आता साऱ्या महाराष्ट्रात विज्ञान प्रकल्प करण्याचे वारे वाहू लागतील. सर्व शाळकरी मुलांना आणि विशेषत: त्यांच्या पालकांना या विज्ञान प्रकल्पांचं मोठंच टेन्शन असतं. पण विज्ञान प्रकल्प असो किंवा कोणताही प्रकल्प असो, तो साकारण्यात एक कमालीचा आनंद असतो. हा आनंद आपण प्रकल्प का आणि कसा करतो आहोत याच्याशी निगडित असतो. आजच्या आणि पुढच्या अशा दोन लेखांमधून आपण विज्ञान प्रकल्प म्हणजे काय आणि तो कसा करावा याविषयी जाणून घेणार आहोत.
विज्ञान प्रकल्प करायचा तर सर्वात आधी दोन गोष्टी समजून घ्याव्या लागतील. पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे विज्ञान म्हणजे काय, हे पाहावं लागेल आणि मग प्रकल्प म्हणजे काय याचा परामर्श घ्यावा लागेल. कुठल्याही गोष्टीचा अर्थ समजून घेतला की मगच ती गोष्ट व्यवहारात चपखलपणे वापरता येते. म्हणूनच विज्ञानाबरोबरच तंत्रज्ञान ही संकल्पनाही समजावून घ्यावी लागेल. विज्ञान, तंत्रज्ञान आणि प्रकल्प या संकल्पना आपल्याला नेमक्या समजल्या तर कुठलाही विज्ञान प्रकल्प सहजपणे साकारता तर येईल.
विज्ञान म्हणजे काय या प्रश्नाचं उत्तर आपण काय देऊ? विज्ञान म्हणजे पदार्थाचा, जीवांचा किंवा रसायनांचा अभ्यास म्हणजेच पदार्थविज्ञान, जीवविज्ञान आणि रसायनविज्ञान! पण या तर झाल्या विज्ञानाच्या शाखा! मुळात विज्ञान म्हणजे काय, या प्रश्नाचं हे उत्तर नव्हे.
मग आपण असं म्हणूया, विज्ञान म्हणजे तर्कसुसंगत विचार; विज्ञान म्हणजे विशेष ज्ञान! कोणतीही नसíगक घटना जाणून घेताना मिळालेल्या ज्ञानाला ‘विज्ञान’ म्हणता येईल. प्रश्न असा आहे की, नसíगक घटना जाणून घ्यायची म्हणजे नेमकं काय करायचं आणि का करायचं? कोणतीही घटना घडण्यामागे निश्चित असं काहीतरी कारण असतं. नसíगक घटना जाणून घ्यायची म्हणजे नेमकी ती घटना का घडली यामागचं तर्कसुसंगत कारण समजून घ्यायचं. घटनेमागचा कार्यकारणभाव समजून घ्यायचा. मग त्या घटनेचा किंवा त्यामागील कारणाचा आपल्याला व्यवहारात उपयोग करून घेता येतो. आदिमानवाने जंगलात पेटलेले वणवे पहिले. त्यामागचं कारण जाणून घेतलं. पानं किंवा वाळलेल्या फांद्या एकमेकांवर घासल्या गेल्या की, घर्षणाने उष्णता निर्माण होते आणि नंतर त्यातून अग्नी पेटतो, हे अग्नी पेटण्यामागचं कारण समजल्यावर, माणसाला अग्नी पेटवता यायला लागला आणि खऱ्या अर्थाने त्याच्या प्रगतीला सुरुवात झाली.
विज्ञानाचा जन्म कुतुहलातून होतो. निसर्गातल्या अनेकविध घटना अनुभवताना आपल्या मनात कुतूहल निर्माण होतं. नव्हे; तसं ते व्हायलाच हवं. त्या कुतूहलाचं निराकरण करताना आपल्याला त्या घटनेमागचं कारण कळतं आणि त्यातून विज्ञानाचा जन्म होतो. एखाद्या घटनेविषयी मनात कुतूहल किंवा प्रश्न निर्माण होणं, ही विज्ञान प्रकल्पाची पहिली पायरी आहे. आपल्या पूर्वजांना, आकाश निळंच का, सूर्य पश्चिमेलाच का मावळतो, झाडांना त्यांचं अन्न कुठून मिळतं, फळ झाडावरून खालीच का पडतं, ठराविक प्रकारच्या ढगातूनच पाऊस का पडतो, हे आणि असे अनेक प्रश्न पडले आणि त्यामागची कारणमीमांसा शोधता शोधता माणसाची प्रगती झाली. हे सर्व त्या त्या संशोधकांनी केलेले विज्ञान प्रकल्पच होते.
विज्ञान प्रकल्प साकारताना विज्ञानाच्या चार गुणवैशिष्टय़ांचा उपयोग होतो. विज्ञान सर्वव्यापी असल्यामुळे एखादी वैज्ञानिक संकल्पना, जगाच्या पाठीवर कुठेही पडताळून बघता येते. विज्ञान वस्तुनिष्ठ असल्यामुळे जगातली कुठलीही व्यक्ती संकल्पना पडताळून पाहू शकते. विज्ञान लवचिक असल्यामुळे, आधी झालेल्या संशोधनात किंवा आधी मांडल्या गेलेल्या संकल्पनेत सुधारणा किंवा बदल करता येतात. विज्ञान गतिमान असल्यामुळे दररोज नवीन संकल्पनेवर आधारित प्रकल्प साकारता येतात; पुन्हा एकदा आगीचा किंवा चाकाचा शोध लावण्याची गरज भासत नाही.
तर कुठल्याही घटनेमागचा कार्यकारणभाव तर्कसुसंगततेनं समजून घेणं म्हणजे विज्ञान! या साऱ्या प्रक्रियेचे काही टप्पे आहेत. पहिला टप्पा म्हणजे एखाद्या घटनेबद्दल कुतूहल वाटणं किंवा एखाद्या घटनेबद्दल मनात प्रश्न निर्माण होणं. आपण मगाशी पाहिलेलं आगीच्या शोधाचं उदाहरण लक्षात घेऊ. सर्वात आधी आदिमानवाने जंगलात पेटलेला वणवा पहिला असेल. हा अग्नी निर्माण होण्यामागे काहीतरी कारण असणार हा तर्कसुसंगत विचार त्याने केला असेल. हे काय आहे आणि कुठून निर्माण झालं याविषयी त्याच्या मनात कुतूहल निर्माण झालं असेल.
दुसरा टप्पा म्हणजे निरीक्षण करणं! सुज्ञ आदिमानवाने मग वणवा कसा पेटतो याचं नीट निरीक्षण केलं असेल. तर्कसुसंगततेचाच आधार घेत, त्याने घर्षणाने आग पेटू शकते, असं अनुमान काढलं असणार. मग त्याने दगड किंवा लाकूड एकमेकांवर घासून आग पेटवण्याचे प्रयोग करून बघितले असतील.
अनेक प्रयोग करून, प्रयोगातून निघालेल्या निष्कर्षांचं विश्लेषण करत, तिसरा टप्पा पार करताना; त्याने ठराविक प्रकारचे दगड किंवा लाकूड, ठराविक पद्धतीने ठराविक वेळ घासले की अग्नी निर्माण होतो, हा प्रयोगातल्या अनुभवाला अनुसरून आणि तर्काला धरून असा निष्कर्ष काढला असेल किंवा तसा सिद्धांतच मांडला असेल.
तर्काचा आधार घेत, कुतूहल, निरीक्षण ते सिद्धांत अशी विज्ञानाची रचना असते. आणि नेमकी हीच रचना विज्ञान प्रकल्प करताना लक्षात घायची असते. विज्ञान प्रकल्प करताना विज्ञान आणि तंत्रज्ञान या दोन्हीची यथायोग्य सांगड घातलेली असायला हवी. घर्षणातून निर्माण होणाऱ्या अग्नीचा शोध हा एक वैज्ञानिक संकल्पनेचा आविष्कार आहे; तर त्याच तत्त्वावर आधारित तयार केली गेलेली काडेपेटी किंवा लायटर हे वैज्ञानिक संकल्पनेतून साकार झालेलं तंत्रज्ञान आहे.
माणसाच्या प्रगतीच्या इतिहासात अग्नीचा शोध जितका महत्त्वाचा तितकाच चाकाचा शोधही! जड ओझं ओढून नेण्यापेक्षा, आडवं पडलेलं एखादं झाड गडगडत नेणं अधिक सोप्पं जातं, हे लक्षात आल्यावर माणसाने ‘चाका’चं तंत्रज्ञान उपयोगात आणलं. विज्ञानाच्या बऱ्याचशा संकल्पना तंत्रज्ञानाच्या स्वरूपात माणसाच्या सेवेला हजर झाल्या. अशा प्रकारे विज्ञानाचा व्यवहारात उपयोग व्हावा, म्हणूनच विज्ञान प्रकल्प करायचा असतो.
प्रकल्पाची डिक्शनरीतली व्याख्या बघायची झाली तर अशी आहे, An individual or collabotive enterprise planned and designed to achieve an aim. म्हणजे ‘एखादं ध्येय साध्य करण्याकरता केलेली पद्धतशीर आणि तर्क सुसंगत कृती म्हणजे प्रकल्प’ असं आपल्याला म्हणता येईल. प्रकल्पासाठी एखादा विषय किंवा उद्देश ठरवावा. मग त्या उद्देशापर्यंत पोहोचण्यासाठी कृती करावी. कृती करताना अनेक निरीक्षणांच्या नोंदी कराव्यात. त्यातून निष्कर्ष काढावेत. या सर्व गोष्टींना तर्कसुसंगतता असेल तर तो प्रकल्प यशस्वी होतो. यशस्वी होतो म्हणजे काय होतं? एकतर प्रकल्पातून निर्माण होणारे निष्कर्ष मूळ उद्देश सफल करणारे असतात. नाही तर निष्कर्षांतून नवीनच काही महत्त्वाची माहिती हाती लागते, जी पुढच्या विचारांना चालना देणारी असते. प्रकल्प कोणत्याही विषयाशी संबंधित असो, त्याचा मूळ ढाचा सारखाच असतो. तरीही प्रकल्प साकारण्याच्या अनेक पद्धती आणि प्रकार आहेत. त्याविषयी आणि काही विज्ञान प्रकल्पांविषयी आपण पुढच्या लेखात वाचणार आहोत.
विज्ञान प्रकल्प म्हणजे नेमकं काय?
आता साऱ्या महाराष्ट्रात विज्ञान प्रकल्प करण्याचे वारे वाहू लागतील. सर्व शाळकरी मुलांना आणि विशेषत: त्यांच्या पालकांना या विज्ञान प्रकल्पांचं मोठंच टेन्शन असतं. पण विज्ञान प्रकल्प असो किंवा कोणताही प्रकल्प असो, तो साकारण्यात एक कमालीचा आनंद असतो.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 15-10-2012 at 12:03 IST
मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Career news dr manasi rajadhyaksha science project