एमपीएससीतर्फे पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा आणि मौखिक चाचणी अशा तीन टप्प्यांत सहायक परीक्षा घेतली जाते. येत्या २९ सप्टेंबर रोजी घेतल्या जाणाऱ्या सहायक परीक्षेची तयारी कशी करावी, यासंबंधीची उपयुक्त माहिती
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे २००९-१० पासून पोलीस उपनिरीक्षक, विक्रीकर निरीक्षक तथा मंत्रालय सहायक या तिन्ही पदांसाठी स्वतंत्र परीक्षा घेतली जात आहे. राज्यसेवा परीक्षा पद्धतीनुसार या पदासाठीच्या परीक्षांमध्ये आयोगाने आमूलाग्र बदल केले आहेत. सहायकपदासाठीचा अभ्यासक्रम आयोगाने जुल- २०११ मध्ये घोषित केला. त्यानुसार गेल्या वर्षी एक निवडप्रक्रिया पार पडली. यात परीक्षेच्या नव्या स्वरूपानुसार आयोगाचा प्रश्न विचारण्याचा कल उमजला.
सहायक म्हणजे प्रामुख्याने मंत्रालयातील विविध विभागांतील तसेच एम.पी.एस.सी.च्या कार्यालयातील गट-ब (अराजपत्रित) दर्जाचा अधिकारी होय. थोडक्यात बृहन्मुंबई परिक्षेत्राच्या अखत्यारीतील येणाऱ्या कार्यालयीन कामकाजाची बहुतांशी जबाबदारी सहायकावर असते. या पदाची पुढची पदोन्नती म्हणजे, कक्ष अधिकारी, अवर सचिव, उपसचिव, सहसचिव, इ. अशी असते. काही परिस्थितीत मंत्र्यांच्या स्वीय सहायकाची भूमिकाही सहायकास बजावावी लागते. एकंदरीतच सरकारी कार्यालयाच्या कागदोपत्री हालचालींची मुख्य जबाबदारी त्याच्यावरच असते. या पदाच्या निवडीची माहिती खालीलप्रमाणे-
० वेतनश्रेणी : रु. ९३००-३४८००, ४३०० ग्रेड-पे. अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर देय भत्ते. एकूण वित्तलब्धी अंदाजे रु. २१७५२/-
० शैक्षणिक अर्हता : कोणत्याही शाखेचा पदवीधर आवश्यक, तथा मराठीचे ज्ञान आवश्यक. त्याचप्रमाणे पदवीच्या शेवटच्या वर्षांच्या परीक्षेस बसलेले विद्यार्थी पूर्वपरीक्षेस पात्र असतील, परंतु मुख्य परीक्षेकरिता अहर्ताप्राप्त ठरल्यास, मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी विहित पद्धतीने आवश्यक माहिती व परीक्षा शुल्क सादर करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य राहील.
० वयोमर्यादा : १९ ते ३३ वष्रे (राखीव संवर्गासाठी कमाल वयोमर्यादा ३८ वष्रे).
० परीक्षा शुल्क : १) पूर्व परीक्षा – खुला वर्ग = २६० रु. राखीव वर्ग = १३५ रु.
२) मुख्य परीक्षा – खुला वर्ग = ३१० रु. राखीव वर्ग = १६० रु.
सहायक परीक्षा ही एम.पी.एस.सी.मार्फत पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा आणि मौखिक चाचणी अशा तीन टप्प्यांत घेतली जाते.
पूर्व आणि मुख्य परीक्षा ही वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्नांवर आधारित असते. त्यामध्ये पूर्व परीक्षेसाठी १५० प्रश्न (३०० गुणांसाठी) केवळ ९० मिनिटांत सोडवणे अनिवार्य असते. शालान्त दर्जाच्या या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत मराठी व इंग्रजी या दोन्ही माध्यमांतून प्रश्न विचारण्यात आलेले असतात. निगेटिव्ह माìकगच्या नव्या नियमाप्रमाणे, प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ गुण वजा केले जातात. यामुळे उत्तराच्या अचूकतेला महत्त्व आहे.
मुख्य परीक्षेचा विचार करता, मुख्य परीक्षा ही एकूण ४०० गुणांची असते. त्यात मुख्यत्वे पेपर-१ आणि पेपर-२ याप्रमाणे दोन वेगवेगळ्या पदवी पातळीवरील प्रश्नपत्रिका असतात-
पेपर-१ मध्ये १३० गुणांचे १३० इंग्रजी विषयाचे प्रश्न, तर ७० गुणांचे ७० मराठी विषयाचे असे एकूण २०० गुणांचे प्रश्न विचारले जातात.
पेपर-२ मध्ये सामान्यज्ञान, बुद्धिमापन व विविध विषयांचे ज्ञान यावरील एकूण २०० गुणांसाठी २०० प्रश्न विचारले जातात. यामध्ये निगेटिव्ह गुणदान पद्धत (प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ गुण वजा याप्रमाणे) लागू आहे. याची मनात कोणतीही भीती न बाळगता उमेदवाराने परीक्षेला सकारात्मक दृष्टिकोनातून सामोरे जावे.
मित्रहो, या परीक्षेसह सर्वच स्पर्धा परीक्षांकरिता राज्यभरातून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येतात. मागील राज्यसेवा परीक्षेतील ऑनलाइन पद्धतीत झालेला बिघाड लक्षात घेता, या परीक्षेची जाहिरात येण्याआधीच सर्वानी नव्याने http://www.mahaonline.gov.inया संकेतस्थळावर जाऊन आपले पूर्णत: नवीन प्रोफाइल तयार करून घेणे अनिवार्य आहे. (आयोगाने जून- २०१३ मध्ये दिलेल्या जाहीर निवेदनात नमूद केल्यानुसार) यासंबंधी राज्यातील सर्वच परीक्षार्थीनी नोंद घ्यावी.
सहायक-पूर्वपरीक्षेचं स्वरूप आणि तयारी
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आपल्या http://www.mpsc.gov.in संकेतस्थळावर घोषित केल्याप्रमाणे २९ सप्टेंबर २०१३ रोजी सहायक पूर्वपरीक्षा घेतली जाणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. पूर्वपरीक्षेची प्रश्नपत्रिका एकच असून त्यामध्ये वस्तुनिष्ठ बहुपर्यायी १५० प्रश्न ९० मिनिटांत (दीड तासात) सोडवणे (म्हणजेच एका प्रश्नासाठी केवळ ३६ सेकंदांचा कालावधी) अनिवार्य असते. प्रश्नपत्रिका सोडविण्याचे सुयोग्य नियोजन करताना सामान्यज्ञान विषयाचे एकूण १३० प्रश्न केवळ ६० मिनिटांमध्ये (म्हणजेच एका प्रश्नासाठी सुमारे २७.५ सेकंदांचा कालावधी) आणि उर्वरित २० गणिताचे प्रश्न ३० मिनिटांत सोडविण्याचं कौशल्य आत्मसात करणं म्हणजेच पूर्वपरीक्षा उत्तीर्ण होण्याच्या दिशेनं पुढे टाकलेलं योग्य पाऊल! प्रत्येक एका प्रश्नाला प्रत्येकी दोन गुण असतात, परंतु प्रत्येक चुकीच्या एका उत्तरासाठी ०.२५ गुण वजा केले जातात.
वरील सर्व विषयांचा अंतर्भाव असलेली सामान्य क्षमता चाचणी ही १५० प्रश्नांच्या एकाच प्रश्नपत्रिकेद्वारे घेतली जाते. या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असते. यासाठी ठरविण्यात आलेला अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे-
भारताचा सामान्य इतिहास (१८५७ ते १९४७), भूगोल (महाराष्ट्राच्या भूगोलाचा विशेष परामर्श), पृथ्वी, जगातील भौगोलिक विभाग, हवामान, अक्षांश-रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, महाराष्ट्रातील प्रमुख शहर, नदीप्रणाली, उद्योगधंदे, इ. नागरिकशास्त्र (राज्यशास्त्र), भारतीय राज्यघटनेचा प्राथमिक अभ्यास, राज्य-व्यवस्थापन (प्रशासन), ग्राम-व्यवस्थापन (प्रशासन), महाराष्ट्रातील समाजसुधारक
अर्थव्यवस्था घटक : भारतीय पंचवार्षकि योजनांची वैशिष्टय़े व भारतीय बँकिंग व्यवस्था.
सामान्य विज्ञानविषयक घटक : भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, आरोग्यशास्त्र, पर्यावरणशास्त्र.
अंकगणित – बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, सरासरी, दशांश अपूर्णाक, काळ-काम-वेग.
चालू घडामोडी – राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, महाराष्ट्राच्या विशेष आनुषंगिक घडामोडी.
मुख्य परीक्षा : अभ्यासक्रम
मागील मुख्य परीक्षेतील प्रश्न विचारण्याच्या स्वरूपानुसार, आगामी माहिती तंत्रज्ञानाच्या युगातील नवनवीन आव्हानं पेलण्यासाठी सक्षम प्रशासकीय अधिकारी निवडण्यासाठी अभ्यासक्रमाचा आवाका वाढविण्यात आला आहे. मराठी व इंग्रजी या विषयांचा समावेश असलेला पेपर क्र. १ हा एकूण २०० गुणांचा असतो. यामध्ये मराठी विषयांच्या १३० प्रश्नांसाठी १३० गुण, तर इंग्रजी विषयाच्या ७० प्रश्नांसाठी ७० गुण असतील. या पेपरमधील नमूद मराठी विषयाच्या अभ्यासक्रमाचा दर्जा- बारावी, तर इंग्रजीच्या अभ्यासक्रमाचा दर्जा- पदवी असा निश्चित करण्यात आला आहे. म्हणजेच भाषा विषयाला ५० टक्के महत्त्व असून पुढच्या ५० टक्क्यांत उर्वरित सर्व विषयांचा समावेश केलेला आहे. सामान्यज्ञान, बुद्धिमत्ता व विषयाचे ज्ञान विषयाच्या एकूण २०० गुणांसाठी २०० प्रश्नांचा समावेश करण्यात आला आहे. या विषयाच्या अभ्यासक्रमाचा दर्जा पदवीपर्यंत आहे. पेपर क्रमांक- १ व २चा सुधारित अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे-
प्रश्नपत्रिका क्र. १
मराठी व इंग्रजी भाषा – सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ आणि उपयोग तसेच उताऱ्यावरील प्रश्नांची उत्तरे.
प्रश्नपत्रिका क्र. २
सामान्यज्ञान, बुद्धिमत्ता व विषयाचे ज्ञान. या विषयांत खालील घटक/उपघटकांचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे.
० चालू घडामोडी (३० गुण) : जागतिक, भारतातील व महाराष्ट्राचा विशेष परामर्श.
० बुद्धिमत्ता चाचणी (४० गुण) : अंकगणित, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, सरासरी, दशांश व अपूर्णाक तसेच बुद्धय़ांक (क.द.) मापनाशी संबंधित प्रश्न.
० महाराष्ट्राचा भूगोल (३० गुण) : महाराष्ट्राचा रचनात्मक (ढँ८२्रूं’) भूगोल.
० माहितीचा अधिकार कायदा-२००५ (१५ गुण)
० महाराष्ट्राचा इतिहास (१५ गुण)
० भारतीय राज्यघटना (२० गुण)
० संगणक व माहिती तंत्रज्ञान (५० गुण)
या संपूर्ण प्रक्रियेमध्ये अचूक उत्तराला विशेष महत्त्व आहे. मुख्य परीक्षेत निगेटिव्ह माìकग पद्धत विचार करता, एका चुकीच्या उत्तराकरिता ०.२५ गुण म्हणजेच प्रत्येक चार चुकीचे प्रश्न सोडविल्यास एक गुण वजा केला जाईल.
मुख्य परीक्षेसाठी संपूर्ण महाराष्ट्रासाठी औरंगाबाद, मुंबई, नागपूर, पुणे ही चार परीक्षा केंद्रे आयोगामार्फत ठरविण्यात आलेली आहेत. या मुख्य परीक्षेच्या निकालात भरावयाच्या एकूण पदांपकी प्रत्येक आरक्षित प्रवर्ग/उपप्रवर्गासाठी तीनपट उमेदवार मुलाखतीसाठी उपलब्ध होतील अशा प्रकारे ‘कट ऑफ’ निश्चित करण्यात येईल. ही यादी सर्व उमेदवारांसाठी एकच किंवा प्रत्येक सामाजिक प्रवर्गा/उपप्रवर्गासाठी तसेच महिला, खेळाडू, इत्यादींसाठी वेगवेगळी ठरविण्यात येते. अशा प्रकारे मुलाखतीसाठीचे पात्र उमेदवार ठरविण्यात येतील.
सहायक पदासाठीची मुलाखत
सहायक परीक्षेची मुलाखत ५० गुणांची होईल. या पदासाठी उमेदवार कितपत योग्य आहे, हे मुलाखतीत तपासले जाते. तुमच्या निर्णय क्षमतेची चाचणी म्हणजे पूर्वपरीक्षा, तुमच्या सखोल ज्ञानाची तपासणी म्हणजे मुख्य परीक्षा आणि तुमच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वाची चाचणी म्हणजे मुलाखत होय.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ६६६.ेस्र्२ू.ॠ५.्रल्ल आणि ६६६.ेंँंल्ल’्रल्ली.ॠ५.्रल्ल या संकेतस्थळांना नेहमी भेट दिल्याने आगामी काळातील परीक्षा, उत्तरतालिका, आयोगाच्या काही महत्त्वाच्या घोषणा, इत्यादींची माहिती मिळते.