सौंदर्यशास्त्राची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असून ब्युटी आणि वेलनेस क्षेत्रात अंतर्भूत असलेल्या मेकअप, स्पा, प्रतिमा व्यवस्थापन अशा विविध क्षेत्रांशी निगडित अभ्यासक्रमांचा आणि करिअर संधींचा परिचय..
अलीकडे ‘फीलिंग फिट’ आणि ‘लुकिंग गुड’ची गरज समाजाच्या सर्व स्तरांतील वेगवेगळ्या वयोगटांना जाणवत आहे. सौंदर्यशास्त्र उद्योगाच्या महत्त्वाच्या शाखा म्हणजे फॅशन, ब्युटीकेअर, हेअरड्रेसिंग, स्पा आणि वेलनेस उद्योग.
आज आपण ब्युटीकेअर, स्पा, वेलनेस उद्योगातील रोजगाराच्या आणि स्वयंउद्योगाच्या संधींविषयी जाणून घेऊयात. एखाद्या घरगुती ब्युटी पार्लरपासून अद्ययावत ब्युटी सलोन किंवा एखाद्या मध्यम दर्जाच्या लोकवस्तीतील वेलनेस क्लिनिकपासून भर समुद्रातील प्रवासी जहाजावरील स्पा वेलनेस सेंटपर्यंत या उद्योगाचा आवाका पसरलेला आहे.
ब्युटी थेरपिस्ट- घरून चालवण्यात येणारे ब्युटी पार्लर असो की, एखाद्या नामांकित कंपनीचे ब्युटी सलोन असो, ग्राहकांना तिथे सौंदर्यविषयक विविध सेवा उपलब्ध करून दिल्या जातात. या सेवा देणाऱ्या व्यक्तींनी ‘ब्युटी थेरपी’विषयक प्रशिक्षण प्राप्त केलेले असते. या क्षेत्रातील सेवांचा लाभ महिलांप्रमाणे अलीकडे पुरुषवर्गही मोठय़ा प्रमाणावर घेताना
दिसून येतो.
यात क्लीन्सिंग, मसाजिंग, फेशियल तसेच ग्राहकांच्या गरजेनुसार मेकओव्हरसाठी योग्य सल्ला आणि त्यानुसार केशरचनेतील बदल, आयब्रोज, वॅक्सिंग, इलेक्ट्रोथेरपी व अन्य शस्त्रक्रियांव्यतिरिक्त सौंदर्य सेवांचा समावेश आहे. लहान पार्लर्समधून व्यवस्थापनाच्या म्हणजेच ग्राहकांच्या वेळा निश्चित करणे, त्यांच्या सौंदर्यविषयक वैद्यकीय उपचारांची नोंद ठेवणे, मालाची आवक-जावक तपासणे या सेवांचाही यात समावेश होतो.
पात्रता- या क्षेत्रात पाऊल रोवण्यासाठी उमेदवाराकडे डिप्लोमा इन ब्युटी थेरपी, ब्युटी टेक्निक्स, हेअर आणि ब्युटी सíव्हसेसविषयक रीतसर प्रशिक्षण प्राप्त असणे गरजेचे आहे.
मेकअप आर्टस्ट्रिी : त्वचेची योग्य निगा, त्वचेच्या पोताची आणि रंगाची योग्य जाण आणि स्टाइिलगच्या ज्ञानाच्या साहाय्याने सौंदर्य खुलवण्याचे कौशल्य म्हणजेच मेकअप आर्टस्ट्रिी. फॅशन जगातील विवाह प्रसंगांचे तसेच इतर विविध प्रकारचे मेकअप दूरचित्रवाणी-चित्रपटांतील भूमिकांच्या गरजेनुसार केले जातात. भरपूर उत्पन्न देणारा, तसेच आघाडीच्या कलावंतांच्या संपर्कात राहण्याची संधी देणारा हा पेशा मॉडेिलग उद्योगासाठी महत्त्वपूर्ण ठरतो.
रोजगार संधी- दूरचित्रवाणी आणि देशी-विदेशी चित्रपट उद्योगांबरोबरच, देशांत आणि परदेशांत आयोजित केले जाणारे चित्रपट, उद्योगातील पुरस्कार वितरण सोहळे, फॅशन इव्हेंट्स यासाठीही या विषयातील प्रशिक्षित व्यक्तींची गरज भासते. सर्वसामान्यत: लग्नसमारंभ तसेच विविध शुभ प्रसंगांच्या निमित्ताने आयोजित सोहळ्यांच्या वेळेस ब्युटी थेरपिस्टना तसेच मेकअप आर्टिस्टना मोठी मागणी असते.
कामाचे स्वरूप- सहभागी व्यक्तीचा चेहरा, केस आणि बाह्य़ व्यक्तिमत्त्व आकर्षक आणि उठावदार होण्यासाठी सेवा उपलब्ध करून देणे, ग्राहकांच्या गरजेनुसार बाह्य़ रूपात बदल करणे आणि सौंदर्य खुलवणे, ग्राहकाच्या शरीराला कुठल्याही प्रकारे अपाय होणार नाही याची काळजी घेणेही महत्त्वाचे ठरते.
मनोरंजन क्षेत्रात- एखाद्या चित्रपटातील अथवा मालिकेमधील पात्राचा मेकअप करताना त्यांच्या अभिनयाला आणि व्यक्तिरेखेला शोभेलसा मेकअप करणे आवश्यक असते. याकरता व्यक्तिरेखेचा पूर्वअभ्यास आवश्यक ठरतो.
मसाज सेवा : मसाज उपचारांची सेवा ही सौंदर्यसेवांचा भाग म्हणून ओळखली जाते. शरीराला आणि मनाला आराम देऊन, ताजेतवाने करणाऱ्या या सेवा रिफ्लेक्सोलॉजी, अरोमाथेरपी या प्रकारांद्वारेही प्रदान केल्या जातात. आयुर्वेद तसेच निसर्गोपचार पद्धतीतही काही अंशी मसाज सेवांचा उपयोग होतो.
हेल्थ स्पा आणि वेलनेस : वेलनेस उद्योगाची वाढती व्याप्ती पाहता स्पा आणि वेलनेस उद्योगातही नोकरीच्या किंवा रोजगाराच्या संधी वाढताना दिसत आहेत. इंटरनॅशनल हॉटेल्स, रिझॉर्टस्, स्पा अॅण्ड वेलनेस सेंटर्स अशा ठिकाणी रिलॅक्सेशन ट्रीटमेंटसाठी अथवा पर्सनल ट्रेनर व सौंदर्य प्रसाधक म्हणून या क्षेत्रातील प्रशिक्षित व्यक्तींना संधी उपलब्ध होऊ शकते.
स्पा व्यवस्थापन आणि प्रशिक्षण : ज्या व्यक्तींना व्यवस्थापकीय कामांची आवड असेल आणि तत्संबंधी प्रशिक्षणही प्राप्त केलेले असेल तर अशा स्पा आणि वेलनेस सेंटरमधून स्पा कोऑर्डिनेटर, असिस्टंट मॅनेजर, सलोन मॅनेजर किंवा प्रशिक्षक म्हणूनही संधी मिळते. जगभरातील प्रवासी जहाज कंपन्यांतही मोठय़ा प्रमाणावर रोजगार उपलब्ध होऊ शकतो.
इंटरनॅशनल स्पा असोसिएशनच्या व्याख्येनुसार, स्पा म्हणजे शरीर, मन आणि आत्म्याच्या परिपूर्ण आनंदासाठी व्यावसायिक सेवा पुरवण्याचे ठिकाण. गरजेनुरूप स्पाचे विविध प्रकार ग्राहकांच्या दिमतीसाठी उपलब्ध असतात.
स्पा व्यवस्थापन : स्पामध्ये उपलब्ध असणाऱ्या सर्व सेवा सुरळीतपणे आणि दर्जेदार पद्धतीने प्रदान केल्या जाव्यात, याकरता कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, त्यांच्या कामाचे नियोजन यांचे योग्य व्यवस्थापन होणे आवश्यक असते. ग्राहकांच्या तक्रारींची तात्काळ दखल घेणे आणि त्यांचे निवारण करणे अत्यावश्यक असते. या संदर्भातील सरकारी नियमांची आणि अटींची पूर्तता करण्यासाठी आवश्यक त्या प्रक्रिया पूर्ण करणे आणि आर्थिक बाजू सांभाळणेही आवश्यक असते.
पात्रता : हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंटमधील पदवी ही योग्य अर्हता मानली जाते. ‘ब्युरो ऑफ लेबर स्टॅटिस्टिक्स’च्या सर्वेक्षणानुसार येत्या काही वर्षांत स्पा व्यवस्थापनाच्या संधींमध्ये मोठी वाढ अपेक्षित आहे.
कामाचे स्वरूप : स्पा व्यवस्थापक हे कामाच्या ठिकाणी मसाज थेरपिस्ट, स्किन थेरपिस्ट, न्युट्रिशनिस्ट तसेच स्वागतकक्षातील कर्मचारी यांच्या संपर्कात राहतात आणि कामांचे, वेळेचे योग्य नियोजन करतात.
हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट विषयातील पदवी किंवा प्रशिक्षण प्राप्त केलेल्या व्यक्तींना या क्षेत्रात प्राधान्य मिळू शकते. विक्री, विपणन, आरोग्य, स्वच्छता आणि सुरक्षा, व्यवस्थापन या विषयांचे मूलभूत ज्ञान आणि त्याचे उपयोजन यासंबंधीची माहिती या व्यक्तींना असणे अपेक्षित आहे.
प्रशिक्षणक्रम
डिप्लोमा इन स्पा ऑपरेशन्स, स्पा मॅनेजमेंट, स्पा योगा, स्पा अॅडमिनिस्ट्रेशन अशा विविध कार्यक्षेत्रांत वेगवेगळ्या स्वरूपाचे शिक्षणक्रम उपलब्ध आहेत.
द इंटरनॅशनल स्पा असोसिएशनसारख्या मान्यताप्राप्त संस्थेत या क्षेत्रातील सर्टिफिकेशन प्रोग्राम्स, ट्रेनिंग प्रोग्राम्स, स्पा सुपरवायझर प्रोग्राम्स उपलब्ध आहेत.
या कार्यक्षेत्रात स्पा मॅनेजर, स्पा सुपरवायजर किंवा स्पा डायरेक्टर म्हणून डे स्पा, मेडिकल स्पा, फिटनेस सेंटर, हॉटेल किंवा रिझॉर्ट अशा ठिकाणी नोकरीच्या संधी मिळू शकतात.
‘ब्युरो ऑफ लेबर स्टॅटिस्टिक्स’च्या सर्वेक्षणानुसार नजिकच्या काळात या क्षेत्रांतील रोजगार संधींमध्ये मोठय़ा वाढीची शक्यता आहे.
स्पा थेरपी आणि वेलनेस : आपल्या राहत्या ठिकाणाच्या आसपास नजर टाकली तर गेल्या आठ-दहा वर्षांत किमान एखादे तरी स्पा कम सलोन किंवा स्पा वेलनेस सेंटर उभे राहिले असल्याचे प्रत्येकाच्या लक्षात येईल. एकंदरीतच शारीरिक आरोग्य आणि सौंदर्य याबद्दलची जागरूकता वाढल्याने, भारतातच नव्हे तर जगभरातील बाजारपेठांमध्येही या उद्योगक्षेत्रात मोठय़ा प्रमाणावर रोजगारांची आणि स्वयंरोजगार संधींची शक्यता निर्माण होताना दिसते.
या अंतर्गत शरीरशास्त्र, शरीरात उत्पन्न होऊ शकणाऱ्या विसंगती, व्याधी, शारीरिक स्वच्छता आणि आरोग्य, शरीरातील पंचेंद्रियांची निगा, निरोगी शरीरासाठी आणि काही व्याधींवरील उपचारांसाठी आवश्यक मसाज उपचार, हायड्रोथेरपी, स्टोन थेरपी, अरोमाथेरपी आदी प्रशिक्षण दिले जाते.
स्वयंरोजगाराच्या संधी
ब्युटी आणि स्पा क्षेत्रात अगदी छोटय़ा स्वरूपातही, कमी जागेत किंवा प्रत्यक्ष घरपोच सौंदर्य सेवा किंवा अन्य प्रकारच्या सेवा देऊन स्वत:चा उद्योग सुरू करता येऊ शकतो तसेच एखाद्या ब्युटी सलोनचे व्यवस्थापन किंवा सौंदर्यविषयक प्रशिक्षण अशा स्वरूपातही प्रगतीच्या संधी मिळवता येऊ शकतात. सौंदर्य प्रसाधनांचे उत्पादन करणाऱ्या देशी-विदेशी कंपन्यांनी चालवलेल्या ब्युटी सलोन्समध्येही रोजगार उपलब्ध होऊ शकतो.
प्रतिमा सल्लागार (इमेज कन्स्लटंट) : या क्षेत्रातील प्रशिक्षित व्यक्ती, ग्राहक व्यक्तीचे बाह्य़ व्यक्तिमत्त्व उत्तम प्रकारे घडवण्याचा किंवा सुधारण्याचा प्रयत्न करतात. याअंतर्गत ग्राहकांच्या दैनंदिन कामाचे स्वरूप, शारीरिक ठेवण लक्षात घेत त्यांना शोभून दिसेल अशी फॅशन, केशरचना, सौंदर्योपचार करून ग्राहकाचे व्यक्तिमत्त्व उठावदार करण्याचा प्रयत्न केला जातो.
विक्री आणि विपणन : सौंदर्य प्रसाधन उत्पादक कंपन्यांचे विक्री प्रतिनिधी म्हणून वेगवेगळी सलोन्स आणि ब्युटी पार्लर्समधून नवनव्या उत्पादनांची ओळख व विक्री करण्यासंबंधीच्या विपणन संधीही या क्षेत्रात उपलब्ध आहेत.
गीता सोनी – geetadsoni1971@gmail.com
सौंदर्यशास्त्रातील संधी
अलीकडे ‘फीलिंग फिट’ आणि ‘लुकिंग गुड’ची गरज समाजाच्या सर्व स्तरांतील वेगवेगळ्या वयोगटांना जाणवत आहे.
आणखी वाचा
First published on: 30-05-2016 at 00:18 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Career courses opportunities in beauty aesthetics cosmetology