मनोरंजन उद्योगात कारकीर्द करण्यामागे अनेकांचे वेगवेगळे हेतू असतात. काहींना खूप लवकर व कसेही करून लोकप्रिय व्हायचे असते, काहींना या माध्यमाचा उपयोग करून समाजापुढे काही गोष्टी मांडण्यात विशेष रस असतो, काहींना ‘या क्षेत्रातील नामवंतांशी आपली ओळख आहे,’ असे बाहेरच्या जगात सांगून स्वत:चे महत्त्व वाढवायचे असते, काहींना आपली विविध प्रकारची गुणवत्ता सिद्ध करायची असते, पण काहींना मात्र भरपूर पैसे मिळवायचे असतात. चित्रपटसृष्टी म्हणजे ‘हुकमी व भरपूर पैसे मिळविण्याचा सोपा मार्ग,’ असे त्यांच्या व्यवहारी व महत्त्वाकांक्षी स्वभावावर खोलवर रुजलेले असते. ते या क्षेत्रात येण्यापूर्वी येथील मोठय़ा आर्थिक उलाढालीबाबत ते विलक्षण रोमांचित झालेले असतात. विशेष म्हणजे त्यांच्या या स्वभावाला भरपूर खतपाणी घालणारे वातावरणही त्यांच्यासमोर येते.
याबाबत उदाहरण द्यायचेच झाले तर एखादा ‘बडा हिंदी चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्या दिवशीच २५ कोटी रुपयांची कमाई केली,’ अशा प्रकारच्या हवेचे देता येईल. काही आठवडय़ांतच आणखी एका हिंदी चित्रपटाने असाच पहिल्या तीन दिवसांतच १०० कोटी रुपये कमाईचा नवा विक्रम केल्याचे वातावरण निर्माण होते. विशेषत: ‘थ्री इडियटस’, ‘दबंग’, ‘रा. वन’, ‘डॉन-२’, ‘रावडी राठोड’, ‘एक था टायगर’ अशा चित्रपटांच्या वेळी मोठय़ा आकडय़ांनी वातावरण खेळवत ठेवले. सातत्याने अशी कोटीच्या कोटी उड्डाणे घेतली जात असल्याने, या उद्योगात झटपट व सहज पैसे कमावणे हेच एकमेव सत्य आहे, असे चित्र निर्माण होते आणि या क्षेत्रात प्रवेश करून भरभरून व सहज पैसे कमावू इच्छिणाऱ्याला तर कसेही करून येथे शिरकाव करावा, म्हणजे या दीड-दोनशे कोटींच्या नफ्याच्या गणितात आपल्याला किमान एक टक्का मिळाला तरी आपले आयुष्याचे भले होईल, असे वाटते. अर्थात ही अत्यंत बालिश व अपरिपक्व समजूत असते, मात्र, सुशिक्षित आणि समंजस अशाही काही व्यक्तींचे डोळे या दीड-दोनशे कोटी रुपयांनी दिपवून टाकतात. बऱ्याच जणांना ‘भरपूर पैसा म्हणजेच प्रचंड सुख’ असे वाटते आणि तो कमवायचा मार्ग सोपा असेल तर हवाच असतो.
पण प्रत्यक्षात एखाद्या चित्रपटाची दोन-चार दिवसांतच १००-२०० (यापुढे कदाचित ५००ही) ‘कमाई’ होते का? ‘गल्ला पेटी’चा असा सहज व वेगाने ठणठणाट होतो का? बऱ्याचदा ‘चित्रपटाच्या जाहिरातीत प्रत्येक दिवशी काही कोटी रुपयांची चढती भाजणी असली तरी प्रत्यक्ष चित्रपटगृहात त्याच चित्रपटाला २५-३० प्रेक्षक असतात, तर मग ही एका दिवसात कोटींची वाढ होते कशी?
या क्षेत्रात येऊन ‘खूप पैसे कमाविण्यात करिअर करू इच्छिणाऱ्यांना असे प्रश्न पडत नसतात. कदाचित कोटीच्या वाढत्या आकडय़ावर त्यांचे लक्ष्य असावे.
अगदी रोखठोक वा स्पष्टपणे सांगायचे तर, अशा प्रकारचे चढते आकडे हा त्या चित्रपटाभोवतीचे वलय आणि वळण वाढविण्याचा भाग असतो. चित्रपट चर्चेत वा बातमीमध्ये ठेवण्यासाठीचा तो ‘प्रसिद्धीचा डंका’ वा फंडा असतो. मल्टिप्लेक्समध्ये शेवटचा खेळ रात्रौ साडेअकरा वाजता असतो, तेव्हाची सगळीकडची कमाई मोजायची तर आणखी किमान एक तास जाणार (संगणकाचे युग असले तरी) म्हणजेच दिवसभराच्या देश-विदेशातील कमाईची बेरीज दुसऱ्या दिवशीपर्यंत चालायला हवी. (आपल्याकडे रात्र असताना अमेरिकेत हिंदी चित्रपटाचा पहिला दिवस असतो.) या कोणत्याही परिस्थितीचे भान न ठेवताच ‘कोटीच्या कमाई’च्या बातम्या देणे सिनेमावाल्यांची स्वार्थी प्रवृत्ती असली तरी त्याला इतरांनी का बळी पडावे?
१००-२०० वगैरे कोटींची कमाई होते म्हणजे हा व्यवसाय प्रचंड नफ्याचा, असे समजून काही उद्योजक येथे वळण्याचा विचारही करीत असतील, पण ते इतके उथळ असतील, असे वाटत नाही.
या दीड-दोनशे कोटींत निर्मात्याच्या वाटेला नेमके किती येतात? वातावरण मात्र एकटय़ा निर्मात्याला २०० कोटी मिळाले, एका ‘खान’ने दुसऱ्या ‘खान’वर मात करताना २५ कोटी जास्त वसूल केले, अशा पद्धतीचे असते; पण ते पूर्णपणे फसवे असते..
तुम्ही सुज्ञ असल्याने या २०० कोटींतून आता वजाबाकी सुरू करा. बडय़ा हिंदी चित्रपटाचा एकूण व अवाढव्य निर्मिती खर्च, त्याच्या सर्व स्तरांतील पूर्वप्रसिद्धीचा खर्च, चित्रपटाच्या प्रिण्टसचा खर्च, ‘यूएफओ’साठीचा खर्च, आवश्यक तेथे चित्रपटगृहाच्या भाडय़ाचा खर्च, अनेक प्रकारच्या परवानगीसाठीचा खर्च, विविध कारणांस्तव होणाऱ्या पाटर्य़ावरचा खर्च, त्यानंतर मनोरंजन करातून वजा केली जाणारी मोठी रक्कम आणि भरावा लागणारा आयकर, यासह छोटे-छोटे खर्च खूप असतात. त्या सगळ्या खर्चाची बेरीजच कित्येक कोटी होते. म्हणजे तब्बल ९० कोटी रुपये गुंतविल्यावर १०० कोटींची कमाई होती. प्रत्यक्षात फक्त १० कोटींचा फायदा होतो. चित्रपट अधिक आठवडे चालताना त्याच्यावरच्या प्रसिद्धीचा खर्च सुरूच राहतो. बडय़ा चित्रपटाच्या चित्रफीत हक्काची मोठी किंमत मिळत असली (तशा बातम्या असतात) तरी बऱ्याचदा चित्रपटाचा ‘फर्स्ट डे फर्स्ट शो’ संपण्यापूर्वीच त्याची अनधिकृत (तरी चांगली) चित्रफीत लोकल
ट्रेनमध्ये स्वस्तात विकत मिळते. उपग्रह वाहिनीसाठीच्या हक्काची मात्र बडय़ा चित्रपटांना चांगली किंमत मिळते, पण त्यात चित्रपटापेक्षा जाहिरातीच जास्त असल्याने बऱ्याचदा रसभंगच होतो व सिनेमापेक्षा रिमोट कंट्रोलवर लक्ष राहते.
एक चित्रपट प्रदर्शित झाल्याचे कळतंय न कळतंय तोच २०० कोटींचा निव्वळ फायदा होतो, हे गणित प्रचारकी व फसवे आहे, हे एव्हाना तुमच्या लक्षात आले असेलच. यशस्वी चित्रपट काही कोटींचा नफा कमावतो, पण त्यात विविध स्तरांवर भरपूर वाटेकरी असतात. ८०० खिडक्या ९०० दारे, असा तो क्लिष्ट प्रकार आहे.
तात्पर्य, सहज व भरपूर पैसे कमाविण्याच्या हेतूनेच या क्षेत्रात जाऊ इच्छिणाऱ्यांना सावधानतेचा इशारा देण्यासाठी ही शस्त्रक्रिया केली आहे. या क्षेत्रात प्रचंड पैसा वाहत असला तरी त्यात विविध स्तरांवरची मेहनत आहे, दडपणे आहेत, चढ-उतार आहेत. महत्त्वाचे म्हणजे आर्थिक गुंतवणूक व मुदलासह नफा हे एका व्यक्तीवर अवलंबून नाही, त्यात बरीच मोठी यंत्रणा आहे. ती समजून येणेही अवघड आहे.
सिनेमाच्या जगात जातो आणि पैसे कमावतो, असे म्हणण्याइतके हे सोपे नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा