जबाबदारी म्हणजे आपण स्वत:हून स्वीकारलेली एक भूमिका असते, जी सांगते की, तुमच्या कृतीतून घडणाऱ्या आणि घडवण्याच्या परिणामांचं तुम्ही स्वत: कारण आहात.. बिरबलाच्या चातुर्यकथांमधली बादशहाच्या मेव्हण्याची गोष्ट आपल्याला सर्वाना ठाऊक आहे. एकदा बेगम बादशहाकडे हट्ट धरते,  ‘बिरबलापेक्षा माझा भाऊ जास्त हुशार आहे. बिरबलाच्या जागी माझ्या भावालाच प्रधान करा.’ धर्मसंकटात सापडलेला बादशहा म्हणतो, ‘मी दोघांची परीक्षा घेऊन निर्णय देईन.’  
त्यानंतर एकदा बादशहा निवांत बसलेला असताना त्याच्या कानावर एका लयीतला घुंगरांचा आवाज पडतो. तो मेव्हण्याकडे त्याबाबत चौकशी करतो. मेव्हणा धावत जाऊन पाहून येतो आणि सांगतो, ‘काही बैलगाडय़ा राजवाडय़ासमोरच्या रस्त्यावरून चालल्या आहेत. त्या बैलांच्या गळ्यातल्या घुंगरांचा आवाज आहे.’ बादशहा विचारतो, ‘काय आहे त्या बैलगाडय़ांत?’ मेव्हणा पुन्हा धावत जाऊन पळत येतो, ‘तांदळाची पोती आहेत.’ असं अनेक वेळा होतं. ‘बैलगाडय़ा कुठून आल्यात?’, ‘कुठे चालल्या आहेत?’, ‘तांदूळ कुठला आहे?’ वगैरे एकामागून एक प्रश्न बादशहा विचारत जातो आणि दरवेळी धावत जाऊन मेव्हणा तेवढय़ा प्रश्नाचं उत्तर घेऊन माघारी येतो. हेलपाटय़ांनी पार थकून जातो. त्यानंतर बादशहा बिरबलाला बोलावून घेतो आणि त्याच्याहीकडे त्या एका लयीतल्या घुंगरांच्या आवाजाची चौकशी करतो. बिरबल मुजरा करून बाहेर पडतो तो थेट दोन-तीन तासांनी उगवतो. आल्यानंतर सांगतो, ‘त्या ५५ बैलगाडय़ा होत्या. सर्वामध्ये मिळून उत्तम प्रतीचा साधारण हजार मण बासमती तांदूळ होता. एक व्यापारी तो विकण्यासाठी शेजारच्या राज्यातल्या बाजारपेठेत घेऊन चालला होता. आपल्या कोठारात तांदूळ भरायचाच होता. मी मालाचा दर्जा तपासला, किंमतही वाजवी होती. एकरकमी खरेदी होतेय म्हटल्यावर व्यापाऱ्यानं किंमत आणखी कमी केली. गाडय़ा खाली करून घेण्याची व्यवस्था करून मी आपल्याकडे आलो, त्यामुळे थोडा उशीर झाला. घुंगरांच्या आवाजाची आपण चौकशी केलीत, त्यामुळे फटक्यात आपले एक महत्त्वाचे काम झाले.’ बादशहा समाधानानं हसतो आणि बेगम आणि तिचा भाऊ शरिमदे होतात. .. लहानपणी वाचलेल्या बोधकथांचा बोध खरंतर आपल्याला मोठेपणीच जास्त नीट होत असतो. आपल्या अनुभवाची कक्षा विस्तारते तशा वेगवेगळ्या अंगांनी त्या कथा आपल्याला समजत जातात. लहानपणी ही कथा ऐकल्यावर ‘बिरबल किती हुशार’ असं वाटलं असेल. पण आता ही कथा बिरबलाची चातुर्यकथा वाटण्यापेक्षा ‘जबाबदारी’ बद्दल सांगणारी कथा वाटते.  मेव्हण्याच्या दृष्टीने त्याची जबाबदारी ‘बादशहाची आज्ञा ताबडतोब पाळणे’ एवढीच होती. त्यामागे बादशहाने आपल्यावर खूश व्हावे, ही इच्छा होतीच, पण मर्जी सांभाळण्याच्या इच्छेमागे ‘मर्जी उतरू नये’ ही भीतीही अध्यहृत असते. झटपट आज्ञा पाळून मर्जी सांभाळण्याच्या नादात, मेव्हण्याने स्वत:चा स्वत: परिस्थितीचा अर्थ तर लावला नाहीच, पण बादशहा आपल्याला पुन:पुन्हा पाठवतो आहे, म्हणजे त्याला आणखी काहीतरी हवं आहे, एवढाही विचार केला नाही. त्याच्या दृष्टीने त्यानं भरपूर काम केलं होतं. पण मेव्हणा त्या कामाने भरपूर दमला तरीही बादशहा नाराजच राहिला. बिरबलाच्या मनात बादशहाला खूश करणं, हा मुद्दाच नव्हता. बादशहाला काय हवं आहे, यापेक्षा त्या कामातून चांगल्यात चांगलं काय साधता येऊ शकतं, हा विचार त्याच्या मनात होता. राज्याच्या दृष्टीनं फायदा देणारा निर्णय घेणं ही जबाबदारी त्यानं मनापासून स्वीकारली होती. घुंगरांच्या आवाजाची चौकशी बादशहानं सहज केली की काही हेतू मनात ठेवून केली, याचा परिणाम बिरबलाच्या विचारपद्धतीवर नव्हता. बिरबलाने त्या चौकशीतून पूर्ण माहिती काढून तिचा दोन्ही बाजूंना फायदा होईल, असा उपयोग केला. तांदूळ विकायचे कष्ट आणि पुढचा प्रवास वाचला, म्हणून व्यापारी खूश आणि उत्तम माल दारात मिळून वर सौदा स्वस्तात झाल्याबद्दल बिरबलही खूश. इथे विषय येतो तो आपली जबाबदारी समजण्याचा. कामाकडे बघण्याच्या दृष्टिकोनाचा. दोन दृष्टिकोनांमधला हा फरक इंग्रजीमधल्या Responsibility & Accountability  या दोन शब्दांतून खूप नीट स्पष्ट होतो. ‘सांगितलेलं काम झालं का?’ हे पाहणं म्हणजे जबाबदारी ( Responsibility)  आणि ‘त्यातून हवा तो परिणाम मिळाला का?’ ते पाहणं हे झालं उत्तरदायित्व ( Accountability).  आपण मराठीत त्यासाठी कधीकधी ‘उत्तरदायित्व’ हा शब्द वापरतो. परंतु, अर्थ नीट स्पष्ट होण्यासाठी आपण ‘परिणामापर्यंतची जबाबदारी’ असाच शब्दप्रयोग वापरू.      जबाबदारी घेण्याच्या बाबतीत व्यक्तीची बुद्धी आणि अनुभव महत्त्वाचे असतातच, पण त्याहीपेक्षा, जबाबदारी घेणं ही वृत्ती असते. बिरबलाचा वेगळेपणा त्या वृत्तीत होता. बिरबल प्रधान नसता, तरीही त्यानं चौकशी पूर्णच केली असती. फारतर तांदळाच्या खरेदीसाठी बादशहाची परवानगी मागितली असती. आणखी एखादा मधला सरदार एका हेलपाटय़ात बादशहाच्या मेव्हण्यापेक्षा थोडी जास्त तपशीलवार चौकशी करून आला असता. पण परिस्थितीचा किंवा एखाद्या घटनेचा उपयोग करून किती जास्तीतजास्त तर्कशुद्ध शेवटापर्यंत  (Logical end) पोहोचता येतं, ती असते परिणामापर्यंतची जबाबदारी घेण्याची क्षमता. ही क्षमता जेवढी जास्त तेवढा तुमच्यावरचा संबंधितांचा विश्वास जास्त. शासकीय प्रणालीत अनेकदा पैसा खर्च होतो, कर्मचारी वेळेवर येतात, पूर्ण पगार घेतात, मात्र काम समाधानकारकपणे पूर्ण होत नाही. याचं कारण त्यावेळी जबाबदारीची व्याख्या बादशहाच्या मेव्हण्याप्रमाणे ‘सांगितलेले काम करणे, टिक मारणे’ एवढीच घेतली गेलेली असते. बादशहाच्या मेव्हण्यासाठी आपण  ‘सांगकाम्या’ हा शब्द वापरला असता. पण सिस्टीममधल्या बहुसंख्य लोकांना जेव्हा अशा पद्धतीनंच काम करण्याची सवय लागते तेव्हा एवढी लक्षावधी माणसं सांगकामी आहेत, असं म्हणणं चूक ठरेल. तिथे काय घडतं, ते पाहायला हवं. नुसती जबाबदारी ही ‘प्रोसेस ओरिएण्टेड’ असते. समजा, रस्ते झाडण्याचं काम आहे. तर सफाई कामगार वेळेवर आले का? त्यांनी सह्य़ा केल्या का? रजा हवी असेल तर रजेचे अर्ज नीट भरले का, इत्यादी तपशील पाहणं हे झालं प्रोसेस ओरिएण्टेशन. पण खरोखर स्वच्छता झाली का? ती सातत्याने रोज होते आहे का? ओला-सुका कचरा वेगळा करणं अपेक्षित असेल तर तो १००टक्क्य़ांच्या जवळपास होतो आहे का? हे घडवण्याची जबाबदारी म्हणज रिझल्ट ओरिएण्टेशन. ते घडलं नाही तर प्रोसेस ओरिएण्टेड कर्मचारी समर्थन देऊ शकतो की, ‘पाहा ना, मी लोकांना रोज सांगतो, पण नागरिक ओला-सुका कचरा वेगळा करून देतच नाहीत. आपल्या लोकांना स्वच्छतेची सवयच नाही, आमच्याकडे ओल्या-सुक्यासाठी वेगळ्या बादल्याच नाहीत, कितीही सांगितलं तरी सफाई कामगार वेळेवर येतच नाहीत..’ वगैरे काहीही.. तर रिझल्ट ओरिएण्टेड माणूस ते न घडण्याच्या प्रत्येक कारणाच्या मुळापर्यंत टप्प्याटप्प्यानं जाईल. काय घडतंय ते बघून प्रत्येक कारणाचं मूळ संपवण्यापर्यंत उपाय शोधेल आणि ‘सातत्यपूर्ण स्वच्छता’ घडेल, असं पाहील.  प्रक्रियेलाच जेव्हा महत्त्व येतं तेव्हा समर्थनं शोधण्याची सवयही सोबत येते. ‘मी दोन-तीनदा प्रयत्न केला, पण फोन लागलाच नाही.’ ‘उशीर झाला, कारण रहदारी फार होती’, ‘आम्हाला खूप करायचं असतं, पण साहेब शांतपणे कामच करू देत नाही.’ अशा सबबी देणारी माणसं बहुधा प्रोसेस ओरिएण्टेड असतात. त्यांच्या बोलण्यात ‘माझ्या हातात काहीच नाही, ते काम न होण्याला दुसरीच व्यक्ती किंवा परिस्थिती जबाबदार आहे,’ असा सूर असतो. तक्रारखोरपणा दिसतो. प्रोसेस ओरिएण्टेड माणसाला अनेकदा हे कळतच नाही, की ‘तुम्ही तीनदा फोन केला की, आणखी काही केलं, ते महत्त्वाचं नाही, तर संबंधित माणसाला कुठल्याही परिस्थितीत निरोप वेळेवर मिळणं गरजेचं आहे.’ क्वचित ते लक्षात आलं तरी त्यासाठी ‘मी काय करायला पाहिजे?’  ते प्रोसेस ओरिएण्टेड माणसाला कळत नाही आणि त्यातून जबाबदारीची एकमेकांवर ढकलाढकली होत राहते.   तसं बघितलं तर रेल्वे संस्थानदेखील सरकारीच असतं, पण तिथे काम झालं नाही, असं कधीच होत नाही. इंजिनच शिल्लक नाही, ट्रेनच सुटली नाही, तिकीटच मिळत नाही असं कधीही घडत नाही, कारण ती व्यवस्था बांधताना प्रत्येक क्षणाला ‘रिझल्ट ओरिएण्टेशन’ने विचार केलेला असतो. तिथे काम करणारी माणसं काही वेगळी नसतात. पण जास्तीतजास्त लूपहोल्सची काळजी कशी घ्यायची, ते व्यवस्थेमध्येच बांधलं गेलेलं असतं. तिथल्या प्रत्येक माणसात ती सवय आपोआप रुजते. खासगी उद्योगांतलं रिझल्ट ओरिएण्टेशनचं उत्तम उदाहरण म्हणजे वृत्तपत्र उद्योग. काहीही घडलं तरी रोजचं वृत्तपत्र ठरलेल्या वेळी निघणारच. संस्था सरकारी संस्था असो की, खासगी, तिथलं किती जास्त काम प्रोसेस ओरिएण्टेशनने किंवा रिझल्ट ओरिएण्टेशनने चालतं, ते शोधलं पाहिजे. त्या पातळीनुसार ‘जबाबदारी ते उत्तरदायित्व’ या श्रेणीवर आपण कुठे आहोत, ते ठरवणं व्यक्ती किंवा संस्थेला सोपं जाईल. (अपवादात्मक परिस्थिती सगळीकडे असू शकते, हे गृहीत आहे. त्याबाबत ही चर्चा नाही.) हे झालं थोडंसं सामुदायिक आणि तात्त्विक विश्लेषण. पण व्यक्तिगत पातळीवर जबाबदारी म्हणजे नक्की काय? व्यक्तिश: एखादी जबाबदारी घेताना तिच्याकडे कसं बघायचं, यावर एकदा एका गटासोबत मुक्त चर्चा चालू होती. प्रत्येकजण पूर्वानुभवाच्या आधारावर विचार करून प्रामाणिकपणे मतं मांडत होता. एकजण म्हणाला, जसा पैशाकडे पैसा जातो आणि वाढतो, तशी जबाबदारी घेणाऱ्याकडे जबाबदारी जाते आणि वाढते. अशा वेळी तिचं ‘ओझं’ वाटतं. एकीला ‘एखादी जबाबदारी घेणं’ ही ‘क्रेडिटेबल गोष्ट’ वाटत होती, कुणाला ‘जबाबदारी घेण्याचं कौतुक होतं’ म्हणून जबाबदारी घ्यायला आवडत होती. एखाद्याला आपल्याकडून झालेल्या एखाद्या चुकीची जबाबदारी घेण्याची ‘लाज’ वाटत होती, कुणाला ‘कामाला इतकं वाहून घेऊन काय मिळणार आहे?’ असे सल्ले वारंवार मिळाल्यानं जास्त जबाबदारी घेणं चूक आहे की बरोबर, असा साशंक सूरही निघत होता. एकजण म्हणाला, ‘मी थोडा संभ्रमात आहे. मी जिवंत असेपर्यंत माझं कुटुंब उपाशी मरणार नाही,’ ही जबाबदारी वैयक्तिक पातळीवर मी मनोमन स्वीकारलेली आहे आणि ती प्रामाणिक आहे. पण त्याच वेळी मला हेदेखील माहीत आहे की, उद्या कुठलीही परिस्थिती येऊ शकते. समजा, आम्ही पुरात सापडलो, निर्जन ठिकाणी अडकलो, त्सुनामी आली तर मी काय जबाबदारी घेणार? म्हणजे मी घेतलेली जबाबदारी हे पूर्णसत्य नाही. पण तरीही माझ्या जबाबदारीचं भान मला प्रत्येक क्षणाला असतं. मग जबाबदारी म्हणजे काय?’ या गटचच्रेतल्या मंथनानंतर ‘जबाबदारी’बद्दल जे निघालं, ते फार सुंदर होतं.  ‘जबाबदारी म्हणजे आपण स्वत:हून स्वीकारलेली एक भूमिका असते, जी सांगते की, तुमच्या कृतीतून घडणाऱ्या आणि घडवण्याच्या परिणामांचं तुम्ही स्वत: कारण आहात. जबाबदारी कुणीही दुसऱ्यावर लादू शकत नाही. जबाबदारी हे पूर्णसत्य नसेल, पण ते तुम्ही स्वत: स्वत:साठी ठरवून निर्माण केलेलं, उभं राहण्याचं एक स्थान असतं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा