* मी यंदा कॉम्प्युटर सायन्स या विषयात बी.एस्सी केले आहे. मला आयटी क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा आहे. त्यासाठी मी काय करावे? – मोहनीश गडेवार
आयटी क्षेत्रात करिअर करण्यासाठी तुझे संगणकीय ज्ञान उत्तम असणे आवश्यक आहे. केवळ पदवी मिळवली म्हणून लगेच संधी मिळेल असे नाही. तुझ्या कॉलेजमध्ये कॅम्पस निवडीसाठी आयटी कंपन्या येत असतील तर त्याचा लाभ घे. प्रारंभी या कंपन्या कमी पॅकेज देतात. मात्र या कंपन्यांमध्ये कामाचा मोठा अनुभव मिळू शकतो. चांगल्या संस्थेतून एमसीए केल्यास कॅम्पस प्लेसमेंटमध्ये अधिक चांगली नोकरी मिळू शकते. सध्या इंटरनेट ऑफ थिंग्ज, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, डेटा अनॅलिटिक्स, अॅण्ड्राइड प्रोग्रॅमिंग, मोबाइल कॉम्प्युटिंग, व्हिडीओ गेमिंग, आयटी सिक्युरिटी या क्षेत्रात तज्ज्ञ मनुष्यबळाची गरज दिवसेंदिवस वाढत आहे. त्यादृष्टीने काही अल्प वा दीर्घ मुदतीचे प्रमाणपत्र अभ्यासक्रम किंवा पदविका अभ्यासक्रम केल्यास त्याचा निश्चितच फायदा होऊ शकतो. पदविका अभ्यासक्रम केल्यास त्याचा निश्चितच फायदा होऊ शकतो. असे काही अभ्यासक्रम सीडॅक संस्थेने सुरू केले आहेत.
संपर्क -अॅडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग ट्रेनिंग स्कूल, सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अॅडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग – सीडॅक, पाचवा माळा, इनोव्हेशन पार्क, रस्ता क्रमांक ३४ बी/१ पंचवटी, पाषाण, पुणे-४११ ००८,
दूरध्वनी- १८००८४३०२२, संकेतस्थळ https://www.cdac.in
* मला परदेशात शिक्षण घेण्याची इच्छा आहे. पण माझी आर्थिक स्थिती चांगली नाही. या अनुषंगाने मला शासनाच्या काही शैक्षणिक योजनांची माहिती द्याल का?
-सौरव बडगुजर
सर्वप्रथम, तुला कोणत्या विद्याशाखेत वा विषयामध्ये परदेशात शिक्षण घ्यायचे आहे, ते नक्की कर. राखीव संवर्गातील उमेदवारांसाठी भारत सरकार वा राज्य सरकारकडून परदेशातील शिक्षणासाठी अर्थसाहाय्य केले जाते. राज्य शासनामार्फत अशा संवर्गातील विद्यार्थ्यांचे संपूर्ण शैक्षणिक शुल्क भरले जाते. तथापी त्यासाठी संबंधित शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश मिळणे आवश्यक आहे. अशा संस्थांचे निकष सरकारने निर्धारित केले आहेत. देशातील काही खासगी संस्थासुद्धा शिष्यवृत्ती वा आर्थिक सहाय्याच्या स्वरूपात मदत करत असते. विद्यार्थ्यांने आतापर्यंत दहावी, बारावी, पदवी आणि पदव्युत्तर पदवी स्तरावर उत्तम शैक्षणिक कामगिरी केली असेल, टॉफेल/जीआरई या परीक्षेत उत्तम गुण मिळवले असतील तसेच कला/ नृत्य/ क्रीडा/ वक्तृत्व अशासारख्या क्षेत्रातही चांगली कामगिरी केली असल्यास परदेशातील अनेक संस्था शैक्षणिक शुल्कात सूट देतात. शिवाय शिष्यवृत्तीही देतात. या सर्व बाबी लक्षात घेऊन तू आत्मपरीक्षण कर, तुला नेमके काय आणि कसे शिकायचे आहे, याचा आराखडा बनव. म्हणजे तुझा मार्ग सोपा होईल आणि तुझी परदेशात शिकायची इच्छाही पूर्ण होऊ शकेल.