली बिहार विधिमंडळामध्ये मार्गदर्शन करताना नालंदा विद्यापीठाची गौरवशाली परंपरा पुन्हा नव्याने सुरू करण्याचा मुद्दा मांडला होता. ऐतिहासिक नालंदा विद्यापीठाचे महत्त्व आणि वारसा विचारात घेत, त्याच दर्जाचे जागतिक पातळीवरील एक शैक्षणिक केंद्र म्हणून विद्यापीठ स्थापन व्हावे, त्यासाठी व्यापक प्रयत्न करावेत, असे आवाहन डॉ. कलाम यांनी केले होते. तदनंतरच्या काळामध्ये बिहार सरकारने विद्यापीठ स्थापनेसाठी सुरू केलेल्या प्रयत्नांना आता मूर्तस्वरूप येऊ लागले आहे. केंद्र सरकारने २०१० साली नालंदा विद्यापीठाच्या स्थापनेसाठीचा कायदा केला. या कायद्याच्या आधारे स्थापन झालेल्या विद्यापीठामार्फत सप्टेंबर २०१४ पासून बिहारमधील राजगीर येथून प्रत्यक्ष शैक्षणिक कार्याला सुरुवात झाली. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या नव्हे, तर परराष्ट्रसंबंध मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली चालणारा या विद्यापीठाचा कारभार हे या विद्यापीठाचे इतर केंद्रीय विद्यापीठांच्या तुलनेमध्ये असणारे महत्त्वाचे वेगळेपण ठरते.

शैक्षणिक संकुल – बिहारमध्ये मूळ नालंदा विद्यापीठापासून १५ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या राजगीर परिसरामध्ये साडेचारशे एकर जागेमध्ये विद्यापीठाच्या मुख्य शैक्षणिक संकुलाच्या उभारणीचे काम सुरू आहे. बिहार राज्य सरकारने २०२० पर्यंत या परिसरामध्ये अत्याधुनिक शैक्षणिक सुविधांनी परिपूर्ण अशा संकुलाची उभारणी करण्यासाठीचे प्रयत्न सुरू केले आहेत. विद्यापीठामध्ये सध्या उपलब्ध असलेले सर्व अभ्यासक्रम हे निवासी पद्धतीनेच चालविले जातात. प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना वसतिगृहाची सुविधा उपलब्ध आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यांना वातानुकूलित खोल्यांचे पर्यायही उपलब्ध करून देण्यात आले आहेत. दिल्लीमधील विद्यापीठाच्या स्वतंत्र कार्यालयातून विद्यार्थी, संशोधक आणि परदेशातून विद्यापीठामध्ये येणाऱ्या प्राध्यापक-अभ्यासकांच्या गरजेनुसार योग्य त्या सुविधा पुरविण्यासाठी काम केले जात आहे.

अभ्यासक्रम – विद्यापीठ स्थापनेपासूनच आंतरराष्ट्रीय सहकार्याद्वारे शिक्षण आणि संशोधनाच्या विकासासाठी सातत्यपूर्ण काम करण्याचे उद्दिष्ट विचारात घेण्यात आले आहे. त्याआधारे पुरातन भारतीय ज्ञानपरंपरेला आधुनिक ज्ञान-विज्ञान शाखांची जोड देण्याचे काम या विद्यापीठामध्ये सुरू झाले आहे. ज्ञानाच्या माध्यमातून भारताला जगाशी जोडणारे एक केंद्र म्हणून या विद्यापीठाचा विकास करण्यासाठी विद्यापीठ स्थापनेवेळी या विद्यापीठात सात वेगवेगळ्या स्कूल्स उभारण्याचा विचार मांडण्यात आला आहे. सध्या त्यापकी स्कूल ऑफ इकॉलॉजी अँड इन्व्हायर्न्मेंटल स्टडीज, स्कूल ऑफ हिस्टॉरिकल स्टडीज, स्कूल ऑफ बुद्धिस्ट स्टडीज, फिलॉसॉफी अँड कम्पॅरेटिव्ह रिलिजन्स आणि स्कूल ऑफ लँग्वेजेस अँड लिटरेचर- ह्य़ुमॅनिटिज या चार स्कूल्समधून प्रत्यक्ष शैक्षणिक अभ्यासक्रम सुरू झाले आहेत.

स्कूल ऑफ इकॉलॉजी अँड इन्व्हायर्न्मेंटल स्टडीजअंतर्गत एम.ए. किंवा एम.एस्सी.चा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. त्याअंतर्गत विद्यार्थ्यांना ह्य़ुमन इकॉलॉजी, हायड्रोलॉजी, कोस्टल अँड मरिन स्टडीज, डिझास्टर मॅनेजमेंट, फूड अँड अ‍ॅग्रिकल्चर, क्लायमेट चेंज अँड एनर्जी स्टडीज आदी विषयांचे अध्ययन करण्याची संधी उपलब्ध आहे.

स्कूल ऑफ हिस्टॉरिकल स्टडीजमध्ये प्रत्यक्ष अनुभव आणि संशोधनाधारित अध्ययनावर भर देणारा पदव्युत्तर अभ्यासक्रम चालतो. त्याअंतर्गत विद्यार्थ्यांना आपापल्या आवडीच्या विषयामधील संशोधनाला चालना देण्याची संधीही मिळते. या अभ्यासक्रमामध्ये आशियाई आणि आशियाबाहेरील जगाच्या इतिहासावर भर देण्यात आला आहे. आशियाई देशांमधील आंतरसंबंध, आíथक इतिहास, कलेचा इतिहास, विज्ञानाचा इतिहास, पूर्वेकडील नागरीकरण, दक्षिण आशियाचा सांस्कृतिक इतिहास इत्यादी विषयांशी संबंधित वैकल्पिक विषय निवडण्याची संधी विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमांतर्गत उपलब्ध आहे.

स्कूल ऑफ बुद्धिस्ट स्टडीज, फिलॉसॉफी अँड कम्पॅरेटिव्ह रिलिजन्समध्ये बौद्ध तत्त्वज्ञानाच्या परंपरांचा आंतरविद्याशाखीय दृष्टिकोनातून अभ्यास करण्यासाठीचा पदव्युत्तर अभ्यासक्रम चालतो. त्याद्वारे सामाजिक- ऐतिहासिक- सांस्कृतिक दृष्टिकोनातून संशोधनाला चालना देण्याचा विद्यापीठाचा प्रयत्न आहे. बौद्ध तत्त्वज्ञानाचा प्रसार, कला आणि साहित्य, आशियामधील बौद्ध तत्त्वज्ञानाचा पाठपुरावा करणाऱ्या पुरातत्त्वीय वास्तू व ठिकाणांचा अभ्यास, इतर संस्कृतींमधून उमटणारे बौद्ध तत्त्वज्ञानाचे प्रतििबब आदी बाबींचा दोन वर्षांच्या कालावधीमध्ये सखोल अभ्यास आणि संशोधन करण्याची संधी हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देतो.

स्कूल ऑफ लँग्वेजेस अँड लिटरेचर – ह्य़ुमॅनिटीज या माध्यमातून भाषांच्या क्षेत्रामध्ये रुची असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भाषांतर आणि विविध भाषांचे ससंदर्भ आकलन या दोन मुद्दय़ांवर भर देणारे अभ्यासक्रम उपलब्ध करून दिले जात आहेत. सध्या या विभागामध्ये जपानी, कोरियन आणि संस्कृतविषयक एक वर्षांचा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम चालतो. त्याआधारे विद्यार्थ्यांना सध्या पाली, तिबेटियन, इंग्रजी आणि िहदी या भाषांचे अध्ययन करण्याची संधी उपलब्ध आहे. त्याआधारे इतर भाषांचे सांस्कृतिक संदर्भ, संबंधित भाषांमधील साहित्याचे िहदी किंवा इंग्रजीमध्ये योग्य पद्धतीने भाषांतर आणि त्यांचे ससंदर्भ आकलन, भाषांतर आणि अन्वयार्थ लावण्याच्या प्रक्रिया, लिखित तसेच बोलीभाषेविषयीचे संशोधन, संस्कृती- इतिहास- धर्माच्या संदर्भाने संबंधित भाषांचा होत गेलेला विकास आदी मुद्दय़ांचा आढावा घेणे शक्य आहे.

borateys@gmail.com

Story img Loader