सुनील शेळगांवकर
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांपासून (UPSC)) ते तलाठी भरतीपर्यंतच्या सर्व परीक्षांना काही अभ्यासक्रम अनिवार्य असतोच. आज आपण लिपिक व टंकलेखक, विक्रीकर विभागातील कर साहाय्यक, दुय्यम निरीक्षक उत्पादन शुल्क-गट क संयुक्त सेवा परीक्षा २०१८ मधील पेपर क्र. २ साठीच्या अनिवार्य अभासक्रमाविषयी चर्चा करणार आहोत.
१) चालू घडामोडी –
चालू घडामोडी हा विषय या तिन्ही पदांसाठीच्या मुख्य परीक्षेसाठी अनिवार्य आहे. या घटकांतर्गत कर साहाय्यक व दुय्यम निरीक्षक उत्पादन शुल्क या दोन्ही मुख्य परीक्षांचा अभ्यासक्रम जागतिक तसेच भारतातील चालू घडामोडी असा आहे तर लिपिक – टंकलेखक परीक्षेसाठी भारतातील व महाराष्ट्रातील चालू घडामोडी असा अभ्यासक्रम आहे. याशिवाय लिपिक व टंकलेखकाच्या मुख्य परीक्षेसाठी भारतातील व महाराष्ट्रातील क्रीडा व साहित्य क्षेत्रातील पुरस्कार व माहिती हा उपघटकही विचारला जाणार आहे.
अभ्यासपद्धती – या घटकाच्या अभ्यासासाठी सुमारे एक वर्ष अगोदरच्या ठळक चालू घडामोडींचा अभ्यास करावा. हा अभ्यास आíथक, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन, संरक्षण, विज्ञान, साहित्य, क्रीडा यांसारख्या उपघटकात जागतिक व भारतातील चालू घडामोडी विभागून कराव्यात.
अभ्याससाहित्य – वर्तमानपत्रे, योजना व कुरुक्षेत्र मासिक, बाजारातील कोणतेही एक चालू घडामोडींचे पुस्तक
२) बुद्धिमत्ता चाचणी व अंकगणित –
उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो याचा अंदाज घेण्याच्या दृष्टीने बुद्धिमापनविषयक शाब्दिक व अशाब्दिक उदाहरणे परीक्षेत विचारले जातील. याचा दर्जा पदवी असा राहील. तर, विद्यार्थ्यांना गणितीय कौशल्ये प्राप्त आहेत का नाहीत हे पाहण्यासाठी अंकगणित, बीजगणित, भूमिती आणि सांख्यिकी या उपघटकावर आधारित दहावीपर्यंतच्या काठिण्य पातळीवरील प्रश्न तिन्ही मुख्य परीक्षांत विचारले जाणार आहेत.
अभ्यासपद्धती – १ ते ३० पर्यंतचे पाढे, १ ते ३० पर्यंतचे वर्ग, १ ते १० पर्यंतचे घन, संख्याज्ञान, कंचेभागुबेव (BODMAS), लसावि, मसावि, अपूर्णाक, घातांक, शेकडेवारी, गुणोत्तर प्रमाण यांचा अनुक्रमे प्रथम अभ्यास करावा. तद्नंतर, स्पर्धा परीक्षा बुद्धिमत्ता चाचणी व अंकगणितविषयक अभ्यास करावा.
अभ्यास साहित्य – अंकगणित व बुद्धिमत्ताविषयक पाचवी व आठवी शिष्यवृत्तीची पुस्तके तसेच स्पर्धा परीक्षा अंकगणित व बुद्धिमत्ताविषयक पंढरीनाथ राणे आणि वा. ना. दांडेकर यांची पुस्तके.
३) सामान्यज्ञान –
या घटकांतर्गत लिपिक व टंकलेखक परीक्षेसाठी इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र इत्यादी. घटकांचा समावेश होतो. याबरोबरच सामान्य विज्ञान या घटकांतर्गत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व जीवशास्त्र आणि पर्यावरण या घटकांचा समावेश होतो.
अभ्यासपद्धती व अभ्याससाहित्य – इयत्ता चौथी ते इयत्ता अकरावीपर्यंतची बालभारतीची तत्सम विषयाची पुस्तके वाचावीत. तद्नंतर, सामान्य काठिण्य पातळीच्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या इतर प्रश्नपत्रिका यातून उपरोक्त अभ्यासक्रम आणि प्रश्नप्रकार समजून घ्यावा. शालेय पुस्तकात न सापडणारा अभ्यासक्रम बाजारातील कोणतेही एक पुस्तक किंवा इंटरनेटवर उपलब्ध माहितीतून (विकिपिडिया) अभ्यासावा. यातून स्वत: काढलेल्या टिप्पणांचा वारंवार अभ्यास करावा.
सामान्यज्ञान (दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क)-
या मुख्य परीक्षेसाठी सामान्यज्ञान या घटकांतर्गत भारतीय राज्यघटना या एकाच उपघटकाचा समावेश होतो. हा उपघटक भारतीय राज्यघटना आणि नागरिकशास्त्र या मथळ्याखाली ‘कर साहाय्यक’ या मुख्य परीक्षेसाठीही आहे.
अभ्यासपद्धती व अभ्याससाहित्य – या विषयाचा अभ्यास करण्यासाठी राज्यघटनेची निर्मिती, प्रस्तावना, घटनेतील महत्त्वाची कलमे, मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्ये, केंद्र-राज्य संबंध, भारत एक निधर्मी राष्ट्र, राज्य कार्यकारी मंडळ यांचे सदस्याधिकार काय्रे, न्यायमंडळ, विविध विधीविषयक समित्या यांसारख्या बाबींचा अभ्यास करावा. याबरोबरच, नागरिकशास्त्र या घटकांतील उपघटकांसाठी नागरी व ग्रामीण व्यवस्थापन व प्रशासन यांचा अभ्यास करावा. यासाठी अकरावी व बारावीची राज्य व नागरिकशास्त्रविषयक पुस्तके आणि एम. लक्ष्मीकांत हे पुस्तक वापरावे.
४) अर्थशास्त्र –
सर्वसामान्यपणे, अधिकांश महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे घेतल्या जाणाऱ्या परीक्षांसाठी हा घटक अनिवार्य असतो. मात्र, या संयुक्त मुख्य परीक्षेसाठी हा घटक फक्त कर साहाय्यक मुख्य परीक्षेपुरता मर्यादित आहे. या घटकांतर्गत पंचवार्षकि योजना, आíथक सुधारणा व कायदे हा भाग परीक्षेत विचारला जाईल.
अभ्यासपद्धती व अभ्याससाहित्य – पहिली ते बारावी पंचवार्षकि योजना, निती आयोग तसेच उदारीकरण- जागतिकीकरण – खासगीकरण या संकल्पना आणि त्यांची व्याप्ती. केंद्र व राज्य स्तरावरील आíथक सुधारणा, जागतिक व्यापार परिषद तरतुदी सुधारणा, त्यांचे भारतीय अर्थव्यवस्थेवरील परिणाम, विक्रीकर, मूल्यवíधत कर (VAT) , वस्तू व सेवा कर (GST) यांचा अभ्यास करावा.
यासाठी पदवी परीक्षांसाठी असणारे भारतीय अर्थव्यवस्था हे कोणत्याही विद्यापीठाचे पुस्तक आणि सरकारी संकेतस्थळांचा वापर करावा.