शिक्षण व्यवस्थेचा कणा कोणता? या प्रश्नाचे आपल्या परीक्षा पद्धतीनुसार एका वाक्यात उत्तर द्यायचे झाले तर ‘शिक्षण व्यवस्थेचा कणा म्हणजे शिक्षक होय,’ हेच उत्तर असेल आणि ते वादातीतही असेल. पण शिक्षक पदावर कुणा व्यक्तीची नेमणूक झाली की शिक्षणाचा दर्जा सुधारला, सर्वजण सुशिक्षित होऊन सगळीकडे मंगलमय सनया वाजतील आणि समस्यांचा सर्वतोपरी अंत झाला असे खचितच नाही. शिक्षकाची नेमणूक झाली, पण त्या पदाचा आब राखला जात नसेल तर तेथील साक्षरतेच्या अहवालातील आकडे फुगले तरीही सुशिक्षित समाज घडणार नाही, याबाबत तरी जागतिक एकमत दिसते. म्हणून शिक्षकांची आर्थिक, सामाजिक स्थिती हा सर्वच देशांच्या काहीसा चिंतेचा विषय आहे. शिक्षणात आघाडीवर असल्याची शेखी मिरवणारे देशही याला अजिबातच अपवाद नाहीत. किंबहुना तिथे ही समस्या अधिकच दिसून येते.
शिक्षकांच्या या स्थितीचे चित्र होते ते काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या ‘ग्लोबल टीचर्स स्टेटस इंडेक्स’ या अहवालातून. आर्थिक सहयोग व विकास संघटना आणि दुबईतील वार्के फाउंडेशन या संस्थांकडून हा अहवाल प्रसिद्ध करण्यात येतो. यंदा या अहवालासाठी ३५ देशांतील जवळपास ४० हजार लोकांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यात सामान्य नागरिक आणि शिक्षक यांचा समावेश होता. शिक्षकांना स्वत:च्या स्थितीबाबत काय वाटते आणि नागरिकांना देशातील शिक्षकांच्या स्थितीबाबत काय वाटते याचा अभ्यास करण्यात आला. या अहवालानुसार शिक्षकांना सर्वोत्तम स्थिती ही चीनमध्ये आहे.
अर्थातच समाधानाच्या या क्रमवारीत चीन पहिल्या स्थानावर आहे. त्यानंतर मलेशिया, तैवान, रशिया, इंडोनेशिया या देशांचे क्रमांक आहेत. डॉक्टरांना दिला जाणारा मान, डॉक्टरीपेक्षा प्रतिष्ठा या देशामध्ये शिक्षकांना आहे. या क्रमवारीत भारत कुठे आहे तर भारताचे स्थान आठवे आहे. विशेष म्हणजे या अहवालानुसार गुणवत्ता, शिक्षण पद्धतीसाठी नावाजलेले, शिक्षणात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणारे, नवे प्रयोग करणारे किंवा प्रगत राष्ट्रांच्या यादीत मोडणारे अमेरिका, ब्रिटन, जपान, जर्मनी, सिंगापूर, फ्रान्स या देशांतील शिक्षकांची आर्थिक-सामाजिक स्थिती ही भारतीय शिक्षकांपेक्षा अंमळ वाईटच म्हणावी लागेल.
वरकरणी सर्व आलबेल दिसावे अशी स्थिती असली तरीही भारतीय शिक्षकांच्या बाबतीतील काही निरीक्षणे ही लक्षात घेण्यायोग्य आहेत. विशेषत: शिक्षण व्यवस्थेसाठी ती इशाऱ्याची घंटाच म्हणावी लागेल. इतर देशांच्या तुलनेत भारतीय शिक्षकांची आर्थिक स्थिती चांगली असल्याचे या अहवालातून दिसते. सामाजिक स्थिती चांगली असल्याचे शिक्षकांचे मत आहे. मात्र नागरिकांना तसे वाटत नाही. याचेच द्योतक म्हणून जवळपास पन्नास टक्क्यांहून अधिक पालकांना आपली मुले शिक्षक होऊ नयेत असेच वाटते.
नागरिकांचा शिक्षकांवर, त्यांच्या क्षमतांवरही विश्वास आहे. मात्र शिक्षकांना अजून प्रतिष्ठा मिळाली पाहिजे असे भारतीय नागरिकांचे मत असल्याचे दिसून येते. ही काहीशी आनंद वाढवणारी भावना असली तरी याचाच अर्थ आताची स्थिती समाधानकारक नाही हेदेखील लक्षात घ्यायला हवे.
विद्यार्थ्यांकडून मात्र शिक्षकांचा आदर ठेवला जातो. शिक्षण क्षेत्रात कौतुकाचेच झेंडे फडकणाऱ्या, शिक्षण हे तंत्रज्ञानाच्याच मदतीने होऊ शकते असे मानणाऱ्या आणि शिक्षकांची जागा अॅप, यंत्रमानव यांना देणाऱ्या देशांत विद्यार्थ्यांमध्ये शिक्षकांप्रती फारसा आदर बाळगला जात नसल्याचे दिसते.
गुणवत्ता, शिक्षकांची सामाजिक प्रतिष्ठा यांचा गाढा संबंध आहे. जेथे शिक्षकांना मान मिळतो त्याच शिक्षण व्यवस्थेचा कणा ताठ, बळकट राहतो या तत्त्वावर उभा राहिलेला हा अहवाल खरा मानावा की शिक्षकांची जागा यंत्रांना देणाऱ्या देशांतील उच्च गुणवत्तेची आकडेवारी खरी मानावी याचे संदर्भासहित स्पष्टीकरण द्या.. अशा स्वरूपाचा प्रश्न हा देशाच्या शैक्षणिक प्रवासात अजूनही अभ्यासक्रमाबाहेरचाच मानावा लागेल.
संकलन – रसिका मुळ्ये