बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी आणि भारती विद्यापीठ पर्यावरण शिक्षण व संवर्धन संस्था (BVIEER) यांच्या संयुक्त विद्यमाने १० ते १२ जानेवारी २०१३ दरम्यान पर्यावरणीय स्वयंसेवी संस्थांकरता (eNGO) व्यवस्थापन कौशल्य कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. अशा प्रकारच्या कार्यशाळा यापूर्वी यशस्वीरीत्या मुंबई, इम्फाळ, बंगळुरू व दिल्ली येथे आयोजित करण्यात आल्या होत्या. ही कार्यशाळा मालिका ‘फुलब्राइट अलमनाय अँगेजमेन्ट इन्नोवेशन फंड’च्या माध्यमातून अमेरिकन सरकारच्या मदतीने चालवली जात आहे. पुण्यातील कार्यशाळा महाराष्ट्र, गोवा, गुजरात व राजस्थानमधील eNGO साठी खुली आहे. यानंतर अहमदाबाद व कोहिमा येथे अशा कार्यशाळा होतील.
‘फुलब्राइट फंड’च्या माध्यमातून घेण्यात आलेल्या स्पध्रेतून जगभरातील ६८५ संस्थांमधून उपांत्य फेरीत आलेल्या ५० नावांमधून ‘बीएनएचएस’ची निवड करण्यात आली. ‘‘व्यवस्थापन कार्यशाळांच्या माध्यमातून पर्यावरण स्वयंसेवी संस्थांच्या मधल्या फळीतील अधिकाऱ्यांचा कौशल्य विकास’’ हा ‘बीएनएचएस’चा विषय होता. ‘बीएनएचएस’च्या डॉ. व्ही. शुभालक्ष्मी या कार्यशाळा मालिकेच्या प्रमुख आहेत तर देशभरातील ‘फुलब्राइट’चे माजी विद्यार्थी सहकार्य करत आहेत.
कार्यशाळेची गरज
देशातील eNGO पैकी बहुतांश संस्थांना निधी उभारण्यात अडचणी येतात. त्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती अशाश्वत होऊन व्यवस्थापनावर परिणाम होतो. संस्थांच्या मधल्या फळीतील अधिकाऱ्यांना जर आर्थिक व्यवहार, मनुष्यबळ, विपणन आणि जनसंपर्क या विषयांचे शिक्षण दिले, तर संस्थांचे भविष्य उज्ज्वल व्हायला मदत होईल. व्यावसायिक तज्ज्ञ अनेक संस्थांना परवडत नसल्याने या कार्यशाळेतून संस्थेतच असे तज्ज्ञ निर्माण करता येतील.
कार्यशाळेबद्दल..
देशभरातील प्रत्येक कार्यशाळा हा वर्षभराचा उपक्रम असेल, ज्यामध्ये एकूण १२५ संस्थांच्या २५० अधिकाऱ्यांना व्यावसायिक शिक्षण देण्यात येईल. तीन दिवसांच्या कार्यशाळेनंतर वर्षभर मार्गदर्शन व शेवटी दोन दिवसांची उजळणी कार्यशाळा असेल. पुण्यातील कार्यशाळेत स्वत:ची संस्था जाणून घेणे, निधी उभारणे, निधीसाठी अर्ज करणे, प्रकल्प व्यवस्थापन, संघटन व स्वयंसेवक व्यवस्थापन, जनसंपर्क, विपणन आणि नेतृत्व असे विविध विषय हाताळले जातील. चित्रफिती, चर्चा व प्रत्यक्ष सहभाग अशा माध्यमांतून अभ्यासक्रम पूर्ण केला जाईल.
प्रवेश प्रक्रिया
कार्यशाळा महाराष्ट्र, गोवा, गुजरात व राजस्थान मधील चांगल्या कार्याचा पूर्वेतिहास असलेल्या eNGO साठी खुली आहे. संस्था प्रमुख या कार्यशाळेसाठी मधल्या फळीतील दोन अधिकाऱ्यांची नेमणूक करू शकतात, जे कमीतकमी दोन वर्षे संस्थेत कार्यरत आहेत. अभ्यास पुस्तिका व भोजन व्यवस्थेकरता रु. ५०० शुल्क आकारले जाईल.
अधिक माहितीसाठी संपर्क : १) कौस्तुभ भगत, शिक्षण अधिकारी, बीएनएचएस-engosindia@gmail.com, ९३२३७३८६२२, ९५९४९५३४२५, ९५९४९२९१०७; २) डॉ. क्रांती यार्दी, इश्कएएफ – kranti@bvieer.edu.in ९४२२५०४६५५.
जनसंपर्क व्यवस्थापक, बीएनएचएस
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा