* मी ३९ वर्षांची असून एका खासगी कंपनीत कार्यरत आहे. मी एम. कॉम पूर्ण केले आहे. मला कंपनी सेक्रेटरी अभ्यासक्रम करायचा आहे. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी मला मार्गदर्शन करावे. अत्यावश्यक प्रत्यक्ष प्रशिक्षणाविषयी सांगावे?
-गायत्री पटवर्धन
गायत्रीजी, तुम्हाला कंपनी सेक्रेटरी अभ्यासक्रम करण्यासाठी एक्झिक्युटिव्ह अभ्यासक्रम आणि प्रोफेशनल अभ्यासक्रम हे दोन टप्पे पार पाडावे लागतील. एक्झिक्युटिव्ह अभ्यासक्रम उत्तीर्ण केल्यावरच प्रोफेशनल अभ्यासक्रमास प्रवेश दिला जातो. या अभ्यासक्रमांना वर्षांतून केव्हाही प्रवेश घेता येतो. दरवर्षी परीक्षा जून आणि डिसेंबर महिन्यात घेतली जाते. स्टुडंड इंडक्शन प्रोग्रॅम आणि एक्झिक्युटिव्ह डेव्हलपमेंट प्रोग्रॅम पूर्ण केल्यावर विद्यर्थ्यांना एक्झिक्युटिव्ह प्रोग्रॅम किंवा प्रोफेशनल प्रोग्रॅम अभ्यासक्रम उत्तीर्ण करावे लागते. त्यानंतर १५ महिन्यांचे प्रशिक्षण घ्यावे लागते.
प्रोफेशनल प्रोग्रॅम अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांला १२ महिन्यांच्या प्रशिक्षणापासून कंपनी सेक्रेटरीज रेग्युलेशन्सनुसार सुट मिळाली असल्यास या विद्यार्थ्यांस ३ महिन्यांचे प्रॅक्टिकल ट्रेनिंग पूर्ण करावे लागते. मात्र त्यासाठी सुयोग्य अशी कागदपत्रे सादर करावी लागतात. १५ महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना या प्रॅक्टिकल ट्रेनिंगपासून सूट मिळू शकते. संपर्क संकेस्थळ- http://www.icsi.edu
* मी १२वी विज्ञान शाखेची परीक्षा दिली आहे. मला मराठी, इंग्रजी आणि कन्नड शिकून भाषांतरातील करिअर करायचे आहे. माझे शिक्षण मराठी माध्यमातून झाले आहे. कन्नड बोलता येते. भाषांतरात कोणत्या संधी आहेत?
– अश्विनी जामखंडी
अश्विनी भाषांतर आणि अनुवाद या दोन्ही क्षेत्रांत करिअरच्या चांगल्या संधी मिळू शकतात. मात्र त्यासाठी आपली मातृभाषा आणि ज्या भाषेतील साहित्य वा इतर साधनसामग्रीचे भाषांतर वा अनुवाद करायचा आहे, त्या भाषेवर उत्तम प्रभुत्व मिळवणे गरजेचे आहे. केवळ एखादी भाषा बोलता येते म्हणून ती भाषा चांगली येते असे समजू नये. भाषेवर प्रभुत्व मिळवण्यासाठी त्या भाषेच्या व्याकरणाचा पाया पक्का करावा लागतो. तसेच शब्दसंग्रह सतत वाढता ठेवणे गरजेचे असते. त्यासाठी कष्ट करण्याची तयारी असायला हवी.
तुमचे अभ्यासक्रम अथवा करिअरसंबंधीचे प्रश्न career.vruttant@expressindia.com या पत्त्यावर पाठवा.)