*   माझे पदवीपर्यंतचे शिक्षण इंग्रजी माध्यमातून  झाले आहे. मला साहाय्यक/पोलीस उपनिरीक्षक/विक्रीकर निरीक्षक या एमपीएससीतर्फे घेण्यात येणाऱ्या परीक्षा द्यायच्या आहेत. त्यांचा अभ्यास करण्यासाठी इंग्रजी पुस्तकांची नावे सुचवावीत.

– हर्षद प्रकाश शिरसाट

हर्षद तुझा विचार उत्तम आहे. परंतु साहाय्यक/ पोलीस उपनिरीक्षक/ विक्रीकर निरीक्षक या पदासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षांसाठी अधिकृत असे कोणतेही इंग्रजी वा मराठी भाषेतील साहित्य नाही. जी आहेत ती, वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रांनी काढलेली नोट्सवजा पुस्तके.

त्याचा उपयोग या परीक्षेतील प्रश्नांचे स्वरूप समजून घेण्यासाठी आणि सरावासाठी होऊ  शकतो. मात्र या पुस्तकांच्या अभ्यासामुळे हमखास यश मिळेलच असे खात्रीपूर्वक सांगता येत नाही. त्यामुळे या परीक्षेसाठी एमपीएससीने जाहीर केलेला अभ्यासक्रम अतिशय काळजीपूर्वक नजरेखालून घालावा. तुझ्या असे लक्षात येईल, आपण जे १२वीपर्यंत, १२वीमध्ये जे (गणित/ इंग्रजी/ इतिहास/ भूगोल इत्यादी) शिकलो त्यावर आधारितच प्रश्न विचारले जातात. हे प्रश्न बहुपर्यायी असतात. ज्या विद्यार्थ्यांच्या संकल्पना स्पष्ट असतात त्यांना ही परीक्षा अवघड जात नाही. त्यामुळे या परीक्षेच्या अभ्यासक्रमाच्या टॉपिक्सनुसार राज्य शिक्षण मंडळ वा सीबीएसई मंडळाची मूळ पुस्तके अभ्यासणे अधिक श्रेयस्कर ठरू शकते.

*   माझ्या भावाने इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन या विषयात २०१४ साली इंजिनीअरिंगची पदवी घेतली आहे.  त्याने आता एम.एस. करावे की एमबीए करावे? आणि कोणत्या विषयात करावे?

– तृषा शाह

तृषा, तुझ्या भावाला अभियांत्रिकी शिक्षणात आवड आहे की व्यवस्थापन विषयात रस आहे, ही बाब आधी समजून घ्यायला हवी. त्याला अभियांत्रिकी शिक्षणात आवड असल्यास परदेशातील चांगले विद्यापीठ किंवा शैक्षणिक संस्थेतून एम.एस. करणे उपयुक्त ठरू शकते. अभियांत्रिकी शिक्षण घेताना त्याला ज्या विषयात सर्वाधिक गती असेल तो विषय एम.एस.साठी निवडू शकतो. सध्या बरीच मुले एम.एस.ला प्रवेश घेताना संगणकशास्त्र / संगणक अभियांत्रिकी / संगणक तंत्रज्ञान या विषयांकडे वळतात.

परंतु त्याला आवड असल्यास रोबोटिक्स/ सिग्नल प्रोसेसिंग या विषयांतही एम.एस. करता येईल. अभियांत्रिकी या विषयात आवड नसल्यास एमबीए अभ्यासक्रम करता येईल. मात्र पहिल्या २५ क्रमांकाच्या एमबीए शिक्षण देणाऱ्या संस्थेत प्रवेश मिळाल्यासच उत्तम करिअर घडू शकते.

तुमचे अभ्यासक्रम अथवा करिअरसंबंधीचे प्रश्न career.vruttant@expressindia.com  या पत्त्यावर पाठवा.

Story img Loader