अंधत्वावर मात करून फिजिओथेरपिस्ट झालेल्या लाभेंद्र म्हात्रे यांना अलीकडेच धन्वंतरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. १५ ऑक्टोबर या अंधांच्या पांढऱ्या काठीच्या दिनानिमित्त त्यांच्या कार्याची ओळख-
गावात बहरलेल्या शेतीचे श्वापदांपासून रक्षण करण्यासाठी तिन्हीसांजेला फटाके फोडले जातात. त्या आवाजाने जंगलातील श्वापदे शेतमळ्याजवळ फिरकत नाहीत. अलिबागमधील नागझरी येथे अकरावीत शिकणारा लाभेंद्र म्हात्रे हा मुलगा पेटवलेला फटाका बराच वेळ फुटला नाही, म्हणून बघायला खाली वाकला आणि तेवढय़ात फटाका फुटला. त्यामुळे क्षणार्धात लाभेंद्रचे आयुष्य प्रकाशातून तिमिराकडे गेले. दीर्घ उपचारांदरम्यान त्याच्या डोळ्यांवर तीन शस्त्रक्रिया झाल्या. उपचाराअंती डावा डोळा संपूर्ण निकामी होऊन, उजव्या डोळ्यांत केवळ १० ते १५ टक्केच दृष्टी आली. त्यातच कौटुंबिक, आर्थिक ओढग्रस्तीमुळे लाभेंद्रच्या उपचारांना दीड वर्षांहून अधिक काळ स्वल्पविराम द्यावा लागला. नंतर पुन्हा उपचारांना सुरुवात झाली खरी पण डोळ्यांचे प्रेशर नियंत्रित न होऊ शकल्याने त्याची दृष्टी अधिकच अधू होऊ लागली आणि त्याला अंधत्व आले.
अचानक झालेल्या या आघातामुळे आणि त्यातून आलेल्या परावलंबित्वामुळे लाभेंद्र पुरते खचले. मात्र आपल्या या मन:स्थितीवर आपणच मात करू शकतो, याची जाणीव झाल्याने त्यांनी आजूबाजूच्या मुलांचा अभ्यास घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या मनाला उभारी येऊ लागली.
त्यानंतर पाच वर्षांनी असोसिएशन फॉर द ब्लाइंड या संस्थेच्या पुनर्वसन केंद्राबाबत कळल्याने घरच्यांनी लाभेंद्रला तिथे दाखल केले. त्या संस्थेत ब्रेल लिपी शिकणे, स्वयंपाकघर हाताळणे, शिवणकाम, शरीरस्वास्थ्य राखणे याबरोबरच मोबिलिटीचे प्रशिक्षण साडेतीन महिन्यांच्या कालावधीत लाभेंद्रला मिळाले. लाभेंद्र म्हणतात, नानासाहेब वाघ या पूर्ण अंध असलेल्या शिक्षकांचे ”We are blind by eyes but not mind” हे वाक्य माझ्या मनावर कोरले गेले.
काठीच्या साहाय्याने आवारातच फिरण्याचा सराव अंध विद्यार्थ्यांना मोबिलिटी ट्रेनिंगअंतर्गत दिला जाई. ज्या दिवशी लाभेंद्रने पहिल्यांदाच कोणाच्याही मदतीशिवाय पहिले पाऊल टाकले, तो क्षणच त्याच्या आयुष्याचा टर्निग पॉइंट ठरला आणि गमावलेला आत्मविश्वास त्याने पुन्हा मिळवला.
संगणकीय व वैद्यकीय क्षेत्रात स्वारस्य असणाऱ्या लाभेंद्रला अंधांसाठी खुल्या असणाऱ्या ज्ञानाच्या नव्या दालनाचा शोध या पुनर्वसन केंद्रात लागला. दोन वर्षांच्या फिजिओथेरपीचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम नॅबमधून तसेच पत्राद्वारे अहमदाबाद येथील संस्थेचा एक वर्षांचा फिजिओथेरपीचा पदविका अभ्यासक्रम लाभेंद्रने पूर्ण केला. याच कालावधीत त्याने संगणकाचे प्राथमिक तसेच प्रोगॅ्रमिंगचे शिक्षण पूर्ण केले. आजमितीला ऑक्युप्रेशरसारखे अनेक व्यवसायाला संलग्न असे १५हून अधिक छोटे-मोठे अभ्यासक्रम त्याने पूर्ण केले आहेत. यातले अध्र्याहून अधिक अभ्यासक्रमांना आंतरराष्ट्रीय मान्यता लाभलेली असून, त्यासाठी त्याने मुंबईबाहेर प्रवासही केला आहे. जे अभ्यासक्रम आपल्या व्यवसायानुकूल आहेत, पण तेथे केवळ अंध म्हणून प्रवेश नाकारला जात आहे, असे अभ्यासक्रम व कार्यशाळा त्यांनी नॅबच्या साहाय्याने आयोजित करून यशस्वीरीत्या पूर्ण केले आहेत.
पदविका पूर्ण केल्यानंतर २००९ रोजी लाभेंद्र पॅराफेजिक फाऊंडेशनमध्ये फिजिओथेरपिस्ट म्हणून रुजू झाले. आपला व्यावसायिक अनुभव विशद करताना ते म्हणतात, ‘पहिल्या दिवशी माझ्या अंधत्वामुळे सारे रुग्ण पळून गेले. ज्यांना चालणे अशक्य होते त्या रुग्णांवरच मी उपचार केले व दोन-तीन दिवसांतच त्यांच्या प्रकृतीत पडलेल्या सकारात्मक फरक पडल्यामुळे तिथल्या रुग्णांना माझ्याबद्दल विश्वास वाटू लागला. या दोन वर्षांच्या कालावधीत समाजसेवेची कामेही ते करू लागले आणि मिळणाऱ्या वेतनातून पैसे साठवून त्यांनी २० हजारांची व्यवसायाला उपयोगी पडतील अशी तीन उपकरणेही घेतली. जुहू पॉलिक्लिनिकमध्ये ते फिजिओथेरपिस्ट म्हणून रुजू झाले. १० हजार रु. भांडवल व तीन मशीन्सच्या साहाय्याने त्यांनी स्वत:चे क्लिनिक चुनाभट्टीत सुरू केले. ‘जस्ट डायल’शी करार करून त्यांनी आपल्या हाताखाली फिजिओथेरपिस्ट, ऑक्युप्रेशर मसाजिस्ट, ऑक्युपेशनल थेरपिस्ट आदी अंध तशाच डोळस व्यक्ती ठेवल्या.
अंध व्यक्ती फिजिओथेरपी करू शकतात, हे उदाहरण त्यांनी घालून दिले असून त्यातून इतरांनाही प्रेरणा मिळेल, असा विश्वास लाभेंद्र म्हात्रे यांना वाटतो.
career.vruttant@expressindia.com
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा