मी एफ. वाय बी.एस्सीला रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र आणि प्राणीशास्त्र हे विषय घेतले आहेत. या विषयांमध्ये करिअरच्या संधी कोणत्या आहेत? मला एमपीएससी परीक्षासुद्धा द्यायची आहे. मला मार्गदर्शन करावे.
– श्वेता करनकाळ
श्वेता, तू बी.एस्सीला असलेल्या कोणत्याही एका विषयात पदव्युत्तर पदवी घेतलीस व पुढे संशोधनास प्राधान्य दिले तर तुला देश-विदेशातील विविध प्रयोगशाळा, खासगी उद्योगांच्या प्रयोगशाळा यामध्ये करिअर संधी मिळू शकतात. मात्र त्यासाठी तू चांगल्या दर्जेदार संस्थेमधून किंवा आयआयटी किंवा एनआयटी किंवा इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्समधून एम.एस्सी आणि पीएच.डी. करणे आवश्यक आहे. तू इंडियन फॉरेस्ट सव्र्हिस देऊन भारतीय वन खात्यात वरिष्ठ पदावर जाऊ शकतेस. एमपीएससीची तयारी करण्यासाठी तुला आधी सामान्य अध्ययन, इंग्रजी व मराठी भाषा, चालू घडामोडी यांचा पाया भक्कम करावा लागेल. १२ वीपर्यंतची क्रमिक पुस्तके वाचून मूलभूत संकल्पना स्पष्ट केल्यास त्याचा फायदा होऊ शकतो.
मी कला शाखेच्या दुसऱ्या वर्गाला आहे. मला एमपीएससीमार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षेची तयारी करायची आहे. पहिल्यांदा अभ्यास सुरू करताना मी कसा अभ्यास करू? कोणते पुस्तक वाचू?
– शुभम लडकत
शुभम, तू राज्यसेवा परीक्षेची तयारी करण्यासाठी पुढील टप्प्यांचा अवलंब करावा.
(१) लोकसत्तासारखे मराठी दैनिक व एखादे चांगले इंग्रजी दैनिक यांचे नियमित वाचन सुरू कर. त्यातील दैनंदिन घटना, घडामोडींची नोंदवही तयार कर. राज्य शासनाच्या विविध योजना, निर्णय, धोरणे यांची माहिती गोळा कर.
(२) महाराष्ट्राचा भूगोल, इतिहास, अर्थकारण, समाजकारण, शेती, संस्कृती, पर्यटन, ऐतिहासिक स्थळे, वने, नद्या, पर्वतरांगा, प्रमुख नेते व थोर पुरुषांची माहिती गोळा कर व त्याच्या नोंदी करून ठेव.
(३) मराठी आणि इंग्रजी भाषेची अधिकाधिक तयारी कर.
(४) १२वी पर्यंतची बोर्डाची पुस्तके वाचून त्यानुसार संकल्पना स्पष्ट करण्याचा प्रयत्न कर.
(५) एमपीएससीने जाहीर केलेला परीक्षेचा अभ्यासक्रम व्यवस्थित समजून घे. त्यामुळे त्यातील टॉपिकनिहाय तयारी करणे पुढे शक्य होईल.