प्रा. रवींद्र कुलकर्णी
पदवीच्या शेवटच्या वर्षांला असताना पंकजचे वडील अचानक निवर्तले आणि त्याला त्याचे शिक्षण सोडून कुटुंबाला जगविण्यासाठी नोकरी धरावी लागली, सुमनचे चौदावीला असताना लग्न ठरले आणि तिला शिक्षण सोडावे लागले, व्यंकटेशला गणित अवघड वाटायचे म्हणून त्याला कला शाखेत प्रवेश घ्यायचा होता पण वडिलांच्या आग्रहापोटी त्याला विज्ञान शाखेकडे जावे लागले आणि तो प्रथम वर्ष नापास झाला. ह्या आणि अशा शेकडो घटना आपल्या अवतीभवती घडत असतात. त्यामुळे हव्या असलेल्या शिक्षणापासून दूर जावे लागते. मंदारला अमेरिकेत पदव्युत्तर शिक्षणासाठी जायचे होते पण तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम त्यासाठी पुरेसा नव्हता. अशा शैक्षणिक अडचणी भारतीय तरुणांसमोर उभ्या होत्या. यात परिवर्तन घडणे आवश्यक होते.
भारतीय शिक्षण क्षेत्रामध्ये आवश्यक असे आमूलाग्र परिवर्तन करण्यासाठी आणि जागतिक दर्जाचे शिक्षण देण्यासाठी ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०’ची आखणी करण्यात आली. आंतरराष्ट्रीय स्तराप्रमाणे विविध पदव्यांना वा पदव्युत्तर शिक्षणात लवचीकपणा (flexibility), बहुविध प्रवेश-निर्गमन (multiple entry and exits) व श्रेयांकीकरण ( creditisation) करण्याकरिता तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासासाठी पूरक ठरेल अशा प्रकारचे सर्वंकष आणि बहुविद्याशाखीय शिक्षण राष्ट्रीय धोरण प्रस्तावित केले आहे. नव्याने विकसित होत असणाऱ्या विविध व्यावसायिक क्षेत्रांसाठी नव्या पिढीला जोडणारे आणि त्यांच्यामधील व्यावसायिक क्षमता आणि नव्या उद्योगासाठी आवश्यक असलेली कौशल्ये आत्मसात करण्यासठी या शिक्षणाचा उपयोग होऊ शकतो. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची घोषणा झाल्यानंतर विद्यापीठ अनुदान आयोग ( वॅउ) ने मोठय़ा प्रमाणात बदल घडवून आणण्यास प्रारंभ केला; पण कोविड महामारीने २०२१ मध्ये बदलांच्या वेगाला अनपेक्षित खीळ घातली. परिणामी, २०२२ मध्ये या धोरणास अनुषंगिक असे बदल घडवण्यास खरी वेगवान सुरुवात झाली. प्रस्तुत सदरामध्ये विद्यार्थी, पालक, शिक्षक, शिक्षणसंस्था, महाविद्यालये, विद्यापीठे अशा सर्व संबंधित घटकांना शिक्षण मंत्रालय, भारत सरकार, विद्यापीठ अनुदान आयोग ( वॅउ) आणि महाराष्ट्र शासन यांनी वेळोवेळी निर्देशित केलेले, या धोरणामधील विविध नियम, निर्देश आणि मार्गदर्शक तत्त्वे याबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न केला जाईल. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबद्दल अनेकांच्या मनात संभ्रम आहे तो दूर करण्याचा आमचा विचार आहे. तीन/चार वर्षांचा पदवी पातळीवरचा बहुविद्याशाखीय अभ्यासक्रम, पाच वर्षांचा एकात्मिक पदव्युत्तर अभ्यासक्रम, त्याच्या श्रेयांक व्यवस्थेची (क्रेडिट) रचना आणि त्यात उपलब्ध करून दिलेले बहुविध प्रवेश-निर्गमन पर्याय यांचा परिचय करून देण्याचा आमचा प्रयत्न असेल. त्याचबरोबर विद्यार्थी जर एकल प्रमुख विषय ( २्रल्लॠ’ी ें्न१) आंणि उपविषय ( ट्रल्ल१) विषयात पदवी घेणार असतील तर त्यांना कशा प्रकारे मुख्य विषयाची निवड करता येईल, जर ते दुहेरी मुख्य विषयांची ( double major) निवड करणार असतील किंवा बहुविद्याशाखीय / आंतरविद्याशाखीय अभ्यासक्रम निवडणार असतील तर त्यांची निवड कशी करायची आणि त्याला पूरक अशा उपविषयांची निवड कशी करायची याविषयी अवगत करून देण्याचा आम्ही प्रयत्न करू. या धोरणाचे वैशिष्टय़ ठरू शकेल अशा शैक्षणिक श्रेयांकांची बँक (Academic bank of credits), श्रेयांकांचे चलन आणि गतिशीलता ( Credit transfer and mobility), परिणाम आधारित अभ्यासक्रमांची रचना, या नव्या संकल्पना सोप्या भाषेत आपण समजावून घेऊ. याबरोबरच शैक्षणिक Programme संदर्भात एकाहून अधिक निर्गमनांच्या संदर्भात परीक्षा व मूल्यमापनातील बदलांचा परिचय, पीएच.डी. Programme बद्दल नवे नियम, सामाजिक प्रतिबद्धता/ क्षेत्रभेटी ( social engagement/ study tour), दुहेरी/ संयुक्त/ जोड-पदवी अभ्यासक्रम यांना समजून घेणे, आणि उच्च शिक्षणाचे आंतरराष्ट्रीयीकरण समजून घेणे हेही उद्देश या लेखमालेमागे आहेत.
‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०’ हे पदवी पातळीवरील चार वर्षीय बहुविद्याशाखीय अभ्यासक्रम, श्रेयांक व्यवस्था, तत्संबंधी विविध नियम विकसित करते. या धोरणांतर्गत एक वर्षांचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम, दोन वर्षांचा पदविका अभ्यासक्रम, तीन वर्षांची बॅचलर्स पदवी, चार वर्षांची बॅचलर्स पदवी (संशोधन/ऑनर्स) आणि बहु आगमन-निर्गमन पर्याय देणारी पदव्युत्तर अभ्यासक्रमाची सोय दिलेली आहे.
हे धोरण उच्चशिक्षण देणाऱ्या संस्थांचे बहुविद्याशाखीय संस्थांमध्ये रूपांतरण करण्याचा प्रयत्न करते. विद्यार्थ्यांना या चार वर्षीय बहुविद्याशाखीय पदवी अभ्यासक्रमांमध्ये मोठय़ा प्रमाणात लवचिकता असेल आणि त्यांना आवश्यक श्रेयांक संरचनेसह किती काळाचा अभ्यासक्रम निवडायचा याचे स्वातंत्र्य असेल. त्यांना, त्यांच्या अभ्यासाच्या कालावधीनुसार प्रमाणपत्र, पदविका, पदवी प्रदान करण्यात येईल. त्यांना त्यांच्या भविष्यातील करिअरच्या गरजेनुसार शिक्षण निवड करण्याचे स्वातंत्र्य असेल. बहु आगमन-निर्गमन हे विद्यार्थ्यांसाठी मोठे वरदान असेल. त्यांना, मध्येच शिक्षण सोडून दिल्यामुळे, पूर्वी होणारा कोणताही तोटा आता होणार नाही.
चार वर्षांचा बहुविद्याशाखीय पदवी अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना त्यांनी निवडलेल्या मुख्य व उपविषयांच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याची मुभा देते. या अभ्यासक्रमांतर्गत असणारे विविध अभ्यासक्रम हे कौशल्याधारित, निवड आधारित, बहुविद्याशाखीय, आंतरविद्याशाखीय, बाह्यविद्याशाखीय आहेत. ही लवचिकता विद्यार्थ्यांना विविध अभ्यासशिस्तींचा परिचय करून देते. ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०’ विद्यार्थ्यांसाठी प्रस्तावित केलेली प्रशिक्षुता ( Internship), शिक्षुता ( Apprenticeship) ही विद्यार्थ्यांची रोजगार क्षमता विकसित करेल आणि उद्योग-शैक्षणिक संबंध वृिद्धगत करेल. जगभरामध्ये शिक्षुता (Apprenticeship) हे प्रत्यक्ष कामकाजाच्या वातावरणाचा अनुभव घेण्यासाठी सर्वात कार्यक्षम आणि आश्वासक असे नियोजनबद्ध प्रशिक्षण मानले जाते. यामध्ये संबंधित विषयाच्या सैद्धांतिक ज्ञानासह कार्याधारित शिक्षण देण्याची प्रचंड क्षमता आहे. एखाद्या विशिष्ट विषयात विद्यार्थी त्यांचा तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर चौथ्या वर्षांत ऑनर्स पदवी किंवा संशोधन पदवी मिळवू शकतात. याप्रकारची लवचिकता विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरचे नियोजन करण्यात उपयुक्त ठरू शकेल व हे त्यांच्यासाठी मोठे वरदान असू शकेल. आता यानंतर कला आणि विज्ञान, अभ्यासक्रम आणि अभ्यासेतर कार्यक्रम (extracurricular activities), व्यावसायिक आणि पारंपरिक शैक्षणिक प्रवाह यामध्ये फारसे अंतर उरणार नाही. ही परिस्थिती विद्यार्थ्यांना त्यांचे आयुष्य यशस्वीतेने जगण्यासाठी उपकारक ठरेल. एकविसाव्या शतकाची आव्हाने स्वतंत्रपणे पेलण्यासाठी ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०’ ही गुरुकिल्ली ठरू शकेल.