विज्ञान म्हणजे एखाद्या घटनेबद्दलचे तर्कसुसंगत असे विशेष ज्ञान, त्या ज्ञानाचा व्यवहारातील वापर म्हणजे तंत्रज्ञान. एखादी गोष्ट पडताळून पाहण्यासाठी विज्ञान-तंत्रज्ञानाचा आधार घेत केलेली तर्कसुसंगत आणि पद्धतशीर कृती म्हणजे विज्ञान प्रकल्प!
गोकुळात कृष्णाला लोणी खायला मिळावं, म्हणून घरोघरी गोपिका ताक घुसळून लोण्याचा गरगरीत गोळा काढत असत. भल्याथोरल्या मातीच्या घटात स्वत:च्या उंचीएवढी रवी घेऊन ताक घुसळणाऱ्या गोपिकांची अनेक चित्रं आपण सर्वानी कधी ना कधीतरी पहिली आहेत. शेकडो वर्षांपूर्वीच्या अनेक गोष्टी आता बदलल्या असल्या तरी काही गोष्टी मात्र आजही टिकून आहेत. अर्थात त्यांचं स्वरूप काळानुरूप बदललंय इतकचं! ताक घुसळून लोणी काढायची प्रक्रिया आजही घरोघरी केली जाते. फक्त रवी आणि ताकाचं भांडं यांचा आकार मात्र आता सर्वच बाजूने रोडावलाय!
आता एक विज्ञान प्रकल्प करूया. समजा, ‘सायीचं ताक घुसळून त्यातून कमीत कमी वेळात जास्तीत जास्त लोणी मिळवणे,’ असा आपला विज्ञान प्रकल्प आहे. ‘साय असलेलं ताक घुसळलं की लोणी येतं’ हे एक वैज्ञानिक सत्य आहे. सर्वात पहिल्यांदा आपल्याला ताक घुसळलं की लोणी येतं हे कसं आणि कधी समजलं? आपण लहानपणी कधीतरी कोणाला तरी ताक करताना पाहिलं असणार. म्हणजे सर्वात प्रथम आपण निरीक्षण केलं. अनेक वेळा निरीक्षण केल्यावर आपण ठरवलं की आपणही ताक घुसळून लोणी काढून पाहू, पण आपल्या ताकातून जास्तीत जास्त लोणी आलं पाहिजे. आपला उद्देश साध्य करायला आपल्याला काय करावं लागेल?
लोणी काढायच्या घटनेचं सखोल निरीक्षण तर आपण केलेलंच आहे. शिवाय आपण आपल्या आईकडून, आजीकडून, मावशी-मामी कडून, शेजाऱ्यांकडून त्यांच्या लोणी काढायच्या पद्धतीविषयी काही ‘टिप्स’ घेऊ या. त्यातच हल्लीच्या पद्धतीनुसार ‘नेट’वरूनही माहिती काढू या. हा सगळा भाग म्हणजे आपल्या प्रकल्पाविषयीचे ‘संदर्भ’ जमवणं! सगळ्या संदर्भाचा अभ्यास करत आपण आपल्या प्रयोगाची पद्धत ठरवू या. प्रयोगासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी करू या आणि चला प्रयोग करूया.
पण आता सायीचं ताक घुसळून लोणी काढणं हा ‘विज्ञान प्रकल्प’ आपण करणार आहोत. तेव्हा सारं काही वैज्ञानिक रीतीनुसार झालं पाहिजे. सर्वात प्रथम आपण सायीचं ताक मोजून घेऊ. सर्व माहितीची एका वहीत व्यवस्थित नोंद करून ठेवू या. आता ताक एका भांडय़ात घेऊ या. त्यात रवी घालून घुसळायला सुरुवात करूया. सर्वात महत्त्वाचं म्हणजे घुसळायला सुरुवात केली त्या वेळेची नोंद करायला विसरायचं नाही, बरं का? म्हटलं ना, सारं काही रीतसर झालं पाहिजे. आता लोण्याचा
गोळा तरंगायला लागेल. घुसळणं थांबवून लोणी ताकातून वेगळं करू या आणि लोण्याचं माप बघू या. ‘अमुक एवढय़ा मापाचं ताक, अमुक एवढी मिनिटं घुसळलं की साधारणपणे अमुक एवढय़ा मापाचं लोणी मिळतं,’ असा निष्कर्ष आता आपण मांडू शकू का? नाही. एक तर असं एका प्रयोगातून निष्कर्ष काढणं म्हणजे विज्ञान प्रकल्प नव्हे. दुसरं म्हणजे, आपल्या प्रकल्पाचा उद्देश कमीत कमी वेळात जास्तीत जास्त लोणी
काढणं हा होता. तेव्हा आपला उद्देश सफल करण्यासाठी आपल्याला आणखी काही प्रयोग करून पहावे लागतील. त्यासाठी स्वत:लाच काही प्रश्न विचारू या.
१.    भांडय़ाचा आकार कसा असावा? मोठं तोंड, लहान तोंड, मोठा घेर, कमी घेर?
२.    भांडं धातूचं असावं की मातीचं?
३.    रवी किती लांबीची असावी?
४.    रवी ताकात एकाच िबदूवर घुसळत राहावी की सतत तिची जागा बदलावी?
५.    रवी ताकामध्ये वरच्या वर घुसळावी की अगदी आत खोलवर धरून घुसळावी की थोडी खोलवर धरून घुसळावी?
६.    ताक घुसळताना ते थंडगार असावं की सर्वसाधारण तापमानाचं असावं की थोडं कोमट असावं?
या आणि अशा अनेक प्रश्नांचं निराकरण करण्यासाठी अनेक प्रयोग करू या. प्रत्येक वेळेला कोणतीतरी एकच बाब बदलू या. म्हणजे भांडय़ाचा आकार बदलून पाहाणार असलो तर रवीची जागा कुठे असावी यात बदल नको. नाहीतर जास्त लोणी, नेमकं कशामुळे आलं, भांडय़ाच्या आकारामुळे की रवीची जागा बदलल्यामुळे हे ठरवता येणारं नाही. सर्व प्रयोगांच्या नीट नोंदी करू या. सरते शेवटी सर्व नोंदींचं विश्लेषण करत आपल्याला नेमक्या कुठल्या परिस्थितीत ‘कमीत कमी वेळात जास्तीत जास्त लोणी काढता येईल,’ त्याचा एक ढोबळ सिद्धांत मांडता येईल.   
म्हणजे एवढा उपद्व्याप करून ढोबळच सिद्धांत का? असा प्रश्न आपल्या मनात डोकावेल. ढोबळ म्हणण्याचं कारण असं की पुन्हा सर्व परिस्थिती तशीच ठेवली तर तेवढय़ाच वेळात तेवढय़ाच प्रमाणात लोणी येतं हे आपल्याला पुन्हा पुन्हा प्रयोग करून पडताळून पहावं लागेल. अनेक वेळा पडताळल्यावरदेखील जर आपण त्याच निष्कर्षांप्रत पोहोचत असू तर आपला सिद्धांत थोडासा पक्का होईल. अर्थात पण थोडासाच बरं का! कारण लोण्याचं प्रमाण आपण कुठल्या कंपनीच्या दुधाची साय वापरतोय यावर आणि अश्या बऱ्याच इतर गोष्टींवरही अवलंबून आहे.
त्यातच या प्रकल्पातील सर्वात महत्त्वाची बाब आपण अजून लक्षातच घेतली नाही. ती म्हणजे आíथक बाजू! या सर्व प्रकल्पाला नेमका किती खर्च आला आणि लोणी विकून त्यात मिळणाऱ्या रकमेचा काही आíथक फायदा होईल का? किंवा जेवढं लोणी आपण काहीएक रक्कम खर्च करून मिळवलं तेवढं लोणी एरवी बाहेर केवढय़ाला मिळालं असतं? याचा अंदाज मांडणं हा कोणत्याही विज्ञान प्रकल्पाचा अपरिहार्य भाग असायला हवा. व्यवहाराची बाजू असल्याशिवाय विज्ञान प्रकल्प पूर्णच होऊ शकत नाही.
हा झाला विज्ञान प्रकल्प करण्याचा एक नमुना! आपला उद्देश साधण्यासाठी या प्रकल्पात आपण प्रयोगांचा वापर केला. पण आपला उद्देश जर मंगळावर नेमकं वातावरण कसं आहे हे जाणणं असेल तर त्यासाठी प्रयोग करायला मंगळावर जाणं शक्य नाही. अशा वेळेला खूप साऱ्या संशोधकांनी लिहून ठेवलेली माहिती गोळा करून, ती वाचून, त्याचं व्यवस्थित संकलन करून आपला निष्कर्ष काढावा लागेल. किंवा एखाद्या प्रकल्पात एखादी प्रतिकृती तयार करून त्यावरून प्रयोग करावे लागतील तर कधी प्रतिकृती तयार करणं हाच प्रकल्प असेल. कधी कधी संबंधित लोकांच्या मुलाखती घेऊन, तर कधी संबंधित व्यक्ती किंवा संस्थांना भेटी देऊन त्यानुसार प्रकल्प करावा लागेल. हे प्रकल्पांचे विविध प्रकार आहेत. उद्देशानुसार प्रकल्पाचा प्रकार ठरवावा. पण विज्ञान प्रकल्प कुठलाही असो, त्याचं मूळ ढाचा हा वर सांगितल्याप्रमाणेच असतो.
सारांश काय, तर विज्ञान प्रकल्प करण्यासाठी विज्ञान, तंत्रज्ञान आणि प्रकल्प या संकल्पनांचा अर्थ लक्षात घ्यावा लागतो. विज्ञान म्हणजे एखाद्या घटनेबद्दलचे तर्कसुसंगत असं विशेष ज्ञान, त्या ज्ञानाचा व्यवहारातील वापर म्हणजे तंत्रज्ञान! एखादी गोष्ट पडताळून पाहण्यासाठी विज्ञान तंत्रज्ञानाचा आधार घेत केलेली तर्कसुसंगत आणि पद्धतशीर कृती म्हणजे विज्ञान प्रकल्प!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा