प्रचलित आर्थिक मंदीच्या पाश्र्वभूमीवर चालू आर्थिक वर्षांत रोजगाराच्या संधी मंदावल्या असून, सप्टेंबरच्या पहिल्या आठवडय़ात ‘फिकी’ व ‘अ‍ॅसोचॅम’ या भारतातील व्यवस्थापन प्रतिनिधींच्या प्रमुख संस्थांनी देशांतर्गत उद्योग-व्यवसायाची सद्य:स्थिती व त्यानुसार प्रचलित व संभाव्य रोजगार संधींच्या संदर्भात केलेल्या व्यापक व वेगवेगळ्या सर्वेक्षणांमध्ये हीच बाब अधोरेखित झाली आहे.
‘फिकी’ व ‘अ‍ॅसोचॅम’ या उद्योग व रोजगारविषयक सर्वेक्षणात प्रामुख्याने असे आढळून आले आहे की, रोजगार संधींच्या संदर्भात २०११-१२ या आर्थिक वर्षांच्या अंतिम टप्प्यात म्हणजेच जानेवारी-मार्च २०१२ या तिमाहीत सक्षम असणाऱ्या माहिती-तंत्रज्ञान, वित्तीय सेवा, दूरसंचार व आतिथ्यशीलता या प्रमुख क्षेत्रांतील रोजगार संधींमध्ये एप्रिल ते जून २०१२ या नवीन आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीत विलक्षण घट झाली आहे.
संख्यावारीच्या आधारे सांगायचे झाल्यास ‘फिकी’ व ‘अ‍ॅसोचॅम’च्या रोजगारविषयक सर्वेक्षणांमध्ये सामील करण्यात आलेल्या ३२ व्यवसाय- उद्योग क्षेत्रांमध्ये जानेवारी मार्च-२०१२ च्या तुलनेत एप्रिल-जून २०१२ या कालावधीत रोजगार संधींमध्ये सुमारे २० टक्क्यांची घट झाली असून, या उभय सर्वेक्षणांमध्ये दिसून आलेले मुख्य मुद्दे व आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे-
* नव्या आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीतील रोजगार संधींचे सर्वाधिक घटलेले प्रमाण संगणक सेवा क्षेत्रात असून, त्या ठिकाणी रोजगार संधींची घटलेली आकडेवारी सर्वाधिक म्हणजेच ३१ टक्के आहे.
* त्या खालोखाल घटत्या रोजगार संधींमध्ये रिटेल क्षेत्राचा क्रमांक असून, या क्षेत्रात घटलेल्या रोजगारांची टक्केवारी २९.८ टक्के आहे.
रोजगार संधींमधील ही घट पायाभूत क्षेत्र, ऊर्जा, बांधकाम, रस्ते निर्माण या क्षेत्रांमध्ये दिसून आली असून, या क्षेत्रातील घटत्या रोजगार संधींचे प्रमाण २३ टक्के तर दूरसंचार क्षेत्रात २३ टक्के असल्याचेपण दिसून आले.
‘फिकी’तर्फे उद्योग-व्यवसायातील रोजगार संधींविषयक सर्वेक्षण २०१० पासून त्रमासिक स्वरूपात करण्यात येत असून, संस्थेद्वारा एप्रिल, जून-२०१२ या तिमाहीत करण्यात आलेल्या रोजगारविषयक सर्वेक्षणात सहभागी झालेल्या १५० कंपन्यांपैकी सर्वाधिक म्हणजे ८४ टक्के कंपन्यांनी आपण नव्याने कर्मचाऱ्यांची भरती आगामी सहा महिने करणार नसल्याचे स्पष्ट केले असून, अशा प्रकारचा निराशाजनक प्रतिसाद उद्योगांनी प्रथमच दिला हे यासंदर्भात उल्लेखनीय आहे.
‘अ‍ॅसोमॅच’च्या रोजगार सर्वेक्षणात जानेवारी- मार्च २०१२ व एप्रिल-जून २०१२ या कालावधीत देशांतर्गत विविध प्रमुख औद्योगिक क्षेत्रांत उपलब्ध झालेल्या रोजगारांची तुलनात्मक संख्या खालीलप्रमाणे असून, ती पुरेशी बोलकी आहे-
वरील आकडेवारीसंदर्भात उद्योगक्षेत्रनिहाय सांगायचे झाल्यास माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात जानेवारी-मार्च २०१२ या तिमाहीत उपलब्ध झालेल्या रोजगारांची संख्या ६६००० होती तर नंतरच्या म्हणजेच एप्रिल-जून २०१२ या कालावधीत हीच संख्या घटून ४६००० वर आली. रोजगार संधींच्या बाबतीत झालेली घट विशेषत: या क्षेत्रातील नवागतांच्या संदर्भात चिंतनीय ठरली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

माहिती-तंत्रज्ञान उद्योग क्षेत्राशी संबंधित शीर्षस्थ व्यवस्थापन संस्था समजल्या जाणाऱ्या ‘नासकॉम’च्या मते माहिती-तंत्रज्ञान सेवा उद्योग क्षेत्रातील चालू आर्थिक वर्षांत अपेक्षित असणारी वाढ १४ ते १५ टक्के अपेक्षित आहे तर गेल्या दशकातील याच क्षेत्रातील वार्षिक सरासरी व्यावसायिक वाढ सुमारे ३० ते ४० टक्क्यांपर्यंत होती हे या ठिकाणी उल्लेखनीय आहे. या क्षेत्रातील काही तज्ज्ञांच्या मते, २०१२-१३ या आर्थिक वर्षांतील अपेक्षित वाढ तर एक आकडीसुद्धा राहण्याची शक्यता असून, त्याचा अपरिहार्य परिणाम प्रस्तावित रोजगार संधींवर होणार आहे.
माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रानंतरचे रोजगारप्रवण व्यवसाय क्षेत्र म्हणून समजल्या जाणाऱ्या बँकिंग व वित्तीय सेवा क्षेत्रातील रोजगार संधींच्या संदर्भात ‘अ‍ॅसोचॅम’च्या सर्वेक्षणात असे नमूद करण्यात आले आहे की, रोजगाराच्या संदर्भात दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या या उद्योग-व्यवसाय क्षेत्रातील रोजगार संधींमध्ये मार्च-एप्रिल २०१२ मधील २० हजार या संख्येवरून एप्रिल-जून २०१२ मध्ये १७ हजार रोजगार संधींसह घसरण झालेली दिसून येते. विशेषत: सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये विविध स्तरांवर रोजगारनिर्मिती होऊनसुद्धा बँका व वित्तीय सेवा क्षेत्रातील रोजगारांमध्ये नव्या आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीत झालेली रोजगारांची घट अनेकांसाठी काळजीचा विषय ठरणे स्वाभाविक आहे.
राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आलेल्या या सर्वेक्षणात काही निवडक क्षेत्रांत जी वाढ झाली त्यांची क्रमवारीसह टक्केवारी म्हणजे शैक्षणिक क्षेत्र ४१ टक्के, हिरे उद्योग ३७ टक्के, कृषी व कृषीविषयक क्षेत्र ३० टक्के, हवाई वाहतूक १४ टक्के तर आर्किटेक्चर क्षेत्र २ टक्के याप्रमाणे झालेली रोजगारवाढ पाहिली म्हणजे रोजगारवाढीच्या संदर्भातील उद्योगांची बदलती क्रमवारी स्पष्ट होते.
दरम्यान, भौगोलिक संदर्भात सांगायचे झाल्यास रोजगारसंधी कमी होण्याचा सर्वाधिक फटका बंगळुरू शहराला बसला असून, तिथे कमी झालेल्या रोजगारांची टक्केवारी सर्वाधिक म्हणजे २६ टक्के होती तर त्याखालोखाल पुणे २५ टक्के, मुंबई २४ टक्के, दिल्ली १६ टक्के तर चेन्नई येथे सर्वात कमी म्हणजेच १४ टक्के रोजगार संधी कमी झाल्याने महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी सद्य:स्थितीत रोजगाराच्या संदर्भात काळजीचे वातावरण राहणे स्वाभाविक आहे.
महानगरांमध्ये वर नमूद केल्याप्रमाणे रोजगाराच्या संधी आणि टक्केवारीत घट झालेली असतानाच दुय्यम स्वरूपाच्या शहरांमध्ये रोजगार संधी आणि टक्केवारी म्हणजे सर्वेक्षण कालावधीत मीरतमध्ये १३३ टक्के, अलाहाबाद १२६ टक्के, होशियारपूर १०० टक्के, पटियाला ६१ टक्के तर लखनऊ ५४ टक्के याप्रमाणे रोजगार संधीतील वाढ विशेषत: मध्यम स्तरीय शहरातील नोकरी रोजगार शोधणाऱ्यांच्या आशा आणि अपेक्षा काही प्रमाणात का होईना, पण पल्लवित करणाऱ्या ठरल्या आहेत.
सर्वेक्षणातील मुद्दय़ांची पुष्टी करताना नोकरी डॉट कॉमचे संस्थापक संजीव विखुचंदारी यांनी याप्रकरणी केलेली टिप्पणी महत्त्वपूर्ण ठरते. त्याच्या मते आर्थिक मंदीपाठोपाठ आर्थिक- व्यावसायिक अस्थिरतेचा अपरिहार्य परिणाम म्हणूनच रोजगार संधींमध्ये घट झाली असून, प्राप्त परिस्थितीत तरी असे होणे अटळ आहे.

मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Career news d v aambulkar financial crisis recession job opportunity