आपला विहित अभ्यासक्रम पूर्ण करून प्राप्त यशासह ‘कॅम्पस ते कॉर्पोरेट’ अशा नव्या क्षेत्रात प्रवेश करणे हा संबंधित युवा उमेदवाराच्या आयुष्यातील एक महत्त्वपूर्ण टप्पा असतो. या नवागतांची नेमणूक ही संबंधित कंपनी व्यवस्थापनासाठीसुद्धा तेवढीच महत्त्वाची असते, कारण नव्याने येणाऱ्या शिक्षित आणि उत्साही युवकांमधूनच उद्याचे व्यवस्थापन- नेतृत्व घडत असते.
नव्याने येणारे उमेदवार येताना त्यांच्या संबंधित विषय वा अभ्यासक्रमाद्वारे प्राप्त होणाऱ्या शिक्षणाच्या जोडीलाच आशाआकांक्षा, उमेद, काम-कर्तृत्वाच्या संदर्भातील त्यांच्या अपेक्षा-जिद्द, महत्त्वाकांक्षा इ. सारे घेऊन येतात. या साऱ्यांचा मेळ घालून कंपनीत नव्याने येणाऱ्यांची कंपनीची कार्यपद्धती, कामकाजविषयक संस्कृती इत्यादींशी मेळ घालून अशा युवा सहकाऱ्यांची जडणघडण करणे हे आजच्या अनुभवी वा प्रस्थापित व्यवस्थापकांपुढील सर्वात मोठे आव्हान असते.
आजच्या व्यवस्थापकांच्या संदर्भात हे काम आव्हान जरी असले तरी ते अशक्य नसून त्यासाठी संबंधित वरिष्ठ वा व्यवस्थापकांनी पुढील सात मुद्दय़ांचा विचार करून त्यानुसार प्रसंगानुरूप वा गरजेनुसार शिक्षक-प्रशिक्षक-मार्गदर्शकाची भूमिका पार पाडणे केवळ उमेदवार-व्यवस्थापकांनाच नव्हे तर व्यवस्थापनासाठीसुद्धा दीर्घकालीन स्वरूपात फायदेशीर ठरते.
व्यवस्थापन क्षेत्रातील या सात सूत्री सप्तपदीत प्रामुख्याने पुढील मुद्दय़ांचा समावेश करता येईल.
कंपनीच्या व्यवहारातील ‘ग्राहक’ संकल्पनेला सर्वोच्च प्राधान्य : कंपन्यांमध्ये नव्याने येणारे, विशेषत: व्यवस्थापनविषयक अभ्यासक्रमाच्या पाश्र्वभूमीसह येणाऱ्या पात्रताधारक उमेदवारांजवळ संबंधित क्षेत्र वा विषयाचे प्रगत वा अद्ययावत ज्ञान असले तरी त्यांना औद्योगिक क्षेत्रातील व्यवहार वा व्यावसायिक बारकावे इ.ची पुरेशी माहिती असतेच, असे नाही. विशेषत: कुठल्याही व्यवसायातील ग्राहक आणि ग्राहकसेवा कसे सर्वतोपरी वा महत्त्वपूर्ण आहे याची तपशीलवार माहिती या नव्याने येणाऱ्या युवा उमेदवारांना करून दिल्यास त्यांची नाळ त्या-त्या व्यवस्थापन-व्यवसाय प्रक्रियेशी जुळण्यास मदत होते.
व्यांच्या नवनव्या कल्पना आणि त्यांचे फायदे : ठराविक वा चाकोरीबद्ध स्वरूपात वर्षांनुवर्षे चालणाऱ्या व्यवसाय प्रक्रियेमध्ये नव्या कल्पना- कार्यपद्धती, धोरणात्मक नीती इ. प्रसंगी फार महत्त्वपूर्ण ठरतात. त्यामुळे नव्याने आपले करिअर वा कारकीर्द सुरू करणाऱ्यांनी केवळ साचेबद्ध पद्धतीनेच विचार व कृती न करता आपल्या सूचना अवश्य कराव्यात व त्यांच्या अशा सूचनांचा त्यांचे व्यवस्थापक व व्यवस्थापनानेसुद्धा मोकळेपणाने स्वागत करून प्रसंगी त्यांना प्रोत्साहनसुद्धा द्यावे.
सहकार्यच नव्हे तर समन्वय : कुठलीही मोठी वा व्यापक बाब ही कुणा एका व्यक्तीच्या प्रयत्नाने कधीच शक्य होत नाही. त्यासाठी व्यापक-सामूहिक प्रयत्न करून त्याला समन्वयाची जोड देणे आवश्यक असते. अशा समन्वयी प्रयत्न आणि विचारातूनच विशिष्ट कंपनीची कार्यसंस्कृती विकसित होत असते. यातूनच परस्पर पूरक व उत्पादक वातावरणाची निर्मिती होते.
ही बाब जर कंपनीतील अनुभवी व वरिष्ठांनी त्यांच्याकडे नव्याने आलेल्यांना समजावून सांगितली तर ते नवागतांसाठी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन ठरेल. नव्याने येणाऱ्यांनीसुद्धा प्रसंगी आपली शैक्षणिक पात्रता-पाश्र्वभूमी केवळ यावरच अवलंबून न राहता अशा कार्यपद्धतीचा स्वीकार आणि अवलंब केल्यास ते त्यांच्यासाठी दीर्घकालीन व मोठय़ा स्वरूपात लाभदायी ठरू शकते.
अधिक आणि मोठी जबाबदारी स्वीकारणे : मर्यादित स्वरूपाचे व चाकोरीबद्ध काम करणे आणि असेच काम करीत राहणे हे दिवस आता केव्हाच इतिहासजमा झाले आहेत. नवीन स्वरूपाचे व नव्या प्रकारचे काम करताना व तसे केल्यामुळे त्याचे फायदे संबंधित कर्मचारी व संस्था अशा उभयतांना होत असतात.
नव्याने रुजू होणाऱ्या व विशेषत: प्रथमच आपले करिअर सुरू करणाऱ्यांना त्यामुळे त्यांच्या शिक्षण पात्रतेचा व्यावहारिक उपयोग व्यवसायाच्या दृष्टीने करता येतो व यातूनच खऱ्या अर्थाने व्यावसायिक व्यवहारज्ञान त्यांना प्राप्त होते. संख्यात्मकदृष्टय़ा सांगायचे झाल्यास वरिष्ठांनी आपल्या नव्या सहकाऱ्यांना, सदस्यांना त्यांच्या ज्ञानासोबतच कौशल्यवृद्धीची मोठी मदत करण्याची संधी या निमित्ताने प्राप्त होते असे दुहेरी फायदे यातून संभवतात.
संपर्क सूत्र : सद्यस्थितीत कामाच्या ठिकाणी परस्परसंबंध फार महत्त्वपूर्ण ठरतो. व्यावसायिक संबंध- संपर्कातून कामाच्या संदर्भात प्रत्यक्ष अनुभवावर आधारित ज्ञान, माहिती, व्यावहारिक तोडगे, समस्यांची सोडवणूक करण्याच्या संदर्भात मार्गदर्शन इ. फायदे होत असल्याने ही बाब लक्षात ठेवून कामकाजाच्या संदर्भात संपर्कावर आधारित कामाची पद्धत सर्वानाच फायदेशीर ठरते ही बाब लक्षात ठेवणे गरजेचे असते.
आजकाल तर संगणकीय पद्धतीवर आधारित संपर्क पद्धतींमुळे तर कामकाजाच्या संदर्भातील माहितीचे आदानप्रदान, मार्गदर्शन, थेट संवाद, समस्यांची सोडवणूक इ. फायदे सहजगत्या होत असल्याने तर तरुण पिढीने त्याचा फायदा घेणे अधिक प्रभावीपणे व परिणामकारकरीत्या शक्य झाले आहे.
शिक्षणातील सातत्यासह प्रशिक्षण : महाविद्यालयीन वा व्यवस्थापनपर शिक्षण ही करिअरची पहिली पायरी वा सुरुवात असते व त्यानंतर पुढचा प्रवास व वाटचाल करणे संबंधितांच्या हातात असते. ही भावना नवागतांनी ध्यानी घेणे गरजेचे व त्यांच्याच हिताचे असते. थोडक्यात म्हणजे शिक्षणाची पूर्तता ही प्रशिक्षण प्रत्यक्ष काम व कौशल्यप्राप्तीद्वारा होत असते. याची जाणीव ठेवून आपले शिक्षण पूर्ण केल्यावर आपली शैक्षणिक पात्रताविषयक इतिकर्तव्यता झाली, असे न समजता पुढील कालावधीत त्याला कामाचे स्वरूप व पद्धती यांची जोड देऊन अद्ययावत प्रशिक्षण मिळवणे आवश्यक ठरते. ही बाब विशेषत: नवागतांनी लक्षात घेणे आवश्यक आहे.
परस्पर आदर : प्रत्येकाच्या व्यक्तिमत्त्वाची काही वैशिष्टय़े असतात. त्यांची कार्यविशेषता असते. कामामुळे व कामाच्या संदर्भातील कौशल्यांमुळे संबंधित व्यक्तीला विशेष मान्यता-आदर मिळत असतो. यासंदर्भात वय व प्रसंगी पदसुद्धा गौण ठरते. परस्पर आदरभावामुळे परस्परसंबंध सुधारून त्याद्वारे कामाच्या ठिकाणचे वातावरण पोषक- परस्परपूरक बनते व असे वातावरण स्वाभाविकपणेच उत्पादक स्वरूपाचे ठरत असल्याने या मुद्दय़ावर पण गंभीरपणे पाहणे गरजेचे ठरते.
थोडक्यात म्हणजे कॉर्पोरेट क्षेत्रात जुन्या-नव्यांचा परस्पर ताळमेळ घालून त्याद्वारे या क्षेत्रात नव्याने येणाऱ्यांचा हात धरून त्यांना सहकार्याची साथ देणे व त्यातून सहकार्य, समन्वय आणि आदरपूर्ण आचरणावर आधारित वरीलप्रमाणे नमूद केलेल्या सात व्यावहारिक मुद्दय़ांवर भर देणारी कॉर्पोरेट सप्तपदी म्हणूनच महत्त्वपूर्ण ठरते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा