तुमच्या मनातील कल्पनांचा ओघ जर स्पष्ट आणि व्यवहार्य योजनेत रूपांतरित झाला तर यशस्वी उद्योगाचे ध्येय आकलनास सोपे व सहज साध्य होण्यास मदत होईल.
उद्योग कोणत्याही स्वरूपाचा असू दे, उद्योग योजनेची मूलभूत तत्त्वे साधारण सारखीच आणि बहुतांश ठिकाणी लागू
होणारी असतात.
‘मला उद्योजक बनायचे आहे!’ तर मग काय करावे लागेल?.. गुगलवर तुम्ही फक्त ‘उद्योग कसा सुरू करावा?’ हा प्रश्न विचारायचा अवकाश, तुम्हाला या प्रश्नाची लाखो उत्तरे मिळतील. उद्योजक घडवण्यासाठी मार्गदर्शन करणारी अनेक पुस्तके, लेखही उपलब्ध आहेत. पण हे सर्व करण्यापूर्वी तुम्ही कधी स्वत:लाच हा प्रश्न विचारला आहे का?
उद्योजक होण्यामागे बरीच कारणे असू शकतात. उदा. तुम्हाला श्रीमंत व्हायचे असते, तुम्हाला काहीतरी वेगळे करून दाखवायचे असते, समाजात स्वत:चे स्थान निर्माण करायचे असते किंवा बऱ्याचदा असलेल्या नोकरीपेक्षा जास्त प्रगती करायची असते. कदाचित उद्योजक होणे हे नेहमीच तुमचे ध्येय राहिले असेल. मात्र या सर्वाचा अर्थ तुम्ही उद्योजक होण्याबद्दल ‘पॅशनेट’ आहात असा होतो का? थोडं थांबून स्वत:लाच विचारा- ‘यात माझी पॅशन कुठे आहे?’ उद्योजक बनणे हे तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचण्याचे एक साधन आहे! पण पॅशन ही अशी गोष्ट आहे की ज्यामुळे तुम्ही कोणत्याही अडचणींना तोंड देऊ शकता आणि परिणामी ध्येयाकडे योग्य दिशेने मार्गस्थ होता.
तुम्हाला स्वत:चा उद्योग सुरू करण्याची ओढ लागली आहे आणि जणू काही आता तुम्ही जग जिंकायला तयार आहात! नक्कीच, तुम्ही स्वत:तील उद्योजकाला, उद्यमशीलतेला यशस्वीरीत्या जागृत केलं आहे. आतापर्यंत तुम्ही विशिष्ट वस्तूच्या उत्पादनाबद्दल किंवा ठरावीक सेवा पुरवण्याबाबत निश्चय केला आहात, परिणामस्वरूप तुमच्या मनात नवनवीन कल्पना, अनेकांच्या यशोगाथा, विक्रीबद्दलच्या संकल्पना घोळत आहेत. याच क्षणाला तुम्ही आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. जर तुमच्या मनात उद्योगाची कल्पना असेल तर स्वत:लाच विचारून पाहा- ‘तुमच्या कल्पनेतील उद्योग, तुमचे स्वप्न पूर्ण करेल का?’  तुम्ही उत्पादित केलेल्या वस्तू विकण्याबाबत किंवा सेवा पुरविण्याबद्दल, त्यातून निर्माण होणाऱ्या अडचणींना, औद्योगिक, धंदेवाईक वातावरणातील गुंतागुंतीला सामोरे जाण्यासाठी पॅशनेट आहात का? एखाद्या गोष्टीचे पॅशन असणे एक बाब आहे आणि तिचा पाठपुरावा करणे वेगळी बाब आहे. एखाद्या गिर्यारोहकाला त्याच्या अंगभूत क्षमता किंवा कौशल्यांपेक्षा, शिखरापर्यंत पोहोचण्याची तीव्र इच्छा सर्व शारीरिक वेदनांवर आणि मृत्यूच्या भयावर मात करून पुढे जाण्यास प्रवृत्त करते. एखादे ध्येय साध्य करण्यासाठी जेव्हा कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीत येणाऱ्या सर्व आव्हानांचा सामना करण्यास तुम्ही सज्ज होता तेव्हाच तुम्ही तुमच्या ध्येयाबद्दल पॅशनेट आहात, असे म्हणता येते.
प्रसिद्ध लेखक ‘मार्क ट्वेन’ यांनी असे लिहिले आहे की ‘द टू मोस्ट इम्पॉर्टन्ट डेज इन युअर लाइफ आर द डे यू वेअर बॉर्न अँड द डे यू फाइंड आउट व्हाय.’
तुमच्या उद्योगाची संकल्पना अधिक सुस्पष्ट होण्यासाठी खाली दिलेली वाक्य पूर्ण करा.
‘ मी (वस्तू/ रचना/ सेवा) निर्मितीबाबतीत पॅशनेट आहे. यामुळे ग्राहकांना/ ग्राहकांवर उपयोग/ परिणाम होईल.
आता तुमच्या उद्योगाचे ब्रीदवाक्य तयार आहे!
उद्योग कार्याचा प्रारंभ करताना-
उद्योगात उडी घेताना प्राथमिक उद्देश उद्योग टिकवून ठेवण्याचा असायला हवा. मुळात उद्योग कार्यान्वित राहील, याची काळजी घ्यायला हवी. उदा. तुम्ही पहिल्यांदा पाण्यात उडी घेता तेव्हा प्रथम श्वास घ्यायचा प्रयत्न करता. श्वास घेऊन जिवंत राहता. पुरेसा ऑक्सिजन मिळवल्यानंतर पुढे पोहण्याचा विचार करता. तसेच उद्योगधंद्याला आवश्यक ऑक्सिजन म्हणजे ‘पसा’ किंवा ‘खेळते भांडवल’ (वìकग कॅपिटल). ज्या उद्योगांना हा आवश्यक ऑक्सिजन किंवा पसा मिळू शकत नाही असे उद्योग आíथक अडचणीत येऊन कालांतराने डबघईला येतात. उद्योगासाठी आíथक भांडवल उभे करण्याचा अपारंपरिक स्रोत म्हणजे ‘ग्राहक’. व्यवस्थापन शास्त्रातील गुरू, पीटर ड्रकर यांच्या मते ‘उद्योगामुळेच ग्राहकवर्गाची निर्मिती होते. तुमचे ग्राहक कितपत संतुष्ट आहेत किंवा तुमच्या उत्पादनाची, सेवेची ग्राहकांवरील परिणामकारकता, धंद्यात होणाऱ्या अर्थप्राप्तीच्या प्रमाणावरून पडताळता येते.’
तेव्हा उद्योगात टिकाव धरण्यासाठी किती ऑक्सिजनची म्हणजेच पशांची तुम्हाला गरज असते? तुम्ही उच्छ्वासावाटे जेवढा कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकता त्यापेक्षा जास्त! साध्या शब्दात सांगायचे म्हणजे तुमची धंद्यातील पशांची आवक ही खर्चापेक्षा जास्त असली पाहिजे. सुरुवातीच्या काळात व्यवसायाची आíथक बाजू बळकट करण्यासाठी ग्राहकांना आकर्षति करण्याचे विविध मार्ग अवलंबणे गरजेचे आहे. आणि इथेच तुमचे पॅशन तुम्हाला नवनवीन मार्ग शोधण्यास आणि त्यांचा पाठपुरावा करण्यास उद्युक्त करेल. म्हणूनच उद्योगनिर्मितीचे पॅशन आणि त्याचे प्रभावी परिणाम हेच कोणत्याही उद्योगाचे मूलभूत प्रेरक असतात.
आता तुम्ही उद्योग सुरू केला आहात, तेव्हा उद्योगाच्या निर्वेध वाटचालीसाठी शक्य होईल तितका पसा (खेळते भांडवल) अर्थात ऑक्सिजन जमवण्यावर लक्ष केंद्रीत करा. पण केवळ निधीची उभारणी हा उद्योग चालवण्यामागील आपला हेतू नाही. आपल्याला असलेले उद्योजक बनण्याचे पॅशन आपण विसरून चालणार नाही. धंद्यासाठीचा पसा किंवा प्राणवायू जमवणे हे आपले अंतिम उद्दिष्ट नसून ते फक्त ध्येयापर्यंत पोहोचण्याचे साधन आहे. बहुतेक उद्योगांतून अशा पॅशनचाच अभाव असतो. फक्त व्यावहारिक घटकांवर भर दिला जातो आणि त्यामुळे असे उद्योग फार काळ तग धरू शकत नाहीत. तेव्हा पाण्यात उडी घेऊन फक्त श्वास घेण्यावरच थांबू नका.
परीक्षण करावे असे मुद्दे
* आपल्या उद्योजक बनण्याच्या उज्ज्वल संकल्पनेच्या अनुषंगाने येणाऱ्या काही महत्त्वपूर्ण बाबींची खातरजमा करून घेऊ.
* तुम्ही तुमचा ग्राहक वर्ग निश्चित केला आहे का?
* ग्राहकांना तुमच्या उत्पादनाची किंवा सेवेची कितपत गरज आहे?
* तुमच्या उत्पादनाला किंवा सेवेला सध्या मागणी आहे का? किंवा सुप्त मागणी आहे का?
* तुमचे उत्पादन किंवा सेवेद्वारा ग्राहकांच्या गरजांची पूर्तता होईल का?
* प्रस्तावित उत्पादनाच्या निर्मितीसाठी किंवा सेवा पुरवण्यासाठी कोणत्या घटकांची आवश्यकता आहे?
* उत्पादन प्रक्रिया किंवा सेवा पुरवठय़ासाठी अंदाजे किती खर्च (कार्बन डायऑक्साईड) अपेक्षित आहे?
* उद्योगासाठी किती आíथक भांडवल (ऑक्सिजन) उभारणे गरजेचे आहे?
* कोणकोणत्या मार्गाने आíथक भांडवल उभारता येईल?
तुम्ही तुमचा ग्राहकवर्ग आधीच ओळखला पाहिजे, जेणेकरून त्यांना आकृष्ट करण्याचे वेगवेगळे मार्ग शोधण्याबद्दल, जास्तीतजास्त ग्राहकांना उत्पादनांच्या खरेदीसाठी प्रवृत्त करण्यासाठीच्या युक्त्यांबदल तुम्ही विचार करू शकता. हेरून ठेवलेल्या ग्राहकवर्गाचे अभ्यासपूर्ण अवलोकन करून उदा. उत्पादन किंवा सेवा वापरणाऱ्या ग्राहकांचे वयोगट, खरेदीच्या, खर्चाच्या सवयी, त्यांची मासिक आíथक प्राप्ती यांचा पद्धतशीर अभ्यास करून तुम्ही तुमच्या उत्पादनाची किंवा सेवेची व्यवहार्यता पडताळून पाहू शकता. त्याचबरोबर उद्योजकतेच्या क्षेत्रात नव्याने पाऊल टाकताना, आपल्याला कोणकोणत्या स्पर्धकांना तोंड द्यावे लागणार आहे याचाही अंदाज येतो. समांतर उद्योगातील यशस्वी उद्योजकांचे अनुभव, कार्य (इंटरनेटच्या गुगल साइटवरून) जाणून घेण्याची हीच योग्य वेळ आहे. तसेच अपयशी ठरलेल्या उद्योजकांच्या कहाण्याही आपल्याला खूप काही शिकवून जातात. म्हणतात ना, ‘पुढच्यास ठेच मागचा शहाणा’.
तुमच्या मनातील कल्पनांचा ओघ जर स्पष्ट आणि व्यवहार्य योजनेत रूपांतरित झाला तर यशस्वी उद्योगाचे ध्येय आकलनास सोपे व सहज साध्य होण्यास मदत होईल. उद्योग कोणत्याही स्वरूपाचा असू दे, उद्योग योजनेची मूलभूत तत्त्वे साधारण सारखीच आणि बहुतांश ठिकाणी लागू होणारी असतात.
परीक्षेत ८०% मिळवण्यासाठी तुम्ही कसा अभ्यास कराल? आणि केवळ उत्तीर्ण होण्यासाठी कसा अभ्यास कराल? दोन्ही वेळी तुमचा अभ्यासाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सारखाच असेल का? हार टाळण्यासाठी खेळण्यापेक्षा जिंकण्याच्या उद्देशाने खेळायला शिका. ईप्सित स्थळी आपला गाडा ओढून नेण्यासाठी आपल्यातील पॅशन इंधनाचे काम करते. मग प्रवासासाठी तुमच्याकडील इंधनाची टाकी पुरेशी भरलेली आहे ना?    
 devang.kanavia@acumen.co.in

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा