भा रतात आय.बी.एफ.एस. म्हणजेच विमा, बँकिंग आणि फायनान्शियल क्षेत्रामध्ये झपाटय़ाने वाढ होत आहे. नॅशनल स्किल डेव्हलपमेंट आणि ‘असोचेम’च्या म्हणण्यानुसार येत्या १० ते १५ वर्षांमध्ये या क्षेत्रामध्ये २० लाखांहून अधिक नोकरीच्या संधी निर्माण होणार आहेत. देशातील एकूण लोकसंख्येच्या फक्त २४% लोकांपर्यंत बँकिंग सेवा पोहोचली आहे. ९% लोकांपर्यंत विमा सेवा पोहोचली आहे आणि आर्थिक क्षेत्रामध्ये फक्त ३ ते ४% लोक गुंतवणूक करतात. याचाच अर्थ बहुतांश जनता यापासून वंचित आहे. त्यामुळे या क्षेत्रामध्ये फार मोठी व्यवसाय संधी निर्माण झाली आहे. रिझव्‍‌र्ह बँकेने परवान्यांचे नियम शिथिल करून आता कॉर्पोरेट आणि इतर संस्थांनाही बँकिंग परवाने जाहीर केले आहे. त्यामुळे येत्या काही वर्षांमध्ये देशभरात मोठे मोठे उद्योग समूह बँकिंग सेवा सुरू करतील, यामध्ये शंका नाही. काही वर्षांमध्ये रिलायन्स, टाटा, एअरटेल इ. अनेक बँका सुरू होतील. पोस्टानेही आता बँकिंग परवान्यांसाठी अर्ज करायचे ठरविले आहे. या सर्वाना भविष्यामध्ये बँकिंग क्षेत्रातील अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या व्यक्तींची गरज भासणार आहे.
विमाक्षेत्रातही अशीच परिस्थिती आहे. सध्या देशभरामध्ये ५० विमा कंपन्या आयुर्विमा आणि सर्वसाधारण विमा क्षेत्रामध्ये काम करीत आहेत. या क्षेत्रातील परदेशी गुंतवणूक ४९% पर्यंत वाढविण्याचे केंद्र सरकारने जाहीर केले आहे. याचा अर्थ येत्या काही वर्षांमध्ये देशामध्ये २०० हून अधिक कंपन्या विमा क्षेत्रामध्ये काम करतील. हेल्थ इन्शुरन्स हाही एक स्वतंत्र क्षेत्र म्हणून विकसित होत आहे. वित्तीय सेवांमध्ये अनेक म्युच्युअल फंड, शेअर ब्रोकर, वितरक काम करीत आहेत. तसेच बहुतांश बँकांनीही यामध्ये उडी घेतली आहे. बँका म्हणजे सर्व प्रकारच्या आर्थिक सेवा एकाच छत्राखाली देणाऱ्या संस्था बनत आहेत. त्यामुळे या क्षेत्रामध्ये उज्ज्वल करिअर करण्याची फार मोठी संधी उपलब्ध झाली आहे हे निश्चित.
या सर्व परिस्थितीचा अभ्यास करून केळकर कॉलेजने बँकिंग, विमा आणि वित्तीय सेवा या क्षेत्रांमध्ये पदविका अभ्यासक्रम सुरू केले आहेत. यासाठी किमान पात्रता बारावी उत्तीर्ण ही आहे. महाविद्यालयात पदवी घेतानाच  एफ.वाय., एस.वाय., टी.वाय.च्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमांना प्रवेश घेता येईल. याचे वर्ग दर रविवारी होतील.
‘पदवीबरोबर व्यावसायिक पदविका’ असे या अभ्यासक्रमांचे स्वरूप आहे. बँकिंग, विमा आणि फायनान्शियल सव्‍‌र्हिसेस या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या तज्ज्ञ आणि अनुभवी व्यक्तींचे प्रत्यक्ष मार्गदर्शन हे या अभ्यासक्रमांचे वैशिष्टय़ आहे. आपले कॉलेज पूर्ण करता करता विद्यार्थ्यांना त्यांचा ‘रिझ्युमे बिल्डिंगसाठी’ याचा उपयोग होईल. पदवीनंतर त्यांच्या करिअरसंधीचा आलेख अधिक विस्तारेल. एका अर्थाने पदवीबरोबर हे विद्यार्थी आर्थिक क्षेत्रातील कौशल्याने परिपूर्ण असतील. कॉलेज करणाऱ्या विद्यार्थ्यांबरोबर विमा एजंट, बँका, टीपीए, हॉस्पिटल, पतसंस्था, ब्रोकर, सब ब्रोकर्स, विमा कंपन्या, सेवा केंद्रे इ. ठिकाणी काम करणाऱ्या व्यक्तींना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येईल. त्यांना त्यांच्या करिअरमध्ये प्रगती करण्यासाठी या क्षेत्रामधील मान्यताप्राप्त पदविका उपयुक्त ठरेल.
 या अभ्यासक्रमांची फी माफक ठेवण्यात आली असून या अभ्यासक्रमांना टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची मान्यता प्राप्त आहे. अधिक माहितीसाठी संपर्क -मुलुंडच्या केळकर महाविद्यालयाचा ९०२९२९०४८४ या दूरध्वनी क्रमांक.    ई-मेल-vazeibts@gmail.com