आज आपण सहायक मुख्य परीक्षेची माहिती करून घेऊयात. सहायक, विक्रीकर निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक या पदांकरता महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे स्वतंत्रपणे परीक्षा घेतल्या जातात. या परीक्षांचा पूर्वपरीक्षेचा अभ्यासक्रम आणि मुख्य परीक्षेतील पेपर क्रमांक एकचा अभ्यासक्रम सारखाच आहे. परंतु मुख्य परीक्षेतील पेपर क्रमांक दोनच्या अभ्यासक्रमातील काही विषय हे संबंधित पदाच्या जबाबदारीनुसार आणि कामाच्या स्वरूपानुसार वेगवेगळे आहेत. सहायक मुख्य परीक्षेतील पेपर क्र. २ मध्ये भारतीय राज्यघटना, प्रशासकीय यंत्रणा आणि न्यायमंडळ यांवर विशेष भर दिल्याचे जाणवते.
मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम
पेपर क्र. १
- मराठी- सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ आणि उपयोग तसेच उताऱ्यावरील प्रश्नांची उत्तरे.
- इंग्रजी – Common Vocabulary, Sentence Structure, Grammer, Use of Idioms and Phrases and their meaning and comprehension of passage.
पेपर क्र. २
- जागतिक आणि देशस्तरीय चालू घडामोडी.
- बुद्धिमत्ता चाचणी.
- महाराष्ट्राचा भूगोल.
- महाराष्ट्राचा इतिहास.
- भारतीय राज्यघटना- घटना कशी तयार झाली आणि घटनेच्या प्रस्तावनेमागची भूमिका व तत्त्वे, घटनेची महत्त्वाची कलमे, ठळक वैशिष्टय़े, केंद्र व राज्य संबंध, निधर्मी राज्य, मूलभूत हक्क व कर्तव्ये, राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे, शिक्षण, युनिफॉर्म सिव्हिल कोड, स्वतंत्र न्यायपालिका, राज्यपाल, मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ, त्यांचे अधिकार व कार्य, विधानसभा, विधानपरिषद व त्यांचे सदस्य, त्यांचे अधिकार, कामाचे स्वरूप, विधी, समित्या.
- माहिती अधिकार अधिनियम २००५.
- संगणक व माहिती तंत्रज्ञान, सायबर गुन्हे व त्यावरील प्रतिबंध.
- राजकीय यंत्रणा (शासनाची रचना अधिकार व कामे) केंद्र सरकार, केंद्रीय विधिमंडळ आणि राज्य सरकार व प्रशासन (महाराष्ट्राचा विशेष संदर्भासह).
- जिल्हा प्रशासन, ग्रामीण आणि नागरिक स्थानिक शासन.
- न्यायमंडळे, न्यायमंडळाची रचना, एकात्मिक न्यायमंडळ, कार्य, सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाची भूमिका व अधिकार, दुय्यम न्यायालये, लोकपाल, लोकायुक्त आणि लोकन्यायालय इ.
मुख्य परीक्षेचे विश्लेषण
२०१५च्या सहायक मुख्य परीक्षेत पेपर क्र. १ मध्ये व्याकरण व शब्दसंग्रहावर अधिक भर दिलेला आपल्याला दिसून येतो.
वरील विश्लेषणावरून असे लक्षात येते की, बुद्धिमत्ता चाचणीवर केवळ आठ प्रश्न विचारले आहेत आणि राज्यघटना, राजकीय यंत्रणा, प्रशासकीय व्यवस्था व न्यायमंडळ यांवर तब्बल ५४ प्रश्न विचारले आहेत. यातूनच या घटकाचे महत्त्व अधोरेखित होते. तसेच बहुविधानात्मक प्रश्न केवळ १४ म्हणजेच पूर्वपरीक्षेच्या तुलनेत कमी आहेत. या परीक्षेस अर्थशास्त्र, विज्ञान, पर्यावरण हे विषय नाहीत.
अभ्यासाची रणनीती
- अभ्यासाचे नियोजन करताना एका वेळेस दोन विषय व ठरावीक दिवस ठरवावेत. त्यामुळे अभ्यासाला एकसुरीपणा येणार नाही.
- बुद्धिमत्ता चाचणीचा दररोज दुपारच्या वेळेत सराव करावा.
- संध्याकाळी रोज एक तास पेपर वाचन करून त्यावर टिपणे काढावीत.
- दोन अभ्यासादरम्यानचा वेळ बहुपर्यायात्मक प्रश्न सोडविण्यासाठी वापरावा.
- दर शनिवारी- सोमवार ते शुक्रवारच्या अभ्यासाची उजळणी करावी.
- दर रविवारी फक्त दर्जेदार वर्तमानपत्रे व नियतकालिकांचे वाचन करून टिपणे काढावीत.
- इंग्रजी व मराठीचा अभ्यास महिनाभर दररोज तासभर करावा.
संदर्भ साहित्य सूची
- चालू घडामोडी : योजना, कुरुक्षेत्र, लोकराज्य मासिके, करंट ग्राफ वार्षकिी.
- बुद्धिमत्ता चाचणी : चौथी, सातवी शिष्यवृत्ती परीक्षेची पुस्तके, आठवी, नववी, एमटीएस पुस्तके, क्वान्टिटेटिव्ह अॅप्टिटय़ूड- आर. एस. अग्रवाल.
- भूगोल : महाराष्ट्राचा भूगोल- सवदी, भारताचा भूगोल- माजिद हुसेन, प्रीलिमची सर्व पुस्तके.
- इतिहास : प्रीलिमची सर्व पुस्तके, एनसीईआरटी (प्राचीन इतिहास, मध्ययुगीन इतिहास), आधुनिक भारताचा इतिहास, ग्रोव्हर व बेल्हेकर.
- भारतीय राज्यशास्त्र : इंडियन पॉलिटी. एम. लक्ष्मीकांत (इंग्रजी / िहदी), भारतीय राज्यघटना- डी. डी. बसू, राज्य परीक्षा मंडळाची अकरावी- बारावीची पुस्तके.
- माहिती अधिकार अधिनियम २००५ : प्रत्यक्ष अधिनियम, इंटरनेट आणि यशदाचे संकेतस्थळ.
- संगणक व माहिती तंत्रज्ञान- बँकेच्या आणि स्टाफ सिलेक्शन बोर्ड परीक्षांच्या गेल्या काही वर्षांचे प्रश्नसंच.
- राजकीय यंत्रणा, प्रशासन, न्यायमंडळ : भारत की राज्यव्यवस्था- एम. लक्ष्मीकांत.
- मराठी : मराठी व्याकरण- मो. रा. वािळबे.
- इंग्रजी : English Grammer- Wren & Martin
- सरावासाठी एमपीएससी व यूपीएससीच्या गतवर्षीच्या प्रश्नपत्रिका, टाटा मॅकग्रा हिलचे प्रश्नसंच.