दिवाळीची चाहूल लागताच उत्साहाचे वातावरण पसरायला वेळ नाही लागत. आणि मग साहजिकच हा उत्साह आपल्या ऑफिसच्या वातावरणातही रेंगाळतो. अनेक कंपन्यांमध्ये सणासुदीच्या वेळी ऑफिस सजवायची प्रथा असते आणि वर्षांतून एकदातरी सर्वानी एकत्र येऊन मौजमजा करावी म्हणून ऑफिस पार्टीही असते. अर्थात, सणाच्या व्यतिरिक्तही पार्टी करण्याची अनेक निमित्ते असू शकतात म्हणा! उदा. पुरस्कारांचे वितरण, कंपनीला १०, २०, २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त पार्टी इ..
नोकरीवर नव्याने रुजू झालेल्यांना ऑफिस पार्टीचे अप्रूप वाटणे साहजिकच आहे. या पार्टीबद्दल सर्वाच्याच मनात उत्सुकताही असते. ज्यांना पार्टी कल्चरची सवय नसते, त्यांच्या मनात या पार्टीच्या निमित्ताने अनेक प्रश्नही निर्माण होऊ शकतात. पार्टीला जाण्याआधी कुठल्या गोष्टी माहीत असाव्यात, हे आपण पाहू या-  
* पेहराव – आमंत्रणावर बऱ्याचदा ‘ड्रेस कोड’ लिहिलेला असतो. दिवाळी पार्टीला पारंपरिक पोशाख अगदी योग्य ठरतो, पण जिथे ‘इन्फॉर्मल’ असेल तिथे काय घालून जावे? अशावेळी हे ध्यानात ठेवायला हवे की इन्फॉर्मल  असले तरीही ऑफिसची पार्टी असून, आपण मित्र-मत्रिणींबरोबरच्या पार्टीला घालू तसे सगळ्याच तऱ्हेचे कपडे घालणे योग्य ठरणार नाही. असे अयोग्य पेहराव म्हणजे फाटक्या, कमरेखाली घरंगळणाऱ्या जीन्स, शॉर्ट टॉप्स, पारदर्शक अथवा तोकडे कपडे. फॉर्मल कपडय़ांचा ताठपणा कमी करणारे कपडे सर्वात उत्तम.
* जावे की न जावे? – काही जणांना पार्टी हा प्रकारच आवडत नाही किंवा सहकाऱ्यांबरोबर पार्टीच्या वातावरणात मिसळायला आवडत नाही. पण जर का वरिष्ठांनी ही पार्टी आयोजिली असली तर त्यांचा मान राखण्याकरिता अशा पाटर्य़ाना जरूर उपस्थित राहावे- निदान थोडय़ा वेळाकरिता तरी. याच अनुषंगाने पारितोषिक वितरण समारंभ, निवृत्तीनिमित्त होणाऱ्या समारंभांनाही उपस्थित राहावे. अशा छोटय़ा गोष्टींतूनही आपल्या सहकाऱ्यांसोबतचे संबंध सुधारतात.
* आमंत्रणात लिहिले असले तरच सोबत मित्र-मत्रीण, अथवा घरच्या मंडळींना घेऊन जावे – नसेल तर एकटय़ाने उपस्थित राहणे उत्तम.
* वरिष्ठांनी सुरुवात केल्याशिवाय किंवा त्यांनी आग्रह केल्याशिवाय जेवायला सुरुवात करू नये.
* ज्या समारंभात मद्यपानाची सोय केली जाते, तिथे सतर्कता बाळगण्यात शहाणपण आहे. फुकट मिळते म्हणून बेलगाम पिणाऱ्या अनेकांचा स्वत:वर ताबा राहत नाही. जीभ सल झाली की नको त्या व्यक्तीसमोर नको ते बोलले जाते, नाहीतर भान हरपून सोफ्यावर लोळण घेतली जाते. अशा वर्तनाचे परिणाम नंतर वरिष्ठांच्या टोमण्यातून, सहकाऱ्यांच्या टीकात्मक शेऱ्यांतून नाहीतर कनिष्ठांच्या चेष्टेतून भोगावे लागतात. मदिरा सेवन न करणाऱ्यांना इतरांच्या आग्रहाचा त्रास / चेष्टा सोसावी लागते. म्हणूनच अपेयपान केल्यानंतर  ज्यांचे पाय लटपटतात, त्यांनी फळांचा रस घेणं इष्ट.
* कर्मचाऱ्यांसाठी आयोजिलेल्या पारिवारिक स्नेहसंमेलनात काही गोष्टी लक्षात ठेवाव्या : सजावटीसाठी लावलेली फुले किंवा फुगे तोडू नये. मुलांनी त्यासाठी कितीही हट्ट केला तरी. समारंभाच्या खोलीत लहान मुलांना बेलगाम पळायला परवानगी देऊ नये, त्यांच्या खाण्या-पिण्यावरही लक्ष असलेले बरे. आपल्या अर्धागिनीने इतरांच्या अर्धागिनीबरोबर ‘ऑफिस गॉसिप’ करू नये, हे आधीच सांगितलेले बरे.
* काय बोलावे? : कामाव्यतिरिक्त इतरांशी बोलताना काही जणांना अवघडल्यासारखे होते. एका कोपऱ्यात बसून राहण्यापेक्षा, मोठय़ा संधीचा फायदा घेऊन, जुजबी विषयांवर बोलायला सुरुवात होऊ शकते. ‘नो शॉप टॉक’ हा पार्टीचा नियम असतो तेव्हा आपले संभाषणचातुर्य असे दर्शवता येते.
* कोणाशी बोलावे? : शक्यतो सर्वाशी. इतर डिपार्टमेंटच्या कर्मचाऱ्यांबरोबर मिसळायला ही एक उत्तम संधी असते. आपण स्वत:हून ओळख करून घ्यावी. अशा वेळी झालेली ओळख पुढे आपल्याच कामी येऊ शकते.
* निरोप घ्यायला विसरू नये : ऑफिसचे जवळजवळ सर्व समारंभ हे वरिष्ठांच्या संमतीने होतात. काही हौशी वरिष्ठ पुढाकार घेऊन त्याचे नियोजन करतात. असे असते तेव्हा निघायच्या वेळी वरिष्ठांचा निरोप घेऊन, त्यांचे आभार मानूनच निघावे.
ऑफिस पार्टी ही नात्यांच्या बांधणीची अमूल्य संधी असते. त्याचे सोने कसे करावे, हे आपल्याच हातात असते आणि आपल्याला जर ते मौजमजा करताना जमले तर खूपच छान!