मी बीएच्या अंतिम वर्षांला आहे. मला पुढे एलएलबी अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यायचा आहे. मी त्यासाठी प्रवेश घेऊ शकतो का? यासोबतच पुणे विद्यापीठातील योग्य महाविद्यालयाची माहिती द्यावी. मला ही पदवी मराठीमधून मिळू शकेल का? यात करिअर काय आहे?
– बिरादार आप्पाराव
तुला एलएलबीच्या प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा द्यावी लागेल. या परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे, तुला पुणे विद्यापीठातल्या चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळू शकतो. एलएलबीचा हा अभ्यासक्रम इंग्रजीमधून शिकवला जातो. तो पूर्ण केल्यानंतर खासगी वकील, सरकारी वकील, कनिष्ठ स्तरीय न्यायाधीश, मोठय़ा व नामांकित विधी सल्ला कंपन्यांमध्ये साहाय्यक, विधी सल्लागार अशा विविध स्वरूपांच्या करिअरच्या संधी उपलब्ध होतात.
मी रसायनशास्त्र घेऊन बीएससी केले आहे. सध्या मी नोकरी करत आहे, पण त्यात समाधान मिळत नाही. मला वेगवेगळ्या अभ्यासक्रमांविषयी आणि स्पर्धा परीक्षांची माहिती द्याल का?
– गणेश काळोखे
गणेश जर तू रसायनशास्त्रात पुढे एमएस्सी केलेस आणि नेट/सेट परीक्षा उत्तीर्ण झालास तर तुला अध्यापनाच्या क्षेत्रात संधी मिळेल. चांगल्या शैक्षणिक संस्थांमधील एमएस्सी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी JOINT ADMISSION TEST देणे उचित ठरेल. याद्वारे तुला रसायनशास्त्र या विषयातील पदव्युत्तर पदवीसोबतच जॉइंट एमएससी-पीएचडी किंवा एमएससी-पीचडी या इंटिग्रेटेड अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचे पर्याय उपलब्ध होतील. हे अभ्यासक्रम केलेल्या उमेदवारांना करिअरच्या उत्तमोत्तम संधी सुलभतेने उपलब्ध होऊ शकतात.
संपर्क http://jam.iitd.ac.in.
सध्याच्या शैक्षणिक अर्हतेवर तुला बँका, एलआयसी, इन्शुरन्स कंपन्या, पोस्टल बँक, स्टाफ सिलेक्शन कमिशन, यूपीएससी/एमपीएससी आदीच्या परीक्षा देता येतील.
मी वाणिज्य शाखेतून पदवी मिळवलेली आहे. पण मला कायद्याचे शिक्षण घ्यायचे आहे. त्यासाठी कशा प्रकारचा अभ्यासक्रम आहे? आणि पुढील वाटचाल कशी करावी?
– अक्षय मोहिते
कायद्याच्या अभ्यासक्रमासाठी तुला ३ वर्षे कालावधीचा एलएलबी अभ्यासक्रम करणे उचित ठरेल.
१) महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्थांमध्ये या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घेतली जाते. या परीक्षेचा पेपर वस्तुनिष्ठ पद्धतीचा आणि बहुपर्यायी असतो. कालावधी दोन तास. एकूण १५० प्रश्न. प्रत्येक अचूक उत्तराला एक गुण याप्रमाणे १५०गुण, या परीक्षेत नकारात्मक गुणांकन नाही. प्रश्नपत्रिकेत पुढीलप्रमाणे प्रश्न विचारले जातात.
लीगल अॅप्टिटय़ूड (विधी अभ्यासक्रमविषयक कल)- ३० गुण,
चालू घडामोडींसह सामान्य ज्ञान (जनरल नॉलेज- ४० गुण),
इंग्रजी (५० गुण),
लॉजिकल अँड अनॅलिटिकल अनॅलिसिस ३० गुण.
२) देशस्तरील विधी महाविद्यालयातील प्रवेशाठी CLAT– कॉमन लॉ अॅडमिशन टेस्ट द्यावी लागेल. या परीक्षेद्वारे बेंगळूरु, भोपाळ, हैदराबाद, कोलकाता, जोधपूर, रायपूर, गांधीनगर, लखनौ, पाटणा, कोची, कटक, रांची, विशाखापट्टणम, तिरुचिरापल्ली, मंबई, नागपूर येथे असणाऱ्या राष्ट्रीय लॉ स्कूलमध्ये प्रवेश मिळू शकतो. यंदा ही परीक्षा देशभरातील विविध केंद्रांवर १४ मे २०१७ रोजी घेतली जाणार आहे. संपर्क- http://clat.ac.in