केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत असणाऱ्या डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजीतर्फे बायोटेक इंडस्ट्रियल ट्रेनिंग प्रोग्रॅम- बीआयटीपी : २०१३-२०१४ या विशेष अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यासाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
पाश्र्वभूमी व उद्देश : या अभ्यासक्रमाचा मुख्य उद्देश हा बायोटेक्नॉलॉजी क्षेत्रातील विद्यार्थ्यांना संबंधित उद्योगात मर्यादित स्वरूपात काम करण्याचा सराव व प्रशिक्षण प्राप्त करून देणे हा आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता : अर्जदार विद्यार्थ्यांनी बायोटेक्नॉलॉजीमधील बीई, बीटेक, एमएससी, एमटेक वा एमव्हीएससी यासारखी शैक्षणिक पात्रता २०१२-२०१३ या शैक्षणिक वर्षांत पूर्ण केलेली असावी. त्यांच्या गुणांची टक्केवारी कमीत कमी ५५% असावी व त्यांचा शैक्षणिक आलेख चांगला असायला हवा.
निवड प्रक्रिया : अर्जदारांची निवड परीक्षा संगणकीय पद्धतीने २६ जुलै २०१३ रोजी घेण्यात येईल. त्यांची पात्रता परीक्षेतील गुणांची टक्केवारी व निवड परीक्षेतील गुणांकाच्या आधारे त्यांची अंतिम निवड करण्यात येईल.
कालावधी व पाठय़वृत्ती : निवड झालेल्या विद्यार्थ्यांना वर नमूद केल्याप्रमाणे बीआयटीपी योजनेंतर्गत सहा महिने कालावधीसाठी बायोटेक्नॉलॉजीशी संबंधित उद्योगात विशेष प्रशिक्षण दिले जाईल. या प्रशिक्षणादरम्यान त्यांना दरमहा आट हजार रु. पाठय़वृत्ती देण्यात येईल.
अर्जासह पाठवायचे शुल्क : अर्जासह पाठवायचे शुल्क म्हणून ५०० रु. डेबिट कार्डने अथवा संगणकीय बँकिंग पद्धतीने पाठविणे आवश्यक आहे.
अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क : योजनेच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी http://www.bcil.nic.in  या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता व शेवटची तारीख : विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक ते कागदपत्र आणि तपशिलासह असणारे अर्ज मनोज गुप्ता, डेप्युटी मॅनेजर, बायोटेक कंसॉरटियम इंडिया लिमिटेड (बीसीआयएल), ५ वा मजला, अणुव्रत भवन, २१०, पं. दीनदयाल उपाध्याय मार्ग, नवी दिल्ली- ११०००२ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ३१ मे २०१३.
बायोटेक्नॉलॉजी वा संबंधित विषयातील ज्या पात्रताधारक विद्यार्थ्यांना पाठय़वृत्तीसह उद्योगात विशेष प्रशिक्षण घेऊन आपले करिअर करायचे असेल अशांनी या संधीचा फायदा घ्यावा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा