जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये शिक्षणाचा खेळखंडोबा झालाय असं म्हटलं जातं. मात्र, हे विधान सरसकट वापरणं किती चुकीचं आहे, हे नामदेव माळी यांचं ‘शाळाभेट’ हे पुस्तक वाचून स्पष्ट होतं. यात मुलांच्या विकासासाठी झटणाऱ्या काही शाळा आणि मुलांसाठी जीव ओतून काम करणारे शिक्षक आपल्याला भेटतात. या पुस्तकातील शिक्षणविषयक लेखाचा संपादित अंश-
विनोबा म्हणतात, शिक्षक आणि मुले दोघेही एकमेकांच्या आचरणापासून शिकत असतात. दोघेही विद्यार्थीच असतात. जे दिले जात नाही ते शिक्षण. विनोबाजींचे खरे आहे. मुलांचे डोके म्हणजे कोठार आहे, असे समजून त्या डोक्यामध्ये माहिती कोंबण्याच्या कामाला शिक्षण म्हटले जाते. माहितीच द्यायची तर मग त्याच्यासाठी शिक्षण कशाला? वर्तमानपत्रे, दूरदर्शन, इंटरनेट इत्यादी माध्यमांतून ते सहज मिळते. शिक्षकांनी शिकण्यासाठी वातावरण तयार करायचे आहे. शिक्षकांनी अशा काही कृती मुलांस द्याव्यात, स्वयंअध्ययन साहित्य द्यावे, की मुलाने त्यातून स्वत: शिकले पाहिजे. नाहीतर शाळेपेक्षा जीवनास आवश्यक अशा किती तरी गोष्टी शाळेबाहेर शिकल्या जातात. शेतीचे शिक्षण, पशुपालन, गायीची धार काढणे असो की कडब्याची गंज रचणे असो. नुसत्या नजरेच्या अंदाजाने उंचच्या उंच, सरळ, काटकोनात गंज रचलेली असते. ना गुण्या असतो, ना ओळंबा. तिथे शिकवायला शाळेतले शिक्षक नसतात. उलट असे विषय शाळेत ठेवल्यानंतर काय होते ते सर्वज्ञात आहे. उदा. शेतीशाळा, सूतकताई, स्टोव्ह दुरुस्ती, पाव-बिस्किटे तयार करणे.
शिकण्याची प्रवृत्ती उपजत आहे. जगण्यासाठी, टिकण्यासाठी निसर्गाने प्रत्येक जिवाला ती देणगी दिली आहे. हरणाचे पाडस ज्या सहजतेने आईच्या कासेखाली जाते, दूध पिते, त्या सहजतेने शिकणे-शिकवणे व्हावे. चित्र, शिल्प, संगीत या गोष्टी शाळेत सुरू होण्यापूर्वीपासून माणसात आहेत. वारली चित्रकला शाळेत शिकवण्यापूर्वीच आदिवासींना येते. नागपंचमीला माझी आई भिंतीवर नागोबा काढायची. दारात काचवेल असायची. फुटके कप, बशा मातीच्या भिंतीत रुतवून नक्षी तयार करायची. गजी नृत्य, लेझीम, झिम्मा, फुगडय़ा, नागपंचमीची गाणी, हदग्याची गाणी.. किती, किती गोष्टी शाळेबाहेर शिकल्या जातात. भाजी-भाकरी करायला घरातच शिकतात मुली. या गोष्टी शाळेत शिकवायला सुरुवात केल्यानंतर काय होतं? चित्रकला! एकच चित्र अनेक पिढय़ा अख्ख्या महाराष्ट्रातल्या शाळाशाळांतून काढले जातेय. निसर्गाचा देखावा. डोंगर, दोन्ही डोंगरांमधून वर निघणारा (की खाली जाणारा?) अर्धा सूर्य, ४४४ म्हणजे पक्षी. डोंगरातून निघणारी नदी. सगळे वर्णन करायला नको. चित्र तुमच्या डोळ्यासमोर आलेय.
शाळेतील स्नेहसंमेलनातील सांस्कृतिक कार्यक्रमात मुलांचे नाच अतिशय सुंदर असतात. सिनेमातील गाण्यांच्या नाचाप्रमाणे लोकनृत्य तितक्याच सहजतेने, कलात्मकतेने मुले सादर करतात. नाच झाल्यानंतर मी मुलांना जवळ बोलावून विचारतो, हा नाच तुमच्याकडून कोणी बसवून घेतला? मुले म्हणतात, आमचा आम्हीच बसवला. मुलांमध्ये शिकण्याची एक नैसर्गिक शक्ती आहे. तिच्या विकासाला संधी द्या. त्यांचे त्यांना शिकू द्या. आपण शिकणे बिघडवू नये असे वाटते. शिक्षकांपेक्षा शाळेत फॅसिलिटेटरची (सुलभक- शिकणे सुलभ करणाऱ्याची) गरज आहे.
आठवीपर्यंत शाळेत मराठी, हिंदी, इंग्रजी भाषा शिकविल्या जातात. आता तर पहिलीपासून इंग्रजी. इंग्रजीमध्ये दहावीला १०० पैकी ९० गुण मिळाले, तरी चार वाक्ये इंग्रजीतून सहज बोलता येतील याची खात्री नाही. याउलट खानापूर, तासगाव तालुक्यांतील शाळा सोडलेली मुले (शाळा सोडण्याची सर्व कारणे लागू) केरळ, तामिळनाडू इत्यादी राज्यांत सोने-चांदीच्या गलई व्यवसायासाठी जातात. इतर भाषा नव्हे, तर मातृभाषेतही ही मुले धड पास झालेली नसतात; परंतु गाव सोडल्यानंतर मराठीपासून पूर्ण भिन्न असलेली भाषा अवगत करतात. सोन्या-चांदीच्या व्यवसायात जम बसवतात. गणितात नापास झालेली ही मुले रोज लाखो रुपयांची उलाढाल करतात. याचे कारण मुले कृतीतून शिकली, अनुभवातून शिकली. बिनभिंतींच्या शाळेत शिकली. स्वत:च्या ज्ञानाची रचना स्वत: करत गेली. ज्ञानाला रचता रचता स्वत:ला रचत गेली. इथे स्मरणापेक्षा कृतीला महत्त्व होते. म्हणून शाळेतही कृती करत शिकण्यावर भर दिला पाहिजे. ज्ञानरचनावादी पद्धतीने शिकण्या-शिकविण्याची कला अवगत केली पाहिजे. निदान मातृभाषेतून नीट संवाद साधता आला पाहिजे. कथा, कविता, निबंध, चित्र, पत्र इत्यादी माध्यमांतून व्यक्त होता आले पाहिजे.
हे सर्व सत्य असताना खेडय़ातल्या, डोंगरातल्या, जंगलातल्या मुलांची वेलांटी चुकली, उकार चुकला म्हणून त्यांच्यावर अप्रगतचा- ‘ड’चा शिक्का मारणे कितपत योग्य आहे? फक्त लिहिता-वाचता येणे, बेरीज-वजाबाकी आणि इतर गणिती क्रिया येणे याला शिक्षण म्हणता येईल काय? निदान आज सर्वसाधारण समज तसाच आहे. एखाद्याला नाही वाचता येत, पण चांगले नाचता येते. नाही गणित येत, पण सरसर झाडावर चढता येते. त्याला नदीत पोहता येते. गुरुजींना, बाईंना झाडावर चढता येते काय? पोहता येते काय? मग आता अप्रगत कोण? ‘ढ’ कोण? प्रत्येक मूल वेगळे आहे. त्याच्यात विशेष काय आहे ते शिकविणाऱ्यास आढळले पाहिजे. ही गोष्ट पालकांनाही लागू पडते. पालकांनी आपल्या अपूर्ण इच्छा मुलांकडून पूर्ण करण्याच्या भानगडीत पडू नये. मूल त्याच्या स्वत:च्या गतीने शिकते, यावर विश्वास ठेवायला हवा. मुलाला एखादी गोष्ट येत नाही, समजत नाही, उमजत नाही, मुलाचे वर्तन आपल्याला पटत नाही, म्हणून त्याला गुन्हेगार ठरवून शिक्षा करू नये. बऱ्याचदा बालकालाही मोठय़ांचे पटत नसते, पण म्हणून ते मोठय़ांना शिक्षा करते काय? ते मोठय़ांचा मान राखायचा म्हणून गप्प असते. खरे तर हा बालकांचा मोठेपणा नव्हे काय? शिकलेला आणि न शिकलेला नागरिक यातील फरक समजायला हवा, शिक्षण इतके पोक्त व्हायला पाहिजे. मी एकदा एका शिकलेल्या आणि लेखक असलेल्या माणसाच्या घरी गेलो. त्यांनी माझे त्यांच्या घरात स्वागत केले. त्यांच्या मुलाने नाश्ता, चहा आणून दिला. छान गप्पा झाल्या. फक्त एकच गोष्ट राहिली, घरातील भगिनीचे दर्शन झाले नाही.
दुसरा प्रसंग- मी आणि माझा शिक्षक मित्र किशोर महाजन नंदुरबार जिल्ह्य़ात गेलो होतो. आदिवासी कुटुंबात राहायचे ठरवले. धडगाव हा तिथला दुर्गम तालुका. गटशिक्षण अधिकारी वळवी यांनी कुकलटच्या गुरुजींची भेट घालून दिली. ओळखपाळख नसताना आदिवासी कुटुंबात राहिलो. या कुटुंबातली भगिनी आमच्या आसपास सहज वावरत होती. आपण परपुरुषासमोर कसे जायचे वगैरे गोष्टींचा लवलेशही जाणवला नाही. ती आम्हाला काय हवे-नको बघत होती. आमची भाषा एकमेकांना समजत नव्हती, पण संवाद होत होता. या दोन प्रसंगातील सुज्ञपणाचे, शहाणपणाचे वागणे कोणाचे? खमंग फोडणीचे पोहे देणाऱ्या शिकलेल्याचे की बिनतेलाची भाजी बनविणाऱ्या, अक्षरओळखच काय पण डोंगरदऱ्या ओलांडून सुधारणेचा वाराही न लागलेल्या भगिनीचे आणि खुल्या दिलाने स्त्री-पुरुष समानता स्वीकारणाऱ्या आदिवासी बांधवांचे? म्हणून मग प्रश्न पडतो, शिक्षणाने माणूस घडतो की बिघडतो?
जिल्हा परिषदेच्या शाळांमधील मुलांना गळ्यात टाय नाही, पायात बूट नाही, दिसायला ती नाजूक नाहीत. शाळेतल्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये झगमगाट नसतो. त्यांचे पालक नटूनथटून मिरवत नसतात. म्हणून तिथे शिक्षण नाही असे म्हणता येईल काय? जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षण नाही आणि खासगी शाळांमध्ये फारच गुणवत्ता ओसंडून वाहतेच, असे चित्र नाही. असा भास मात्र जाणीवपूर्वक निर्माण केला जातोय, असे वाटते. सर्वच खासगी शाळांत गुणवत्ता नसते, असे म्हणावयाचे नाही. हेच विधान जिल्हा परिषदेच्या शाळेसही लागू होते.
खासगी शाळांमध्ये कोणाची मुले प्रवेश घेतात? प्रवेश घेताना काय प्रक्रिया घडते? गरिबांच्या, कष्टकऱ्यांच्या, अशिक्षित पालकांच्या भरमसाट फी देऊ न शकणाऱ्या पालकांच्या मुलांना किती नावाजलेल्या शाळेत प्रवेश देतात? (प्रयोग करणाऱ्या शाळा अपवाद असू शकता. उदा. वाई येथील किलरेस्करांची शाळा. फलटण येथील मंजिरी निमकर यांची शाळा). एवढे करूनही गुणवत्ता, गुणवत्ता म्हणतो ती लेखन, वाचन, गणिती क्रिया मिळालेले मार्क्स यांच्याशी निगडित असल्याचा भास निर्माण केला जातो. यापुढे पाऊल नाही. बरे असो, एकवेळ तेही मान्य केले, तरी या गुणवत्ता वाढीत शाळेचा वाटा किती? पालकांचा किती? खासगी शिकवण्यांचा किती?
जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण नाही, या एकमेव कारणामुळे त्या बंद पडत आहेत, हे चुकीचे आहे. खासगी शाळा कोणी काढल्या? का काढल्या? खासगी शाळा काढणारे शिक्षणतज्ज्ञ अथवा कर्मवीर अण्णांसारखे ध्येयवादी आहेत काय? गरज नसताना, जाणीवपूर्वक काही लोकांचे हितसंबंध जोपासण्यासाठी सरकारी शाळेशेजारी शाळा उभी करायची, आपल्या नातेवाईकांची शाळेत भरती करायची, मूळची शाळा बंद पाडण्यासाठी प्रयत्न करायचे अशा घटना घडत नाहीत काय? जिल्हा परिषदेच्या, महानगरपालिकेच्या शाळा बंद पडल्यानंतर त्या शाळेची इमारत, जागा यांचे काय होते, याचा शोध जाणकारांनी घ्यावा. खासगी शाळेतील शिक्षणाचा दर्जा उत्तम असतो आणि सरकारी शाळेत तो नसतो, तसेच गुणवत्तेच्या घसरणीला एकटा शिक्षकच जबाबदार आहे, हा गैरसमज दूर व्हावा, म्हणून एवढे सविस्तर लिहावे वाटले. सरकारी शाळांमध्ये विविध जाती-धर्माची व स्तरांतील मुले एकत्र शिकतात. परिपाठाच्या वेळी मुले वर्गखोल्या स्वच्छ करतात, मैदानाची स्वच्छता करतात. शाळेची घंटा वाजवतात. या गोष्टीमध्ये मुलांना कमीपणा न वाटता आनंद मिळतो. अशा वेळी श्रमप्रतिष्ठा वेगळी शिकवावी लागत नाही. त्यामुळे सामुदायिक जीवनाचा घडा अनुभवण्याची संधी मिळते. म्हणून काही विचारी लोक आपल्या मुलांना मुद्दाम सरकारी शाळांमध्ये घालतात. या उलट, स्वत:च्या कामावर विश्वास नसणारे जि. प.च्या शाळेतील शिक्षक आपली मुले खासगी शाळेत घालतात, असेही दिसते.
सरकारी शाळा बंद पडणे वा पाडणे ही अत्यंत धोकादायक बाब आहे. खासगी शाळांमध्ये संस्थेला देणगी देऊन नोकरी मिळविणारे काही थोडके असतील. परंतु गुणवत्तेनुसार आज जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षक भरती होते. ते प्रवेशाचे दार कायम बंद होईल, म्हणून सरकारी शाळा टिकविण्याची जबाबदारी सध्या सेवेत असणाऱ्यांची आहे. एकदा खासगी शाळांच्या ताब्यात शिक्षण गेले की..?
खासगी प्रवासी वाहतूक (पश्चिम महाराष्ट्रात वडाप, जळगावला काली पिली, नंदूरबारला कमांडर) नंदूरबारला कमांडरने प्रवास केला. ड्रायव्हरला समोरचे दिसेल एवढी जागा सोडून बॉनेटवर प्रवासी बसले होते. बाजूला, मागे, पुढे चिकटले होते. मी प्रवासी मोजले. प्रवाशांची संख्या ४२ होती. पैसा गोळा करणारा म्हणाला, ‘हे काहीच नाही. सीझनला ६० ते ६५ लोक गाडीत बसतात. जिवाची पर्वा न करता माणसे या गाडीत बसतात. कारण त्यांच्यासमोर त्यावेळी दुसरा पर्याय नसतो.’ वेळीच लक्ष दिले नाही तर शिक्षणातही ही वेळ आल्यास नवल वाटायला नको, खासगी शाळांचे रूपांतर ‘वडाप’मध्ये आणि मोजक्या ‘वोल्वो पंचतारांकित’ शाळा अशी विभागणी झालेली असेल. पुन्हा ज्याच्या त्याच्या आर्थिक लायकीनुसार प्रवेश. सावधान! अजूनही वेळ गेलेली नाही.
सर्वाना शिक्षण मिळावे म्हणून सरकारी शाळा आहेत. श्रीमंतांच्या, नोकरदारांच्या मुलांना कदाचित या शाळांची गरज वाटत नसेल. परंतु अंध, अस्थिव्यंग, मूकबधिर, मतिमंद, झोपडपट्टीतला, तांडय़ावरचा, वाडीवस्तीवरचा, आदिवासी या सर्वाना सामावून घेणारी आज तरी एवढी एकच व्यवस्था आहे. याचा अर्थ सरकारी शाळा फारच चांगल्या आहेत, असा नव्हे. त्यामध्ये सुधारणा झाली पाहिजे. फक्त दोषांवर बोट न ठेवता दोष दूर करण्यासाठी धडपडले पाहिजे. काही धडपडणारे शिक्षक, शिक्षणप्रेमी, जागरूक पालक आहेत. म्हणून काही सुंदर सरकारी शाळा आपल्याला दिसतात.
आज सहलींसारखे होणारे शिक्षक अधिवेशनाचे रूपांतर शिक्षण संमेलनामध्ये करावे. शैक्षणिक गुणवत्तावाढीची चळवळ उभी राहावी. शिक्षक संघटना यामध्ये भेदभाव विसरून आघाडीवर असायला हव्यात. अधिकारी, पालक, शिक्षणप्रेमी यांनी चळवळ पोसण्यासाठी बळ द्यायला हवे. शिक्षणतज्ज्ञांनी मार्गदर्शन करायला हवे, दिशा द्यायला हवी. शिक्षणात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांनी अधिक सेवाभाव दाखवायला हवा.
शिक्षक सक्षम, संपन्न आणि समृद्ध व्हायला हवा. शाळेत जिवंत शिक्षकांची आवश्यकता आहे. माझ्या एका शिक्षक मित्राने त्याचा अनुभव सांगितला. त्यांना त्याच्या विद्यार्थ्यांने विचारले, ‘‘सर, आपल्या गावात पहिली तंदूरभट्टी कधी आली?’’ सर म्हणाले, ‘‘मला याची कल्पना नाही.’’ त्यावर त्या विद्यार्थ्यांने दिलेली प्रतिक्रिया फार महत्त्वाची आहे. तो म्हणतो, ‘‘सर, तुम्हाला गावातल्या तंदूरभट्टीची माहिती नसेल, तर तुम्ही मला अणुभट्टीची माहिती कशी काय विचारता?’’
आजचा विद्यार्थी शिक्षकांसमोर आव्हान आहे. त्याला विश्व जवळ आले आहे, असे वाटते. धोका एकच आहे, तो माणसाजवळ किती जाणार आहे? त्याला विश्व कुटुंबाचा नागरिक बनविण्याची जबाबदारी शिक्षकांवर असताना शिक्षकही तेवढय़ाच ताकदीचे असावे लागणार आहेत. आज शाळांमधून जास्त करून लढायांचा इतिहास शिकविला जातो. त्याऐवजी प्रेमाचा, त्यागाचा, सुधारणांचा व शिक्षणाचा इतिहास पाठय़पुस्तकात पाहिजे. लढाईचा इतिहास शिकलेल्या मुलाच्या मनात प्रेमाऐवजी द्वेषच निर्माण होईल. मग विश्वबंधुत्वाची भावना कशी रुजेल? आज मी माझ्या कुटुंबाचा राहिलेलो नाही. माझे आई, वडील माझ्या घरात (घर वडिलांनी बांधले असले तरी) मला नको आहेत. वृद्धाश्रमांची संख्या वाढते आहे. चार शब्दांचे भुकेले माता-पिता वृद्धाश्रमाचा खाना खात आहेत. त्यांची सोय केल्याचे मला समाधान आहे. पण शेतकऱ्याचे, कष्टकऱ्याचे आई-वडील वृद्धाश्रमात आहेत काय? मग कोणाचे आहेत? उद्याचे नागरिक तयार करण्याची जबाबदारी शिक्षणाची आहे. माणसाने माणसाशी माणसासारखे वागले पाहिजे. मग खऱ्या अर्थाने शिक्षण गुणवत्तापूर्ण झाले, असे म्हणता येईल.
शाळाभेट, साधना प्रकाशन, पृष्ठे – १४०, किंमत – १०० रु.