एखादा कार्यक्रम नेटकेपणाने पार पडण्यासाठी अनेक हात झटत असतात. अलीकडे साजऱ्या केल्या जाणाऱ्या कार्यक्रमांची संख्या वाढत असल्याने त्याच्या आयोजनासाठी व्यावसायिक हातांची गरज भासते. यातूनच इव्हेन्ट मॅनेजमेन्ट हे क्षेत्र उदयाला आले आहे. या क्षेत्रातील संधी आणि आवश्यक कौशल्यांविषयीची माहिती-
सण-समारंभ हा मानवी जीवनाचा एक महत्त्वाचा भाग असतो. त्याशिवाय मानवी जीवन नीरस वाटू लागते. अगदी शालेय स्तरापासून ते व्यावसायिक स्तरापर्यंत अनेक समारंभ साजरे केले जातात. जसे, शालेय स्तरावर वार्षकि स्नेहसंमेलनाला विशेष महत्त्व असते किंवा शालेय, आंतरशालेय स्पर्धा, स्पोर्ट्स डे तेच पुढे महाविद्यालयात-विद्यापीठात गेल्यावर विविध प्रकारचे डे सेलिब्रेशन, युथ फेस्टिवल्स, वेगवेगळ्या स्वरूपाची प्रदर्शने. मग व्यावसायिक स्तरावर आयोजित केल्या जाणाऱ्या मीटिंग्ज, परिषदा, नवीन उत्पादनांचे लॉन्च किंवा ब्रॅण्ड डेव्हलपमेंटसारखे उपक्रम; तर फॅशन शो, सांस्कृतिक कार्यक्रम, टॅलेण्ट हंट शो, प्रमोशनल कॅम्पेन किंवा धार्मिक समारंभ अशा अनेक समारंभामध्ये आयुष्याच्या त्या विशिष्ट टप्प्यावर आपण सहभागी होत असतो .
असे हे समारंभ, ज्यांना हल्लीच्या काळात ‘इव्हेण्ट’ म्हणून संबोधले जाते, यात आपण प्रत्यक्ष भाग घेऊन सहभागी होत असतो तर कधी आयोजकाच्या भूमिकेतून सहभागी होतो. जेव्हा आपण अशा कार्यक्रमांमध्ये सहभागी होतो, त्यावेळी समारंभ कसा साजरा होतो, आपल्याला आवश्यक असलेल्या गरजा जसे खाणे-पिणे, बसण्याची व्यवस्था आदी गोष्टी नीटपणे मिळत आहेत ना, याकडे अधिक लक्ष देत असतो नि या गरजा व्यवस्थितरीत्या पूर्ण झाल्या की तो समारंभ चांगला झाला, असे मत आपण नोंदवतो. अशा वेळी तो समारंभ कशा पद्धतीने साकारला, त्यासाठी संकल्पना काय वापरली होती, ती प्रत्यक्षात आणण्यासाठी काय काय कष्ट घेतले गेले किंवा तिथे काय नवनिर्मिती उपयोगात आणली गेली या सर्व बाबींशी आपले काहीच देणे-घेणे नसते. पण जेव्हा एखादा समारंभ अथपासून इतिपर्यंत यशस्वी होण्यासाठी जी मंडळी मेहनत घेतात आणि हल्लीच्या काळात अशा मेहनतीसाठी खास व्यावसायिक मंडळींचे क्षेत्र उदयाला आले आहे, त्यांना इव्हेण्ट मॅनेजमेन्ट असे संबोधले जाते.
इव्हेण्ट मॅनेजमेंट म्हणजेच एकाच छत्राखाली आयोजित केले जाणारे विविध उपक्रम. यात नवनिर्मिती असते, प्रत्येक पातळीचे नियोजन, नातेसबंधांचे व्यवस्थापन, जाहिरातबाजी आणि मार्केटिंगबरोबर इतरही अनेक गोष्टी त्या टप्प्यात पार पडत असतात.
इव्हेण्ट मॅनेजमेंट या क्षेत्रात करिअर करण्याची तुम्ही कोणत्याही शाखेतून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेले असावे, ही प्राथमिक अट आहे. त्याचबरोबर या क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल तर तुमच्याजवळ काही खास कौशल्ये असणे आवश्यक आहे.
ही खास कौशल्ये कोणती –
* उत्तम जनसंपर्क : क्लायंट्सच्या गरजा ध्यानात घेऊन त्यांना ग्राहकांपर्यत काय पोहचवायचे आहे, हे ध्यानात घेऊन त्यानुसार आवश्यक त्या सर्व व्यावसायिक सेवा पुरवणे.
* निर्मितीशीलता : समारंभाची संकल्पना लक्षात घेऊन त्यानुसार त्यात नावीन्यपूर्ण कल्पनांचा यथायोग्य वापर करणे.
* मार्केटिंग कौशल्ये : तुमच्या मनात असलेली कल्पना तुमच्या क्लायंटसला योग्य रीतीने पटवून देण्याचे कसब तुमच्याजवळ असले पाहिजे; जेणेकरुन समारंभ अधिक यादगार करता येईल.
* विश्लेषण क्षमता : अनेकदा समारंभाच्या वेळी सर्व बाबी लक्षात घेऊन व्यवस्था केली तरी ऐनवेळी काहीही अडचण उद्भवू शकते. अशावेळी त्या बाबी व्यवस्थितरीत्या हाताळता यायला हव्यात.
* संघटनात्मक कौशल्ये : कोणत्याही समारंभाचे नियोजन यशस्वी करावयाचे असेल तर त्यात कुणा एकाचे नाही तर सर्वाचेच सहकार्य लागत असते. त्या त्या गटाकडून योग्य प्रकारे सहकार्याने काम करवून घेण्याची वृत्ती असावी.
* नेटवर्किंग कौशल्ये : या क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल तर तुमचे स्वतचे असे योग्य नेटवर्किंग असावे; जेणेकरून कुठलीही अडचण निर्माण झाल्यास तुम्ही त्याला समर्थपणे तोंड देऊ शकाल.
*व्यवस्थापन कौशल्ये : कोणत्याही इव्हेण्टचे आयोजन करताना त्याच्या वेळेचे, खर्चाचे, ताणांचे, क्लायंट्सचे आणि अशा अनेक गोष्टींचे योग्य रीतीने व्यवस्थापन करता आले पाहिजे.  
पूर्णपणे इव्हेण्ट मॅनेजमेंटच्या संदर्भात प्रशिक्षण देणारा असा व्यावसायिक शिक्षणक्रम सध्या तरी विकसित झालेला नाही. पण याबाबत अनेक संस्थांमधून डिप्लोमा किंवा प्रमाणपत्रधारक स्वरूपाचे अभ्यासक्रम चालवले जातात; तर काही इव्हेण्ट मॅनेजमेंट आयोजन कंपन्या इव्हेण्ट आयोजन करण्याची जबाबदारी घेतात. अशा वेळी ते ज्यांनी पब्लिक रिलेशन, टुरिझम, आदरातिथ्य व्यवस्थापन (हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट), सेल्स किंवा मार्केटिंग क्षेत्रातील पदवी किंवा डिप्लोमा घेतलेला आहे, अशा उमेदवारांना भरती करण्याच्या दृष्टीने प्राधान्य देतात. एकाच वेळी अनेक गोष्टी हाताळण्याचे कसब आणि नवनवीन संकल्पना राबविण्याची सवय या दोन गोष्टी तुमच्याजवळ असतील तर तुम्ही या क्षेत्रात सहजपणे यशस्वी होऊ शकतात. शैक्षणिक वर्षांत अगदी शालेय पातळीपासून ते पुढे महाविद्यालयीन/विद्यापीठ शिक्षणाच्या काळात या गोष्टी उत्तम प्रकारे विकसित करता येतात नि या काळात विकसित केलेल्या या गोष्टींचा पुढे प्रत्यक्ष जीवनात निश्चितपणे फायदा होत असतो.
प्रत्येकालाच आपण समारंभात चमकावे असेच वाटत असते. काहीजण प्रत्यक्ष सहभागी होऊन तर काहीजण प्रत्यक्ष आयोजनात सहभागी होऊन आपली ही हौस पूर्ण करीत असतात. तुम्हालादेखील इव्हेण्ट मॅनेजर होण्याची सुप्त इच्छा असेल तर शालेय किंवा महाविद्यालयीन स्तरावर आयोजित केल्या जाणाऱ्या अनेक समारंभामध्ये सहभागी व्हा. मग ते प्रश्नमंजूषा असो वा एखादी स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम किंवा स्पोर्टस् डेसारखा कार्यक्रम. या कार्यक्रमांचे आयोजन करताना तुम्हाला अनेक गोष्टी ध्यानात येतील. उदा. कोणती संकल्पना वापरायची आहे, तिचा क्रम कसा असेल, सुरुवात-मध्य कसा असेल (भले या गोष्टी छोटय़ा वाटत असल्या, तरी त्या तितक्याच महत्त्वपूर्ण असतात), तुम्ही जो क्रम निवडला आहे तो प्रेक्षकांना समाधान देणारा आहे ना हे लक्षात घ्या नि सर्वात शेवटी समारंभासाठी लागणाऱ्या तांत्रिक गोष्टी, कलाकार, तंत्रज्ञ यांची आवश्यक ती व्यवस्था आहे ना हे पाहायला विसरू नका.
या अशा गोष्टीतूनच आवश्यक तो अनुभव मिळत जातो, जो प्रत्यक्ष व्यावसायिक जीवनात वावरताना नेहमीच उपयोगी ठरतो .
अर्थात याचा अर्थ असा नाही की, तुम्हाला जर तुमच्या शैक्षणिक कारकिर्दीत अशा स्वरूपाची समारंभ आयोजन करण्याची संधी मिळाली नसेल तर तुम्ही या क्षेत्रात येऊच शकणार नाही. मुळात या व्यवसायात प्रवेश करताना तुमचा दृष्टिकोन व्यापक असावा.
कोणत्याही समारंभाचे आयोजन करताना, त्यामधील पारंपरिकता राहूनदेखील तो कसा काय आकर्षक किंवा वेगळ्या तऱ्हेने साजरा करता येईल याकडे नेहमी लक्ष द्यावे. त्यासाठी थोडय़ा वेगळ्या दृष्टीने त्या त्या समारंभाचा विचार करण्याची गरज असते. म्हणूनच नियोजन, अंदाजपत्रक, खर्च, क्लायंट व्यवस्थापन, संवादकौशल्य आणि नेतृत्वगुण लक्षात घेऊन योग्य ती आखणी करणे महत्त्वाचे असते.
याशिवाय, तुमच्याजवळ प्रचंड सहनशक्ती असणे गरजेचे आहे. कारण तुमच्या नियोजनानुसार त्या त्या गोष्टी ठरल्या असल्या तरीही प्रत्यक्ष समारंभाला सुरुवात होईपर्यत क्लायंटस्वर एक प्रकारचा मानसिक ताण असतो. काही अडचण येऊन समारंभाचा विचका तर होणार नाही ना, अशी भीती त्यांच्या मनात असते. अशावेळी आपल्या मनातील साऱ्या शंका तो सातत्याने तुमच्याजवळ प्रकट करीत असतो. तेव्हा न वैतागता ही परिस्थिती तुम्हाला हाताळता आली पाहिजे. त्यासाठी नियोजन करताना प्रत्येक बारीकसारीक बाबी लक्षात घेऊन काम करणे महत्त्वाचे ठरते. कारण एखादी गोष्ट क्षुल्लकशी समजून आपण त्याकडे दुर्लक्ष केले तर प्रत्यक्ष समारंभाच्या वेळी तिच मोठी अडचण निर्माण करण्यास कारणीभूत ठरते. म्हणूनच वर उल्लेखिलेली कौशल्ये नेहमी आत्मसात करण्याचा प्रयत्न करावा.  
सध्या आíथक स्थिती फारशी समाधानकारक नसली तरीही या क्षेत्रात करिअरच्या दृष्टीने अनेक चांगल्या संधी आहेत. अलीकडे बर्थ डे पार्टीपासून ते लग्न, टॅलेण्ट हंट शो, रिअ‍ॅलिटी शो, अनेक व्यावसायिक स्तरावरील विविध प्रकारच्या स्पर्धा आदी समारंभांना विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे आणि ते व्यावसायिकदृष्टय़ा संपन्न करण्यावर अधिक भर दिला जात आहे. अगदीच उदाहरण द्यायचे झाले तर वाढदिवसानिमित्त पार्टीचे आयोजन केले असेल तर केक, खाऊ नि छोटीशी भेटवस्तू दिली की झाली पार्टी, असे एकेकाळी होते. पण आता ही पार्टी घरगुती स्वरूपाची असली तरीही तिचे व्यावसायिकदृष्टय़ा आयोजन करण्यावर अधिक भर असतो. मग त्यासाठी काही खास संकल्पना राबवल्या जातात, ज्या व्यक्तीचा वाढदिवस आहे त्याचा पेहराव, मेकअप, पार्टीची सजावट कशी असेल हे निश्चित केले जाते, मनोरंजनाच्या दृष्टीने विविध खेळांचे आयोजन केले जाते. जेणेकरून मुलांबरोबर त्यांचे पालकही त्यात सहभागी होतील. खाण्याचा मेनू- तोदेखील कशा रीतीने सादर करावा, अशा प्रत्येक बाबी लक्षात ठेवून त्यानुसार आयोजन करण्यावर अधिक भर दिला जातो.
या क्षेत्रात नव्याने येणाऱ्या युवावर्गासाठी संधींची अनेक दालने खुली आहेत. इच्छुक उमेदवारांना एखादी इव्हेण्ट मॅनेजमेंट कंपनी किंवा मीडिया हाऊस जे खासकरून इव्हेण्ट मॅनेजमेंट करतात, अशा ठिकाणी काम करण्यास सुरुवात करून अनुभव घेता येईल. योग्य अनुभवाची शिदोरी त्यांच्यापाशी जमा होताच त्यांना फ्रीलान्सर म्हणून काम करता येईल किंवा स्वतचा इव्हेण्ट मॅनेजमेंटचा व्यवसाय ते सुरू करू शकतील.
यामधून मिळणाऱ्या रोजगाराचे प्रमाण हे तुम्ही कोणत्या स्वरूपाचे काम करीत आहात, तुमची इव्हेण्ट मॅनेजमेंट कंपनी किती लहान-मोठी आहे, तिचा अनुभव, येणारे क्लायंट्स त्याचबरोबर कोणत्या शहरात ती वसलेली आहे या सर्व बाबींवर अवलंबून असते. सुरुवातीला तुमची दरमहा १० ते १५ हजारांपर्यत कमाई होऊ शकते. जसजसा अनुभव वाढत जाईल तसतशी ही उलाढाल लाखोंच्या घरात जाऊ शकते.
अलीकडे बदलत्या काळानुसार, हरतऱ्हेचे इव्हेण्ट साजरा करण्यावर भर दिला जातो. इतकेच नाही तर या प्रत्येक इव्हेण्टची दखल प्रसारमाध्यमाद्वारे घेतली जाईल यावरदेखील भर दिला जातो. शिवाय अनेक राष्ट्रीय स्तरावरील समारंभांना विशेष महत्त्व प्राप्त झाल्याने ते अधिकधिक ग्लोबल करण्याच्या दृष्टीने आतंरराष्ट्रीय स्तरावर समारंभ साजरा करण्याचा नवा पायंडा पडला आहे. त्यामुळे उत्कृष्ट काम करणाऱ्या इव्हेण्ट मॅनेजर्सना नजीकच्या काळात चांगलीच मागणी येईल. तेव्हा या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरदेखील काम करण्याची संधी मिळू शकते .
कित्येकदा अनेक आतंरराष्ट्रीय स्तरावरील महोत्सवांमधून आपल्या संस्कृतीची देवाण-घेवाण प्रदान करण्याची संधी प्राप्त होत असते. त्यामुळे अशा ठिकाणी कल्पकतेला मुबलक वाव असतो. व्यापारी परिषदा, प्रदर्शन आदी अनेक समारंभामधून नवनवीन कल्पना राबविण्याची संधी मिळते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतची नि त्याद्वारे देशाची एक प्रकारची ओळख निर्माण करण्यास मदत होते .
या क्षेत्रातील सकारात्मकता आणि नकारात्मकता-
सकारात्मकता :
* विविध समारंभाच्या निमित्ताने अनेक सेलिब्रेटींबरोबर वावरण्याची संधी मिळते. यात चित्रपट तारे-तारका, राजकारणी मंडळी, खेळाडू, कॉर्पोरेट आयडॉल आणि अशा अनेक सेलिब्रेटीबरोबर संपर्क येतो .
* एखाद्या महत्त्वाच्या आणि मानाच्या समारंभाचा आपण भाग होऊ शकलो, याचे एक मानसिक समाधान लाभते .
* एखाद्याच्या कल्पनेनुसार समारंभ आयोजन करण्यापासून ते प्रत्यक्षात पार पडेपर्यंतच्या गोष्टीत सहभागी झाल्याने एक प्रकारे आव्हानात्मक काम करण्याची व स्वीकारण्याची सवय लागते .  
नकारात्मकता :
* इतर निर्मितीक्षम क्षेत्रांप्रमाणे या क्षेत्रातदेखील प्रत्यक्ष समारंभ होईपर्यंत घडय़ाळाकडे न बघता, अविश्रांत काम करावे लागते .
* तुमच्या क्लायंटस्च्या गरजा समाधानकारक रीतीने पूर्ण करण्यासाठी प्रचंड कामाच्या ताणाला सातत्याने तोंड द्यावे लागते.
* कामाचे तास दीर्घकालीन असतातच, पण त्याचबरोबर वेळी-अवेळीदेखील काम करावे लागते .
विविध संधी
इव्हेण्ट मॅनेजमेंट व्यवसाय करणाऱ्या संघटनांमध्ये विविध प्रकारच्या कामाच्या संधी उपलब्ध असतात. या संधी कोणत्या आहेत, त्यावर एक नजर :
* जनसंपर्क अधिकारी (पब्लिक रिलेशन) : क्लायंट्स, कलाकार, स्टेज आर्टिस्ट, सरकारी अधिकारी, लोक आणि इतर अनेक मंडळींबरोबर समारंभाच्या निमित्ताने आवश्यक ते व्यवस्थापन करणे.
* प्रमोशन आणि मार्केटिंग : समारंभाचे औचित्य साधून कंपनीच्या अथवा क्लायंटसच्या विशिष्ट प्रतिमेचा प्रचार करणे आणि त्या निमित्ताने उत्पादनांचे मार्केटिंग करण्यावर भर देणे.
* ब्रॅण्ड विकास : क्लायंटस्च्या मागणीनुसार त्या त्या ब्रॅण्डचा विकास ग्राहकांपर्यंत पोहचविणे .
* डिझायिनग : ज्यांच्याकडे कल्पकता असते, ते टीमबरोबर बसून एखाद्या गोष्टीबाबत व्हिज्युअलायजेशन करतात नि मग त्याचे डिझाइन ले-आऊट करून स्टेज, कॉश्च्युम्स, त्यावरील अ‍ॅक्सेसरीज कशा असतील आदींचा विचार केला जातो .
* प्रशासन : यात प्रामुख्याने बॅक ऑफिस आणि व्यवस्थापकीय कामकाजाचा समावेश असतो .
* निर्मिती (प्रॉडक्शन) : यात व्यावसायिक तंत्रज्ञ मंडळींचा समावेश असतो, जे ऑडिओ- व्हिडीओ एडिटिंग करून प्रसारमाध्यमांसाठी आवश्यक असलेले क्लीिपग्ज तयार करतात.
* पिंट्रिंग (मुद्रण) : आवश्यक असलेली माहिती मुद्रित स्वरूपात प्रसारित करून, विविध प्रसारमाध्यमांपयर्ंत ती पोहचविणे.
संधी साधण्यासाठीची तयारी :
* जर तुम्ही सेवा क्षेत्रात कार्यरत असाल तर तुम्हाला तऱ्हेतऱ्हेच्या क्षेत्रातील लोकांना भेटण्याची संधी मिळते. अशा वेळी तुमच्यातील संवादकौशल्ये विकसित करता येतात.
* तसे पाहिले तर इव्हेण्ट मॅनेजमेंट क्षेत्रात शिरकाव करण्यासाठी पदवी प्राप्त असली तरी पुरेसे होते. मात्र, आदरातिथ्य व्यवस्थापन, टुरिझम, जनसंपर्क, ह्य़ुमन रिलेशनशिप व्यवस्थापन, मार्केटिंग क्षेत्रातील पदवी अथवा डिप्लोमा असल्यास त्याचा निश्चित फायदा होतो.
* आतापर्यत तुम्ही जे जे समारंभ आयोजित केले, ते कशा पद्धतीने आयोजित केले, काय संकल्पना राबविल्या, कोणत्या कामात तुम्ही सहभागी झाला होता याचा एक सुंदर पोर्टफोलिओ तयार करून ठेवा.  
* एखाद्या प्रसिद्ध संस्थेच्या इव्हेण्ट मॅनेजमेंट प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र अथवा डिप्लोमा असल्यास देखील फायदा होतो. पण ते असलेच पाहिजे, असे काही जरुरी नाही .
इव्हेण्ट मॅनेजरचे करिअर हे प्रसिद्धीच्या वलयात असले तरीही, त्याला कामाच्या निमित्ताने अनेक खडतर गोष्टींचा सामना करावा लागतो. बऱ्याच वेळा तहानभूक विसरून रणरणत्या उन्हात हसऱ्या चेहऱ्याने काम करावे लागते, तर अनेकदा कामाच्या निमित्ताने ठिकठिकाणी फिरावे लागते. अशा वेळी बरेच दिवस कुटुंबापासून लांब राहावे लागते.
जर तुम्हाला इतरांबरोबर मिसळण्याची आवड नसेल किंवा तुमचा स्वभाव लवचिक नसेल तर तुम्ही या क्षेत्रात वाटचाल करू शकणार नाही. इथे ‘लवचिक’चा अर्थ कधीही प्रवासासाठी तयार असावे, असा अभिप्रेत आहे. शिवाय इथे कामाचे तास नियमित नसतात, त्यामुळे गरजेनुसार सलग २४ किंवा ३६ तासदेखील कधी कधी काम करावे लागते. काम असेल तर सकाळी चार वाजतादेखील उठून तयार व्हावे लागते किंवा जिथे समारंभ असेल तिथे दिवसेंदिवस राहण्याची तयारी ठेवावी लागते.  
प्रदर्शन किंवा व्यापारी मेळाव्याचे आयोजन हा इव्हेण्ट मॅनेजमेंटचा अतिशय खडतर असा कार्यक्रम असतो. कारण एकतर तुम्हाला इथे कित्येक तास उभे राहून काम करावे लागते आणि त्यासाठी तुम्ही शारीरिकदृष्टया तंदुरुस्त असणे गरजेचे आहे.
नऊ ते पाच ठराविक कामाचे तास, छान एसी नि उत्तम पगाराचे पॅकेज नि जोडीला पाच दिवसांचा आठवडा या अपेक्षेने तुम्ही जर या क्षेत्रात येणार असाल तर तुमचा भ्रमनिरासच होईल. कारण या क्षेत्रात पसा आहे, पण त्यासाठी खडतर मेहनतीची नि घडय़ाळाकडे न बघता काम करण्याची तयारी हवी.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा