मी बीई सिव्हिल इंजिनीअरिंग केलं आहे. आता मात्र मला करिअर बदलायचं आहे. मला लघू गृहउद्योग सुरू करायचा आहे. मला त्या उद्योगांची आणि त्या संबंधित मार्केटिंगची माहिती द्याल का?
– राहुल पाटील
तुम्ही बीई सिव्हिल इंजिनीअरिंग केलं आहे. पण आता तुम्हाला लघू गृहउद्योग करायचा आहे, असं तुम्ही म्हणता. यावरून एकूण तुमचा फार गोंधळ उडालेला दिसून येतो आहे. गृहउद्योगांची संख्या १०० पेक्षा जास्त जाऊ शकते. त्यामुळे नेमका कोणता उद्योग करायचा, याची आधीच निश्चिती करणे आवश्यक आहे. जिल्हा उद्योग केंद्रांमध्ये अशी यादी तुम्हाला मिळू शकेल. या केंद्रांमार्फतच उद्योग सुरू करण्यासाठी लागणाऱ्या आवश्यक बाबींचीही माहिती मिळेल. उदा. भांडवल उभारणी, कच्चा माल मिळवणे. पणन आणि विक्रीसंदर्भातही माहिती आणि ज्ञान मिळू शकेल. खादी ग्रामोद्योग मंडळाच्या संकेतस्थळावर गृहउद्योगाची माहिती दिलेली असते. त्याचाही उपयोग तुम्हाला करून घेता येईल. शिवाय या मंडळामार्फत गृहउद्योगांसाठी अल्पकालावधीचे प्रशिक्षणही आयोजित केले जाते. संपर्क – http://www.kvic.org.in/kvicres/training.html
मी बी. ए. च्या दुसऱ्या वर्गाला शिकत आहे. बी. ए. नंतर मी काय करणे योग्य राहील? माझ्यासाठी करिअरच्या कोणत्या वाटा आहेत?
– अक्षय खेडेकर
सध्याच्या काळात केवळ बी.ए. करून फारशा संधी उपलब्ध नाहीत. त्यामुळे आणखी काही करावेच लागेल. बी.ए केल्यानंतर केंद्रीय नागरी सेवा परीक्षा, राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षा, विक्रीकर निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, साहाय्यक परीक्षा, स्टाफ सिलेक्शन परीक्षा अशा वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा देता येतील. मात्र त्यासाठी प्रचंड अभ्यास करण्याची गरज आहे. बी.ए.नंतर नामवंत आणि दर्जेदार संस्थेतून एमबीए केले तर तुम्हाला कॅम्पस सिलेक्शनमध्ये उत्तम नोकरी मिळू शकते. लिखाणाची आवड आणि भाषेवर प्रभुत्त्व असेल तर तुम्हाला पत्रकारितेच्या क्षेत्रातही करिअर करता येईल. बँकेच्या परीक्षा हासुद्धा एक पर्याय आहे.
तुमचे अभ्यासक्रम अथवा करिअरसंबंधीचे प्रश्न career.vruttant@expressindia.com या पत्त्यावर पाठवा.