वाणिज्य शाखेचे ज्ञान असलेल्या युवावर्गासाठी एक वेगळी आणि आव्हानात्मक अशी करिअरची संधी उपलब्ध आहे.
सध्या इजिप्त असो किंवा अस्वस्थ हाँगकाँग, जगाच्या कानाकोपऱ्यात विद्यमान राजकीय परिस्थितीबद्दल अशांतता, असंतोषाचे वातावरण आहे. राजकीय नेतृत्वाने देशाच्या नागरिकांना गृहीत धरणे, नागरिकांच्या करसंचयातून उभ्या राहिलेल्या निधीचा हवा तसा वापर करणे, या वापराबद्दल उत्तरदायित्व किंवा जबाबदारी नाकारणे, वाढती महागाई अशा सगळ्या बाबींमुळे सामान्य माणसाचे जीवन मेटाकुटीस आले आहे. पण हे सगळे मुद्दे माहिती असले तरीही भ्रष्टाचार नेमका किती आहे, हे मात्र आपल्याला कळत नसते. विनोद राय हे नाव आठवते आहे? भारताचे नियंत्रक आणि महालेखापाल.. राष्ट्रकुल स्पर्धामधील आíथक घोटाळ्यापासून ते कोळसा घोटाळ्यापर्यंत आणि महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेपासून ते राज्यातील सिंचनाच्या घोटाळ्यापर्यंतची सर्व माहिती ज्यांच्या कार्यालयाने लोकांसमोर आणली आणि भारताच्या नागरिकांना किमान ‘चालू’ घडामोडींची स्पष्ट माहिती दिली असे विनोद राय आणि भारताचे नियंत्रक आणि महालेखापाल यांचे कार्यालय.
आपले ज्ञान देशाच्या हितासाठी वापरताना त्याद्वारे जर आपल्याला योग्य आणि सन्मानाने जीवन कंठता येईल असा मोबदला मिळणार असेल आणि शिवाय लोकप्रतिनिधींना उत्तरदायी करण्यासाठी काही प्रयत्न करता येण्याजोगे असतील, तर.. म्हणूनच या क्षेत्रातील संधी रंजक आहेत.
भारताचे नियंत्रक आणि महालेखापाल यांचे कार्यालय (कॅग)
भारतीय राज्यघटनेच्या पाचव्या भागातील पाचव्या प्रकरणात या पदाचा उल्लेख आहे. कलम १४८ ते कलम १५१ ही कलमे या पदाच्या कार्यालयाची माहिती स्पष्ट करतात. या कार्यालयाचे अधिकार, त्यांची व्याप्ती आणि मर्यादा स्पष्ट करतात. विशेष म्हणजे या कार्यालयाने दिलेले अहवाल हे संसदेच्या पटलावर चच्रेसाठी ठेवणे बंधनकारक असते. तसेच हे कार्यालय आपले अहवाल थेट राष्ट्रपतींना सादर करते. म्हणजेच या कार्यालयाला घटनेने दिलेली सुरक्षितता आहे.
या कार्यालयातील पदे
सामान्यपणे लेखापरीक्षण करण्यासाठी कॅग ऑफिसर, त्यापेक्षा वरिष्ठ पद म्हणजे भारतीय महसूल सेवा किंवा भारतीय लेखा आणि खतावणी सेवा (इंडियन ऑडिट अॅण्ड अकाउण्ट सíव्हसेस) अशा अखिल भारतीय स्वरूपाची पदे या कार्यालयात असतात. केंद्रीय लोकसेवा आयोग आणि केंद्रीय कर्मचारी चयन आयोग यांच्यामार्फत या परीक्षा घेतल्या जातात.
परीक्षेचे स्वरूप आणि अभ्यासक्रम
केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत भारतीय प्रशासकीय सेवांसाठी म्हणून जी परीक्षा घेतली जाते त्याच परीक्षेद्वारे भारतीय महसूल सेवा आणि भारतीय लेखा सेवेतील अधिकाऱ्याची भरती केली जाते. पण त्याशिवाय केंद्रीय कर्मचारी निवड आयोगाद्वारेही कनिष्ठ पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली जाते. या परीक्षेचे स्वरूप बहुपर्यायी असून ती परीक्षा दोन टप्प्यांत घेतली जाते. दोन्ही टप्प्यांवर ही परीक्षा बहुपर्यायी स्वरूपाचीच असते. अर्थव्यवस्थेबाबत विशेष ज्ञानाबरोबरच, चालू घडामोडी, आधुनिक भारताचा इतिहास, भारतीय संविधानाचे प्राथमिक ज्ञान, नागरिकशास्त्र, भारताचा भूगोल, त्यानुसार असलेली औद्योगिक रचना आणि गणित-संख्याशास्त्र आदी बाबींचे ज्ञान या परीक्षेद्वारे तपासले जाते. सामान्यपणे वाणिज्य विद्याशाखेच्या पदवीधर विद्यार्थ्यांना तसेच गरजेनुसार कोणत्याही शाखेतील पदवीधरांना ही परीक्षा देता येऊ शकते.
विशेष म्हणजे, सनदी लेखापालांसाठीही (सी.ए) कॅग कार्यालयात पदे असतात. त्यांच्यासाठी स्वतंत्र परीक्षा घेण्यात येते. त्या परीक्षेचा अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धती कॅगच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे राज्यासाठी तसेच राष्ट्रीय पातळीवर या कार्यालयातील पदांसाठी भरती केली जाते.
कामाचे स्वरूप
सामन्यपणे राज्याचे, देशाचे कायदे समजावून घेत आंतरराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय मानांकनांनुसार लेखापरीक्षण करणे, त्यानुसार आपले अहवाल तयार करणे, शासकीय कामकाजातील दोष आणि उणिवा दाखवून देणे, त्यावर कोणत्या उपाययोजना कठोरपणे राबविण्याची गरज आहे हे लक्षात घेत, त्यांची शिफारस करणे असे या कार्यालयातील कामाचे स्वरूप असते.
केंद्र शासनाची आणि संविधानात नमूद केलेली सेवा असल्याने या कार्यालयात काम करणाऱ्यांना अत्यंत उत्तम आणि सन्मानाने जीवन जगता येईल, असे वेतन असते.
जर केंद्रीय लोकसेवा आयोग किंवा केंद्रीय कर्मचारी चयन आयोग यांच्यामार्फत या परीक्षा घेतल्या जात असतील तर या स्वतंत्र लेखाचे प्रयोजन काय? तर आपल्याला करिअर निवडताना नेमकेपणा यावा, ज्या क्षेत्रात जायचे त्याबद्दल आत्मीयता आणि अभिमान असावा तसेच मुख्य म्हणजे परीक्षा देताना आपण ती का देत आहोत आणि कोणत्या पदासाठी देत आहोत, याचे स्पष्ट भान असावे, म्हणून स्वतंत्रपणे या स्वतंत्र लेखाचे प्रयोजन.
कॅग : भ्रष्टाचाराला वेसण घालणारे आव्हानात्मक क्षेत्र
वाणिज्य शाखेचे ज्ञान असलेल्या युवावर्गासाठी एक वेगळी आणि आव्हानात्मक अशी करिअरची संधी उपलब्ध आहे. सध्या इजिप्त असो किंवा अस्वस्थ हाँगकाँग, जगाच्या कानाकोपऱ्यात विद्यमान
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 08-07-2013 at 08:24 IST
मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cag challenging career field