आकलन या घटकांतर्गत तुमची समज आणि एखाद्या घटनेबाबत परीक्षार्थीचा प्रतिसाद अजमावला जातो. यात परीक्षार्थीचे इंग्रजी भाषेचे आकलन जाणून घेण्याचा
प्रयत्न असतो.
इंग्रजी भाषेच्या आकलनाच्या चाचणीसाठी जो उतारा दिलेला असतो, तो इंग्रजीत असतो. त्याचे मराठीत भाषांतर केलेले नसते. प्रशासकीय क्षेत्रात येणाऱ्या विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेचे ज्ञान किती आहे, हे जाणून घेण्यासाठी हा उतारा असतो. याचा स्तर दहावी ते बारावी इयत्तेपर्यंतचा असतो. हे उतारे सरळसोपे असतात. त्यामुळे या उताऱ्यावरील प्रश्न सोडवून हक्काचे गुण मिळवता येणे शक्य आहे.
परीक्षेत आकलनविषयक उतारे सोडवताना खालील मुद्दे लक्षात घ्यावेत-
० परीक्षा कक्षात मानसिक ताण असतो. त्यामुळे अनेकदा घाईघाईत उत्तरे लिहिताना येत असलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहितानाही चुका होतात. आकलन हा घटक असा आहे, जिथे अधिक गुण मिळविण्याची संधी असते. या घटकाच्या तयारीसाठी कोणत्याही पूर्वज्ञानाची आवश्यकता नसते. दिलेल्या उताऱ्यातून उत्तरांची निवड करायची असते. त्यामुळे सर्वप्रथम उताऱ्यांची संख्या किती आहे, लहान उतारे किती व मोठे उतारे किती आहेत, इंग्रजी उतारे किती आहेत हे पाहून वेळेचे नियोजन करावे.
० उतारा योग्य गतीने एकाग्र होऊन वाचावा.
उतारा वाचताना महत्त्वपूर्ण वाक्य, पेन किंवा पेन्सिलने अधोरेखित करावेत. उताऱ्यात लेखकाला काय मांडायचे आहे ते समजून घ्यावे. सर्वसाधारणपणे उताऱ्यावरील प्रश्न हे खालील प्रकारे विचारले जातात-
* उताऱ्याला योग्य शीर्षक द्या किंवा उताऱ्याचा मुख्य आशय स्पष्ट करा.
* उताऱ्यामधील वस्तुनिष्ठ माहिती शोधा.
* लेखकाचा दृष्टिकोन स्पष्ट करा.
* उताऱ्यावरून योग्य तो निष्कर्ष काढा.
० सी सॅट पेपर- २ चा पेपर सोडवताना मराठी आकलनक्षमता विषयक भागाला जास्तीत जास्त ५५-६० मिनिटेच देता येतात आणि या ठरावीक वेळेत सुमारे १०-११ उतारे आणि त्यावरील प्रश्नांची उत्तरे शोधून लिहावी लागतात. ही बाब लक्षात घेतली तर एक उतारा वाचून त्यावरील प्रश्न सोडवण्यास जास्तीत जास्त सहा-सात मिनिटे वेळ मिळतो.
सर्वप्रथम उतारा वाचून नंतर प्रश्न सोडवावेत, की प्रश्न वाचून उतारा सोडवावा याबाबत मतमतांतरे आहेत. आपण ज्या प्रकारे सराव केलेला असेल व ज्या पद्धतीने वेळ वाचत असेल ती पद्धत स्वीकारावी. मात्र प्रश्न वाचून उतारा सोडवल्यास आपल्याला उताऱ्यातून कोणती माहिती जाणून घ्यायची आहे हे समजते व आपला वेळ वाचतो. प्रश्न वाचून घेतल्याने उतारा समजणे अधिक सोपे जाते. उतारा वाचताना तो शब्दन्शब्द न वाचता उताऱ्यातील महत्त्वाच्या वाक्यांवर नजर फिरवल्यास, आपल्या वाचण्याचा वेग वाढतो.
० तंत्र -१ : प्रथम उतारा वाचून नंतर प्रश्न सोडवणे.
या तंत्राचा वापर करताना विद्यार्थ्यांनी खालील मुद्दे लक्षात घ्यावेत-
* उताऱ्यातील प्रत्येक वाक्याचा अर्थ समजल्याशिवाय पुढच्या वाक्याकडे जाऊ नये.
* उताऱ्यामधील ज्या वस्तुनिष्ठ माहितीवर प्रश्न विचारला जाऊ शकतो, ती अधोरेखित करावी.
* उतारा वाचताना त्याचा सारांश काढावा.
० तंत्र – २ : प्रथम प्रश्न वाचून नंतर उतारा वाचणे.
या तंत्राचा वापर करताना विद्यार्थ्यांनी खालील मुद्दे लक्षात घ्यावेत-
* प्रथम प्रश्न वाचताना थेट उत्तर शोधण्याचा प्रयत्न न करता प्रश्नाचे नेमके स्वरूप समजून घ्यावे.
* प्रश्नामधील असे काही महत्त्वाचे शब्द अधोरेखित करावे, ज्यांच्या मदतीने नंतर उतारा वाचताना उताऱ्यातील महत्त्वाच्या ओळी अधोरेखित करता येतील.
* जेव्हा उतारा वाचताना एखाद्या वस्तुनिष्ठ स्वरूपाच्या प्रश्नाचा संदर्भ येतो, तेव्हा अशा प्रश्नाचे उत्तर लगेचच नमूद करावे.
० सरावासाठी उतारा –
लोकशाहीचे बरेचसे समर्थकही लोकशाहीमुळे विकासाला चालना मिळते आणि सामाजिक कल्याणाची प्रगती होते, असे सुचविण्यास धजावत नाहीत. ही दोन उद्दिष्टे अगदीच भिन्न आणि बहुतांशी एकमेकांपासून स्वतंत्र असल्याचा त्यांचा समज आहे. दुसरीकडे लोकशाहीला गौण मानणाऱ्या टीकाकारांचे आग्रही निदान असे आहे की, लोकशाही आणि विकास या दोन संकल्पना एकमेकांशी विसंगत आहेत. लोकशाही हवी की विकास हवा? हे आधी निश्चित करा, असे आग्रही प्रतिपादन या द्वैताचे समर्थक करीत असतात. या द्वैताचे बहुतेक समर्थक आग्नेय आशियातील आहेत. या समर्थकांनी त्यांच्या देशांत १९७० आणि १९८०च्या दशकात लोकशाही विरहित विकास अतिशय जलदगतीने साध्य
झाल्याचे पाहिले आहे.
या द्वैताचे निराकरण करण्यासाठी विकासाचा मथितार्थ आणि लोकशाही म्हणजे काय या दोन्ही घटकांचा विचार, (विशेषत: मतदानाचा अधिकार आणि सार्वजनिक युक्तिवाद यांच्या संदर्भात) गंभीरपणे करण्याची आवश्यकता आहे. प्रजाजनांचे राहणीमान आणि त्यांना मिळणारी खरी स्वातंर्त्ये या दोन बाबींचा विचार केल्याशिवाय विकासाचे मूल्यमापन करता येत नाही. विकासाचा विचार, वैयक्तिक किंवा स्थूल राष्ट्रीय उत्पन्न किंवा औद्योगिकीकरण यासारख्या सोयीस्कर निर्जीव कल्पनांच्या आधारे करता येत नाही. अर्थातच, अंतिम उद्दिष्टे साध्य करण्याची ती महत्त्वाची साधने आहेत. संबंधित प्रजाजनांचे जीवन आणि त्यांचे स्वातंत्र्य ही मूल्ये विकास या संकल्पनेच्या केंद्रस्थानी आहेत.
मानवी जीवनाला केंद्रिबदू मानून विकासाचा व्यापक अर्थ समजून घेतल्यास एक बाब ताबडतोब स्पष्ट होते की, विकास आणि लोकशाही यांच्यातील संबंधांचा विचार, अंशत: तरी अंतर्गत घटकांच्या संबंधांच्या संदर्भात करावा लागतो. विकास आणि लोकशाही यांच्या बाह्य संबंधांच्या दृष्टिकोनातून असा विचार करता येते नाही. राजकीय स्वातंत्र्य विकासाला पोषक आहे का? असा प्रश्न वारंवार विचारला जात असला तरी राजकीय स्वातंर्त्ये आणि लोकशाहीचे अधिकार हे विकासाचे निर्णायक अंगभूत घटक असल्याचे मान्य करावे लागते. स्थूल, राष्ट्रीय उत्पन्नातील त्यांच्य योगदानाच्या अप्रत्यक्ष संदर्भात विकासात ते किती सुसंबद्ध आहेत, याचा विचार करता येत नाही.
१) या उताऱ्यानुसार लोकशाहीचे टीकाकार लोकशाही आणि विकास यांच्या दरम्यान गंभीर तणाव असल्याचे का मानतात?
* लोकशाही आणि विकास ही दोन वेगळी आणि भिन्न उद्दिष्टे आहेत.
* लोकशाही प्रशासन व्यवस्था स्वीकारल्याशिवाय आíथक वाढीला चालना देता येते.
* लोकशाही शासन पद्धतीपेक्षा बिगरलोकशाही शासनव्यवस्था अधिक जलद आणि यशस्वीरीत्या आíथक विकास घडवू शकते.
* या संदर्भात वरील तिन्ही विधाने बरोबर आहेत.
२) उताऱ्यानुसार विकासाचे अंतिम मूल्यमापन, लक्ष्य वा दृष्टिकोन काय असावा?
* दरडोई उत्पन्न आणि औद्योगिक उत्पादनातील वाढ.
* फक्त राजकीय आणि नागरी अधिकारच विकासाला पोषक आहेत.
* राजकीय स्वातंर्त्ये आणि लोकशाहीचे अधिकार हे विकासातील आवश्यक घटक आहेत.
४या संदर्भात वरीलपकी एकही विधान बरोबर नाही.
३) लोकशाही आणि विकास यांच्यातील अंगभूत संबंध म्हणजे काय?
* त्यांच्यातील संबंधांचा विचार साखळीच्या बाह्य कडीतूनच करता येतो.
* फक्त राजकीय स्वातंत्र्य आणि नागरी अधिकारच आíथक विकासाला पोषक आहेत.
* राजकीय स्वातंत्र्य आणि लोकशाहीचे अधिकार विकासाचे आवश्यक घटक आहेत.
* या संदर्भात वरीलपकी एकही विधान योग्य नाही.
grpatil2020@gmail.com
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा