मुलाला येणारा अभ्यासाचा कंटाळा, त्याची अभ्यास टाळण्याची वृत्ती यामुळे हल्ली बहुसंख्य आई-बाबा हतबल होताना दिसतात. अभ्यासाची जबाबदारी मुलाने स्वत:च उचलावी असं प्रत्येक आई-बाबांना वाटत असतं. मुलाला ‘हा माझा अभ्यास आहे,’ असं वाटावं याकरिता पालकांना नेमकं काय करता येईल, हे सांगणारा लेख-
मूल आपलं आपण अभ्यास करत असेल तर ‘वेल अ‍ॅण्ड गुड’ नाहीतर होमवर्क करून घेणं आणि तेही वेळच्या वेळी हे आई-बाबांसाठी एक मोठं दिव्य असतं. काही मुलांच्या बाबतीत ते अगदी नववी-दहावीपर्यंत सुरू राहातं. मुलाला अभ्यासाचा कंटाळा येणं, जाच वाटणं, तो करताना टंगळमंगळ करणं, या सगळ्यातून होणाऱ्या काही प्रातिनिधिक प्रसंगांपासून सुरुवात करू या.
रविवार रात्र. तिसरीतला राहुल दिवसभर हुंदडला आहे. रात्री त्याला अचानक आठवतं- उद्या हस्तकलेचा तास आहे. बाईंनी केशरी आणि हिरवं तोरण बनवून आणायला सांगितलं आहे. आईचा प्रश्न येतो, ‘‘उद्याच हवं आहे का?’’ राहुलचंही उत्तर तयार असतं, ‘‘नवरात्री का काहीतरी सुरू होणार आहे ना, म्हणून हवं आहे उद्याच. नाहीतर रिमार्क देतील बाई.’’ आई सटकतेच हे ऐकून. तिचं सुरू होतं, ‘‘वा! फार लवकर सांगितलंस! तू ना, असा बेजबाबदार आणि वेंधळा आहेस ना! आता कुठे मिळणार तो हिरवा आणि केशरी कागद? एव्हाना दुकानं बंद झाली असतील, आधी सांगितलं असतंस तर..’’
एव्हाना आईच्या रागाचा पारा एकदम वर चढला आहे. एकीकडे राहुलवर चिडत चिडत तिने सामान जमवायला सुरुवात केली आहे. पांढरे कागद आणि रंगांची पेटी. आईचा हात पटापट चालायला लागतो. पांढरे कागद रंगवून हिरवे आणि केशरी होतात. राहुल गोंधळून तसाच उभा असतो. म्हणूनही मग आई वैतागते.
‘‘बघत काय राहिला आहेस. ये आता आणि कर मी सांगते तसं.’’
राहुल काहीतरी करायचा प्रयत्न करतो, पण तो पार पेंगुळला आहे. त्याच्या हातून धड काही पारही पडत नाही. मग आईची पुढची आज्ञा येते, ‘‘जा झोप आता, एवढं नीट करते आहे मी, तर त्यात काही गोंधळ नको घालूस.’’
दुसऱ्या दिवशी सकाळी राहुल उठतो तेव्हा ते केशरी आणि हिरवं तोरण तयार असतं. राहुल ते घेऊन आनंदाने शाळेत जातो.
आठवीतल्या सईबाबतही थोडं असंच होतं. शाळेत प्रोजेक्ट द्यायच्या आठवडाभर आधी ती आईला सांगते. ‘बेस्ट प्रोजेक्ट’ला बक्षीस आहे, हे सांगायला ती विसरत नाही. प्रोजेक्टमधला सईच्या जबाबदारीचा भाग इथे संपला आहे. प्रोजेक्टसाठी अर्थातच इंटरनेटवरून काही माहिती हवी असते, चित्रं हवी असतात. आधी आई तणतणते, त्रागा करते, पण आपलं ऑफिस, घर या सगळ्या व्यापातून वेळ काढून सगळं पार पाडते. ठरल्या दिवशी सईचा प्रोजेक्ट तयार असतो.
दहावीतल्या नीलला रात्री नऊ वाजता आठवतं, उद्या गणिताची वही टीचरना द्यायची आहे. नीलची अर्थातच ती अपूर्ण आहे. पूर्ण संध्याकाळभर त्याने क्रिकेटची मॅच पाहिली आहे. मग तो पळत जाऊन अनुजची वही घेऊन येतो आणि फटाफट सारं उतरवून काढतो. तरीही त्याला झोपायला १२ वाजतात. सकाळी त्याला उठवता-उठवता आईला नाकीनऊ आलेले असतात.
या सगळ्यातून काय दिसतं आहे? राहुलचं आणि सईचं पूर्ण काम आईने करून दिलं आहे. राहुलने अगदी शेवटच्या क्षणी सांगूनही त्याचं काम झालं आहे. सईसाठी तर प्रकल्प ही जणू आईचीच जबाबदारी आहे आणि नीलने कसातरी अभ्यास उरकून टाकला आहे. हे त्याचं त्यानं केलं असलं, तरी सकाळी उठवण्याची जबाबदारी आता आईची झाली आहे.
खरं तर मुलांनी स्वत:चा अभ्यास स्वत: करायला हवा, त्यांना त्यांची जबाबदारी समजायला हवी, असं सगळ्याच पालकांना वाटत असतं. पण ते नेमकं कसं साधता येईल, हे कळत नाही. कदाचित मार्ग सुचत नाही, मदत घ्यायची तर कोणाची हे कळत नाही, त्याबाबतही संकोच वाटत असतो. त्यामुळे परिस्थिती ‘जैसे थे’ राहते. क्वचित मनात-जनात बोलताना ही खंत बाहेरही येते.
मुळात मुलांनी अभ्यासाची जबाबदारी न घेण्यामागे काय असतं, ते पाहू या. अशा मुलांना अभ्यास करायला आवडत नाही, हे तर उघडच आहे. या मुलांकडून आधीपासून अभ्यास कसा करवून घेतला गेलेला असतो? ‘अभ्यासाला बस,’ असं सांगून मूल ऐकत नाही, ते अर्थातच आई-बाबांना सहन होत नाही. मग धाक दाखवून, सक्तीने, दूषणं देऊन, क्वचित मारून का होईना, एकदाचा अभ्यास करून घेण्याकडे त्यांचा कल असतो. येनकेनप्रकारेण का होईना, पण एकदा का आपण सांगितलं तसं मूल वागलं, आजचा दिवस पार पडला की आपल्याला हायसं वाटतं. आज हा उपाय चालला, मग हाच चांगला आहे, असं पक्कं ठरून जातं.
सुरुवातीला बऱ्याचदा मुलं करत नाहीत, म्हणून मुलांचं काम करून देण्यानं सुरुवात होते. मग हौसेने, नंतर कटकट नको म्हणून, मग मुलांच्या चुका होऊ नयेत, म्हणून मदत केली जाते. एकदा का अभ्यास उरकला ना, की झालं. इथे निर्णय घेण्याची जबाबदारी पालकांनी पूर्णपणे स्वत:च्या शिरावर घेतलेली असते. हा फॉम्र्युलापण चालून जातो.
या सगळ्यात ‘मुळात हे मुलाचं काम आहे,’ हे भान सुटून जातं. हे सुटू नये, म्हणून काय करता येईल?
आवडीच्या आणि येत असणाऱ्या विषयाचा अभ्यास आधी करून टाकण्याकडे मुलांचा कल असणं स्वाभाविक आहे. नावडत्या विषयाच्या अभ्यासासाठी तारतम्य राखणं मुलांना शिकवायला हवं. अभ्यास तर करायला हवा आहे, त्याला पर्याय नाही. मग आधी कोणता करायचा, नंतर करून चालेल असा कोणता आहे, हे मुलाला ठरवता यायला हवं. आता हातात जो वेळ आहे त्यात लिहायचा, पाठांतराचा की कृती करायचा- कोणता अभ्यास करणं सोयीचं राहील, याचा अंदाज मुलाला जमायला हवा.
अर्थात ही काही जादूची कांडी फिरवल्यासारखी होणारी गोष्ट नाही. त्याला वेळ लागणार. पण ते जमेपर्यंत मुलांना पालकांकडून आश्वासक आधार मिळणं फार जरुरीचं असतं. हे कसं करता येईल ते पाहू या.
मुळात आपल्या मुलाला अभ्यास करणं फारसं प्रिय नसेल, तर पालकांना ते नीट माहीत असतं. अशा वेळी, ‘‘असा कसा रे तू, तुलाच कसं आवडत नाही अभ्यास करायला, तो अमूक बघू, त्याला कसा नाही तो कंटाळा येत!’’ अशा छापाची वाक्यं टाळणं हे यासाठीच पहिलं पथ्य.
मूल कंटाळतं आहे, थकलं आहे, कोणत्या तरी कारणाने बेचैन आहे, असं दिसलं तर त्याच्या भावनेचा आदर करणं फार महत्त्वाचं. इथे भावनेचा आदर करणं म्हणजे त्याला मोकाट सोडणं किंवा अभ्यास न करायचं लायसन्स देणं असं नव्हे. अशा वेळी, ‘‘खूप आहे नं अभ्यास!’’, ‘‘कंटाळा आलाय ना’’, ‘‘संपतच नाही काम असं वाटतं आहे ना!’’ अशा छोटय़ा वाक्यांमधून मुलांना खूप दिलासा मिळून जातो. यानंतर मग अभ्यास केला नाही तर काय होईल, त्याचे एकूणच परिणाम काय होतील, याची समज देता येते. हे बोलणंही मोकळेपणाने व्हायला हवं. त्याची आज्ञा, सल्ला किंवा उपदेश झाला, तर मुलांना तो झेपत नाही.
त्यासाठी शाळेतून आल्यावर ‘‘आज शाळेत काय झालं? तुला मजा आली का? आज अभ्यास काय आहे?, माझी मदत कशात लागणार आहे का? मी स्वयंपाक करताना काही होऊ शकेल का?’’ हे विचारता येईल.
मुलांना ‘‘आपल्याला काय करता येईल’’ किंवा ‘‘काय करू या’’, हे प्रश्न यात फार मोठी भूमिका बजावतात.
यात मुलांना विचार करायला वाव राहतो. काही वेळा
मुलांना काय करू या या प्रश्नाला उत्तर सुचत नाही.
अशा वेळी मुलांना काही वेगवेगळे पर्याय देता येतील. उदाहरणार्थ, शाळेत खूप होमवर्क दिला आहे, म्हणून
घरी आल्यावर मूल वैतागलं आहे. अशा वेळी
‘‘काय करू या? टी.व्ही.वरचा एखादा प्रोग्रॅम नाही
पाहिला तर?’’ किंवा ‘‘खेळून थोडं लवकर घरी येणार का?’’ यातून मुलाला निवडीला वाव राहतो. मुलाने आपणहून निवडलेल्या एखाद्या पर्यायाची जबाबदारी त्यांना स्वत:ची वाटते.
एवढं करूनही मुलांचा अभ्यासाच्या बाबतीत काही ना काही गोंधळ होतच राहिला (म्हणजे अभ्यास विसरून जाणं, पूर्ण करायचं राहून जाणं, आयत्या वेळेला आठवणं) तर रोज शाळेतून अभ्यास लिहून आणणं अनिवार्य होऊन जातं. घरी आल्यावर त्याची यादी करणं, तो पूर्ण करून कधी द्यायचा आहे याची नोंद करणं, यानं खूप मदत होऊ शकते. उदा. सायन्सची प्रयोगवही पुढच्या आठवडय़ात तयार हवी आहे, पण स्पेलिंग टेस्ट परवा आहे. ही यादी मुलाला आणि आपल्याला समोर दिसेल अशी लावून ठेवणंही सोयीचं होतं. मग यादीप्रमाणे काय काय पार पडलं आहे, एवढं पाहिलं तरी शिल्लक अभ्यासाचा ताळेबंद जमून जातो.
प्रयत्न करूनही अभ्यास टाळण्याकडे मुलाचा कल असेल, तर मुलाला मदत करायला स्पष्ट आणि ठाम नकार देणं आणि अभ्यास वेळेत पुरा न करून देण्याचे परिणाम भोगायला लावणं आई-बाबांना जमायला हवं. इथेही आरडाओरडा वादावादी करून किंवा पूर्ण अबोला धरून काही फारसं हासील होत नाही. इथे खंबीर आणि स्थिर देहबोली (बॉडी लँग्वेज) हवी.
समजा, अभ्यास पूर्ण नाही झाला म्हणून मुलाला काहीही शिक्षा झाली, तर आई-बाबांना ते अर्थातच फार लागतं. त्यांना असहाय वाटतं. अशा हतबल मनस्थितीतून मग मुलाला टोकणं, त्या शिक्षेची वारंवार आठवण करून त्याला टोकणं, त्याचा अपमान करणं, हे होत राहतं. हे आपल्याकडून होत नाही ना, याबाबत पालकांनी जागरूक राहायला हवं.
मुलाचा अभ्यास हे खरं तर न संपणारं प्रकरण आहे. म्हणूनच त्याबाबत आपलं उद्दिष्ट नेमकं काय आहे, हे ठरवणं फार महत्त्वाचं. केवळ अभ्यास पूर्ण करू घेणं, की पुढे जाऊन मूल आपला अभ्यास स्वत: करेल इतकं सक्षम त्याला बनवणं. आपला वेळ आणि मेहनत मुलाला सक्षम बनविण्यावर घेतली, तर तो ‘‘माझा अभ्यास’’ आहे, हे भान मुलाला नक्की येईल आणि एका टप्प्यानंतर निश्चिंतपणे आपल्याला मुलाचं धरलेलं बोट सोडून देता येईल.
medha.limaye13@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Career news medha limaye study parents
Show comments