मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील काटकुंभ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ. प्रियदर्श तुरे गेली तीन वर्षे वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करीत आहे. वैद्यकसेवा बजावताना स्थानिक जनतेतील आरोग्याविषयीचे गैरसमज दूर करण्यासाठी त्याला बरेच प्रयत्न करावे लागले. आजूबाजूच्या गावांच्या विकासासाठी विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यासाठीही प्रियदर्श पुढाकार घेत आहे. त्याविषयी-
रा त्रीची साडेआठची वेळ. माझा सहा महिन्यांचा मुलगा खूप आजारी आहे. गेले काही दिवस खात-पीत नाही, असा फोन डॉक्टरांना येतो. दवाखान्याचं काम संपवून डॉक्टर नुकतेच घरी आलेले असतात. लगेचच ते मुलाला आणायला दवाखान्याची गाडी पाठवितात. २० मिनिटांनी मुलाला घेऊन त्याचे आई-वडील दवाखान्यात येतात. डॉक्टर व त्यांचे सहकारी संपूर्ण तयारीनिशी त्या मुलाच्या येण्याची वाटच पाहत असतात. मुलाची प्रकृती गंभीर असून त्याला न्यूमोनिआ झाल्याचे डॉक्टरांच्या लक्षात येते. डॉक्टर लगेचच त्या मुलावर उपचार सुरू करतात. त्यांच्या प्रयत्नामुळे ते कोमेजलेलं मूल दुसऱ्या दिवशी डोळे उघडून टकमका इकडेतिकडे पाहायला लागते. तब्बेत सुधारत आहे, हे पाहिल्यानंतर मुलाला त्याच्या पालकांसह दवाखान्याच्या गाडीतून घरी सोडण्यात येते. तत्पर सेवेचे हे दृश्य कुठल्या खासगी दवाखान्यातले नसून मेळघाटमधील काटकुंभच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातले आहे.
मेळघाट- विकासाच्या दृष्टीने नेहमीच दुर्लक्षित राहिलेला. कुपोषण, बालमृत्यू अशीच ओळख असलेला महाराष्ट्राच्या सातपुडा पर्वत रांगेतील दुर्गम भाग. या भागात चिखलदरा तालुक्यातील काटकुंभ येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ. प्रियदर्श तुरे गेली तीन वष्रे वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करीत आहे.
प्रियदर्शचे मूळ गाव चंद्रपूर. दहावीपर्यंत जेमतेम गुण मिळवणारा प्रियदर्श घरीच असणारे काकांचे ग्रंथालय आणि त्यातली पुस्तके यातच गुंतलेला असायचा. या काळात पुस्तकांच्या माध्यमातून त्याची बाहेरील जगाशी ओळख होत होती. अकरावीला असताना वाचलेल्या आंबेडकरांच्या ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या पुस्तकाचा त्याच्यावर खूप प्रभाव पडला. या पुस्तकाने अंतर्मुख होऊन त्याने स्वत:ला अभ्यासात झोकून दिले. ठरवलं तर कोणतीही गोष्ट करू शकतो, या आत्मविश्वासाने त्याने मिरजच्या मेडिकल कॉलेजला प्रवेश मिळवला. कॉलेजमध्ये असताना काहीतरी चांगले करायचे, या उद्देशाने मित्रांच्या मदतीने त्याचे छोटे उपक्रम चालू होते, पण ‘काहीतरी’ म्हणजे काय, याचं उत्तर मात्र त्याला मिळत नव्हते. ‘मत्री’ ही पुण्यातील स्वयंसेवी संस्था ‘मेळघाट मित्र प्रकल्पा’च्या अंतर्गत मेळघाटात दरवर्षी पावसाळ्यात धडक मोहीम राबवते. या धडक मोहिमेद्वारे १० दिवस मेळघाटात राहण्याची संधी त्याला मिळाली. पावसाळ्यात शेतीची कामे असल्याने गावातले कोरकू लोक शेतात जातात. अशा वेळी अगदी सहा महिन्यांच्या मुलाला सांभाळण्याची जबाबदारी त्याच्या दोन वर्षांच्या भावंडावर सोपवलेली असते. दिवसभर घरात एकटय़ाच असलेल्या या मुलांची काळजी घेणे, ते आजारी असल्यास योग्य ती औषधे पाजणे, खरूजसारखे त्वचेचे आजार असतील तर मलम लावून देणे, आंघोळ घालणे, नखे कापून देणे असा त्याचा दिवसभराचा सात ते आठ तासांचा कार्यक्रम असायचा. त्या अनुभवाबद्दल प्रियदर्श म्हणाला, ‘हे काम करताना खूप श्रम असले तरी एक वेगळा आनंद आणि समाधानही वाटायचे. त्याच्या ‘काहीतरी’चं नेमकं उत्तर त्याला इथं गवसलं.’
त्यानंतर प्रत्येक सुट्टीत तो मेळघाटात जाऊन राहायचा. ‘मत्री’सारखे इतर गट शोधत असतानाच निर्माण युवा चळवळीत प्रियदर्श सहभागी झाला. तिथे त्याला विविध क्षेत्रातली तज्ज्ञ मंडळी, त्यांचे विचार, मते ऐकण्याची संधी मिळाली, तसेच समविचारी मित्रपरिवार मिळाला.
२००८ साली ऑगस्ट महिन्यात बिहारच्या कोसी नदीला मोठा पूर आला होता. त्यात १८ जिल्हे प्रभावित झाले होते. प्रियदर्श त्या वेळी इंटर्नशिप करीत होता. पूरग्रस्त भागांमध्ये डॉक्टरांची मोठय़ा प्रमाणात गरज होती, म्हणून महाराष्ट्रातून पाठवण्यात येणाऱ्या ‘डॉक्टर्स फॉर यू’ संस्थेच्या डॉक्टरांच्या गटात सामील होऊन प्रियदर्श बिहारला गेला. दोनच दिवसांनी वीज अपघातात त्यांच्यातल्या एका डॉक्टरचा मृत्यू झाला आणि राज्य सरकारने सर्व डॉक्टरांना परत बोलावले. प्रियदर्श मात्र परतला नाही. औषधे होती, पण डॉक्टरांची कमतरता होती, अशा संस्थांमध्ये तो सहभागी झाला. पूरग्रस्त भागात सुरू असलेल्या दोन कम्युनिटी हॉस्पिटलमध्ये (तंबूत उभारलेल्या) त्याने वैद्यकीय सेवा देण्यास सुरुवात केली. औषधांची बॅग घेऊन प्रियदर्श नावेने पाच-पाच तास प्रवास करायचा. जिथे कोणतीच व्यवस्था पोहोचली नाही अशा दुर्गम भागात पोहोचून तो तिथल्या रुग्णांवर औषधोपचार करायचा. लोकांना गावे विचारत औषधांची बॅग रिकामी होईपर्यंत फिरायचे. मिळेल ते खायचे, जागा मिळेल तिथे झोपायचे, असा त्याचा त्या दिवसांतील दिनक्रम होता. वीज, सुरक्षा साधने, दळणवळणाची साधने याची सोय नव्हती. जगाशी संपर्क तुटलेल्या बेटासारखं जिकडे तिकडे फक्त पाणी होतं. खूपदा त्याला भीतीही वाटायची, पण दिल्ली स्कूल ऑफ सोशल वर्क, डॉक्टर्स फॉर यू, मर्सी मलेशिया अशा वेगवेगळ्या संस्था, लोकांसोबत काम करण्याचा त्याचा अनुभव तिथे उपयोगाला आला. आपत्कालीन स्थितीतील कामाची पद्धत, स्वरक्षण करून गटाचे नेतृत्व कसे करावे याबाबत त्याला खूप शिकायला मिळाले. ‘डॉक्टर्स फॉर यू’ संस्थेला या कामासाठी २०११ साली वैद्यकीय क्षेत्रातील ऑस्कर मानल्या जाणाऱ्या ‘ब्रिटिश मेडिकल जर्नल अ‍ॅवार्ड’ने सन्मानित करण्यात आले तसेच २००९ साली ‘सार्क यूथ अ‍ॅवार्ड’ने सन्मानित करण्यात आले, हे या संस्थेच्या गटाचा भाग असलेला प्रियदर्श अभिमानाने सांगतो.
इंटर्नशिप संपवून एप्रिल २००९ साली प्रियदर्श मेळघाटातील काटकुंभ येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून रुजू झाला. इथल्या भागाशी, कोरकू लोकांशी त्याची आधीच नाळ जुळली होती. इथल्या कोरकू लोकांचा डॉक्टरांपेक्षाही बुवा-भगत यांवर जास्त विश्वास आहे. त्यामुळे औषधे घेण्यासाठी त्यांना धाक दाखवला तर ते आपल्या जवळसुद्धा येणार नाहीत, याची त्याला खात्री होती. अशा परिस्थतीत स्थानिकांची मानसिक स्थिती समजून त्यांच्या कलाने उपचार करणे गरजेचे आहे, हे त्याने ताडले. तिथल्या लोकांमधील गैरसमज जसे- गरोदर बाईला जास्त खायला दिले तर बाळ मोठे होऊन बाळंतपणात त्रास होतो, डायरिया झालेल्या व्यक्तीला काही खायला द्यायचे नाही दूर करण्यासाठी त्याने प्रयत्न केले आणि तिथल्या जनतेचा विश्वास त्याने संपादन केला.
या विश्वासामुळेच प्रियदर्शकडे सुरुवातीला जिथे दिवसातून १५ ते २० रुग्ण यायचे, तिथे आता दिवसाला १०० ते १५० रुग्ण येतात. या सगळ्या डॉक्टरांना पसे मिळतात म्हणून ते आपल्या मागे लागतात, असेच कोरकू लोकांना सुरुवातीला वाटायचे. मात्र प्रियदर्शने पुढाकार घेऊन आयोजित केलेल्या आरोग्याविषयीच्या जनजागृती कार्यक्रमांमुळे आरोग्य ही आपली गरज आहे, हे त्यांच्या हळूहळू लक्षात यायला लागले. त्यामुळे या भागातील कुपोषण व बालमृत्यूही उत्तरोत्तर कमी होत आहेत, असे प्रियदर्शने नमूद केले.
एकीकडे जनमानसात बदल घडत असताना इतर सरकारी कर्मचाऱ्यांचा इथल्या प्रश्नांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत नव्हता. प्रियदर्शने जबरदस्ती न करता त्यांच्या समस्या समजून घेत त्यांना प्रेरित करण्याचा प्रयत्न केला. आता तेही आनंदाने प्रियदर्शच्या कामात सहभागी आहेत. या कामाला प्रियदर्शच्या घरच्यांचा पािठबाही आहे आणि सहभागही.
प्रियदर्श सांगतो, ‘एकदा काटकुंभला पूर आला होता. पुराच्या त्या बाजूला एक गरोदर बाई तळमळत होती. पाण्याचा वेग इतका होता की, पोहायची जोखीम पत्करली तर वाहून जाण्याची भीती होती. पण पलीकडे जाणे गरजेचे होते. कमरेपर्यंतच्या पाण्यातून मानवी साखळी करून आम्ही पलीकडे गेलो. त्या बाईला इंजेक्शन, औषधे दिली आणि पाणी कमी होण्याची वाट बघू लागलो. पाणी कमी झाल्यावर दवाखान्याची गाडी पाण्यात घातली. त्यातून तिला दवाखान्यात आणले आणि तिचे बाळंतपण केले. तिचा नवरा भगत होता. गाडीतही त्याची भगतबाजी सुरू होती. आपल्या बायकोचा आणि बाळाचा जीव वाचलेला पाहिल्यानंतर त्याचा आमच्यावर कायमचा विश्वास बसला. तो आजही गावातल्या इतर आजारी लोकांना आमच्याकडे उपचारासाठी पाठवतो. अशा घटनांमधून लोकांचा आमच्यावर आणि आमच्या कामावर जो विश्वास बसला आहे, त्याने खूप समाधान मिळते.’
वैद्यकसेवेदरम्यान त्याला बरे-वाईट अनुभव आले. आणखी एका विचित्र अनुभवाबद्दल त्याने सांगितले. तो म्हणाला, ‘एकदा एक तान्हुलं अगदी मरणाच्या दारात आहे, असे कळले. त्याची आई त्याला दवाखान्यात घेऊन येत नव्हती. याचे कारण, ‘बाळाला दवाखान्यात नेलेस तर तुला सोडून देईन,’ असा दम भरून तिचा नवरा परगावी गेला होता. पोलीस, सरपंच या सर्वाशी चर्चा करून आम्ही त्या बाळाला उपचारासाठी दवाखान्यात नेले. खूप प्रयत्न करुनही ते बाळ वाचले नाही. तिच्या नवऱ्याने तिला सांगितल्यानुसार सोडून दिले, असे नंतर आम्हाला कळले. अशा वेळी आपण केले ते योग्य केले का, असा प्रश्न पडतो.’ हे अनुभव प्रियदर्शला खूप काही शिकवून जातात.
सरकारी व्यवस्था व त्यातल्या अडचणी समजून, आज प्रियदर्श आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने आजूबाजूच्या ४२ गावांमध्ये आरोग्यसेवा पुरवत आहे. त्याही पलीकडे पोचत गावांतील युवकांची शिबिरे, अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्यक्रम, युवकांमध्ये खेळ आणि वाचनाबद्दल जागृती यांसारखे उपक्रम राबवण्यासाठी प्रियदर्श पुढाकार घेतो. गेल्या तीन वर्षांत त्याने स्थानिक लोकांचा विश्वास संपादन केला आहे. यामुळे स्थानिक लोकांचे प्रश्न अधिक चांगल्या रीतीने समजून घेणे आणि त्यावर उत्तर शोधणे प्रियदर्शला शक्य झाले आहे. त्याच्या पुढाकाराने काटकुंभ गावात लोकसहभागातून जनावरांसाठी पाण्याची टाकी व महिलांसाठी सार्वजनिक शौचालये बांधण्याचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे. युवकांमध्ये वाचनसंस्कृती वाढविण्यासाठी मेळघाटात पहिल्यांदाच शरद अष्टेकर या मित्राच्या मदतीने त्याने पुस्तक प्रदर्शन भरवले. कोरकूंना योग्य दर्जाचे शालेय व व्यावसायिक शिक्षण, तत्पर आरोग्यसेवा मिळावी यासाठी मेळघाट शाळा, आयटीआय केंद्र व हॉस्पिटल काढण्यासाठी त्याची धडपड सुरू आहे.
आयटूएच (Investment in Humans) हा युवकांचा गटही त्याने काही मित्राच्या सोबतीने सुरू केला आहे. समाजात बदल घडविण्यासाठी अनेक तरुण वेगवेगळ्या क्षेत्रांत, वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत आहेत. इच्छुक लोकांच्या सहकार्यातून या तरुणांना आवश्यक संसाधने, कौशल्ये, मनुष्यबळ व आíथक मदत करणे व त्यांच्या कामांची माहिती लोकांपर्यंत पोहचविणे या उद्देशाने ‘आयटूएच’ गटाची निर्मिती करण्यात आली आहे.
प्रियदर्शने निवडलेली ही वेगळी वाट आता त्याचे ध्येय बनली आहे. ती वाट कितीही बिकट असली तरी त्यावर निष्ठेने मार्गक्रमण करण्याची ठाम तयारी प्रियदर्शने केली आहे.     
अधिक संपर्कासाठी – priyadarshture@gmail.com
http://i2h.weebly.com/ http://i2hworld.com/