रुग्णालय व्यवस्थापन आणि प्रशासकीय क्षेत्रात करिअरच्या नवनव्या संधी उपलब्ध होत आहेत. या क्षेत्राशी संबंधित अभ्यासक्रमांचा आढावा-
नव्वदच्या दशकात आपल्याकडे व्यापार आणि उद्योग व्यवसायात जे जागतिकीकरणाचे बदल झाले, त्याचे  सकारात्मक परिणाम आपल्याला गेल्या काही वर्षांत आरोग्य सेवा क्षेत्रावर झालेले दिसून येत आहेत. औषध विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयांत झपाटय़ाने होणाऱ्या प्रगतीचा रोख हा प्रामुख्याने रुग्ण आणि रुग्णसेवा याभोवती केंद्रित असल्याचे आपल्याला दिसून येते.
अलीकडे समाजाच्या सर्वच स्तरांत शरीरस्वास्थ्याविषयी जागरूकता वाढत आहे. साहजिकच आरोग्यविषयक सेवांची गुणवत्ता आणि रुग्णाचे मानसिक समाधान या बाबी दिवसेंदिवस महत्त्वाच्या ठरत आहेत. या सर्व गोष्टींचा एकत्रित विचार करता,   सेवाभावी वृत्तीच्या होतकरू युवक-युवतींसाठी रुग्णालय व्यवस्थापन आणि प्रशासकीय क्षेत्रात करिअरच्या नवनव्या संधी उपलब्ध आहेत.
या विषयासंदर्भातील विविध शिक्षणक्रमांत रुग्णालयांशी निगडित व्यवस्थापनाचे तंत्र, व्यवस्थापन कौशल्य, आíथक व्यवहार नियोजन, रुग्णालय संबंधित वस्तूंचे विपणन (मार्केटिंग) व पुरवठा अशा अनेक गोष्टींचे आवश्यक प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिले जाते. रुग्णालय व्यवस्थापन आणि प्रशासकीय क्षेत्रात स्वत:चे स्थान निर्माण करण्यासाठी उमेदवाराने नवनवीन जबाबदाऱ्या पेलण्याची, स्वयंप्रेरित असण्याची गरज असते. कष्टाळू आणि सहृदय युवावर्गाला या कार्यक्षेत्रात नक्कीच वाव आहे.
या सेवा क्षेत्रातील विषयांचे शिक्षण देणाऱ्या शिक्षणक्रमांची माहिती पुढीलप्रमाणे आहे –
शिक्षणक्रम
०    बी.एच.ए. – बॅचलर ऑफ हॉस्पिटल अॅडमिनिस्ट्रेशन
०    पी.जी.डी.एच.ए.- पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन हॉस्पिटल अॅडमिनिस्ट्रेशन  
०    एम.एच.ए – मास्टर ऑफ हॉस्पिटल अॅडमिनिस्ट्रेशन
०    एम.बी.ए. हॉस्पिटल अॅडमिनिस्ट्रेशन  
अर्हता
या सर्व शिक्षणक्रमांसाठी कोणत्याही विद्याशाखेतून बारावी उत्तीर्ण झालेला विद्यार्थी/ विद्याíथनी प्रवेशास पात्र असते. कोणत्याही शाखेचा पदवीधर उमेदवार हा हॉस्पिटल मॅनेजमेंट अॅण्ड अॅडमिनिस्ट्रेशन या शिक्षणक्रमातील पदव्युत्तर शिक्षणक्रमाच्या प्रवेशासाठी म्हणजेच मास्टर्स आणि पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा या शिक्षणक्रमातील प्रवेशास पात्र असतो. पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झाल्यानंतर इच्छुक उमेदवार याच विद्याशाखेत एम.फिल.सारखे उच्च शिक्षणही मिळवू शकतात. यासाठी अर्धवेळ, पूर्णवेळ किंवा दूरस्थ शिक्षण पद्धतीचे विविध शिक्षणक्रम उपलब्ध आहेत.
करिअर संधी
या कार्यक्षेत्रात प्रगतीच्या अमाप संधी निर्माण होत आहेत. केवळ रोजगारच नव्हे तर स्वयंरोजगाराच्या अनेक संधीही या क्षेत्रात मोठय़ा प्रमाणावर उपलब्ध आहेत. या विषयांत शिक्षण घेतलेल्या व्यक्ती  वैद्यक विद्याशाखेतील पदवीधर नसतानासुद्धा एखाद्या मल्टिस्पेशालिटी रुग्णालयाच्या व्यवस्थापन विभागात पद सांभाळू शकते. सरकारी कार्यालये, लहान-मोठी रुग्णालये, आरोग्य केंद्रे, देशी-विदेशी खासगी कंपन्यांनी चालवलेली रुग्णालये, औषध निर्माण कंपन्या, आरोग्यविषयक सल्लागार केंद्रे, आयुर्वमिा कंपन्या, शुश्रूषा गृहे येथे नोकरीच्या संधी उपलब्ध असतात. कामाच्या पुरेशा अनुभवानंतर या क्षेत्रातील उच्चशिक्षित व्यक्तींना विविध शिक्षणसंस्थांत अध्यापनाच्या संधीही मिळू शकतात. प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतल्यानंतर स्वत:चे नìसग होम किंवा रुग्णालय चालवणेही शक्य होते.
शिक्षणसंस्था
हॉस्पिटल मॅनेजमेंट अॅण्ड अॅडमिनिस्ट्रेशन या विषयाचे प्रशिक्षण देणाऱ्या अनेक उत्तम शिक्षण संस्था आणि शिक्षणक्रम आपल्या देशात अस्तित्वात आहेत. त्यातील काही प्रमुख संस्था
खालीलप्रमाणे आहेत –
०    ऑल इंडिया इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्सेस (ए.आय.आय.एम.एस.), नवी दिल्ली.
०    अपोलो इन्स्टिटय़ूट ऑफ हॉस्पिटल अॅडमिनिस्ट्रेशन, हैद्राबाद.
०    बिर्ला इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी अॅण्ड सायन्स, पिलानी.
०    सिम्बॉयसिस इन्स्टिटय़ूट ऑफ हेल्थ सायन्सेस, पुणे.
०    डेक्कन स्कूल ऑफ मॅनेजमेंट, हैद्राबाद.
०    टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्सेस, मुंबई.
०    अॅडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफ कॉलेज ऑफ इंडिया, हैद्राबाद.
०    मदुराई कामराज युनिव्हर्सटिी, मदुराई.
०    इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल वेल्फेअर अॅण्ड बिझनेस मॅनेजमेंट, जयपूर.
०    निझाम्स इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्सेस, हैद्राबाद.
०    सिम्बॉयसिस सेंटर ऑफ हेल्थ केअर, पुणे.
०    बिर्ला इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, रांची.  
वेतन
या कार्यक्षेत्रात मिळणारे मासिक अथवा वार्षकि वेतन आपण काम करीत असलेल्या रुग्णालय प्रशासन आणि व्यवस्थापक मंडळावर अवलंबून असते. अननुभवी पदवीधर उमेदवाराची मासिक प्राप्ती आठ हजार ते १२ हजार रुपये इतकी असू शकते. पुरेशा अनुभवाअंती प्राप्तीचे प्रमाण महिना ४० हजार रुपयांपर्यंत पोहोचू शकते. बहुराष्ट्रीय किंवा मोठय़ा देशी कंपन्यांकडून संचालित असलेल्या आरोग्य केंद्रांत अनुभवी आणि उच्चशिक्षित उमेदवारांना प्राधान्य दिले जाते. अर्थातच त्यांना मिळणारे वेतनही उत्तम असते. इतकेच नव्हे तर या विषयांतील शिक्षित आणि अनुभवी व्यक्तींना परदेशातही मोठय़ा वेतनाच्या संधीही मिळू शकतात.
तेव्हा वाचक मित्र-मत्रिणींनो, मुळात तुम्ही कोणत्याही विद्याशाखेचे पदवीधर असलात तरी रुग्णालय व्यवस्थापन आणि प्रशासकीय क्षेत्रात तुम्ही सहज प्रवेश करू शकता. या नावीन्यपूर्ण आणि व्यावसायिक स्वरूपाच्या कार्यक्षेत्रात रोजगाराच्या आणि स्वयंरोजगाराच्या अनेक संधी तुमची वाट पाहात आहेत.

Story img Loader