मी सध्या मेकॅनिकल इंजिनीअरिंगच्या तिसऱ्या वर्षांत शिकत आहे. मला पदवीनंतर बँकेत नोकरी करायची आवड आहे. कृपया मार्गदर्शन करावे.

राहुल विरकर

राहुल, सार्वजनिक बँकांमधील नोकरीसाठी सध्या पूर्व आणि मुख्य परीक्षा घेतली जाते. या दोन्ही परीक्षा वस्तुनिष्ठ पद्धतीच्या आहेत. गती आणि अचूकता यांची परीक्षा घेणारे प्रश्न विचारले जातात. त्यामुळे कमी वेळेत अधिक प्रश्न अचूकतेने सोडवता आल्यास यश मिळू शकते. इंग्रजी/ लॉजिकल रिझनिंग/ क्वांटिटेटिव्ह अ‍ॅप्टिटय़ूड या तीन विषयांवर प्रश्न विचारले जातात. दोन्ही परीक्षांचा अभ्यासक्रम समान असतो. पूर्वपरीक्षेच्या गुणांवर आधारित गुणवत्ता यादीनुसार मुख्य परीक्षेसाठी विशिष्ट संख्येत उमेदवारांची निवड मुख्य परीक्षेसाठी केली जाते. मुख्य परीक्षेत इंग्रजी/ लॉजिकल रिझनिंग/ क्वांटिटेटिव्ह अ‍ॅप्टिटय़ूड या विषयांसोबतच बँकिंग व सामान्य ज्ञानाशी संबंधित पेपर असतो. मुख्य परीक्षेत मिळालेल्या गुणांवर आधारित मुलाखतीसाठी गुणवत्ता यादी तयार केली जाते. मुलाखत आणि मुख्य परीक्षेत मिळालेल्या गुणांवर आधारित अंतिम निवड यादी तयार केली जाते.

 

मी सध्या बारावी विज्ञान शाखेत शिकत आहे. मला पुढे यूपीएससीची तयारी करायची आहे. बारावीनंतर यूपीएससीच्या तयारीसाठी उपयुक्त ठरेल असे मी काय करू?

योगेश चव्हाण

योगेश, यूपीएससीची परीक्षा तुला पदवी परीक्षेच्या अंतिम वर्षांला असताना देता येईल. त्यामुळे तू आतापासून सामान्य अध्ययन, एनसीईआरटीने (नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग) प्रकाशित केलेल्या बारावीपर्यंतच्या भूगोल, इतिहास व नागरिकशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, कृषी, विज्ञान या विषयांचा अभ्यास करून सर्व मूलभूत संकल्पना स्वयंस्पष्ट करून ठेवाव्यात. स्वतंत्र विचार करून उत्तरे लिहिण्याची शैली विकसित करावी. ही परीक्षा मराठीतसुद्धा देता येते. या पर्यायाचाही विचार करावा. सामान्य अध्ययानाच्या तयारीसाठी दर्जेदार वृत्तपत्रे/  फ्रंटलाइन, इकॉनॉमिक अँड पोलिटिकल वीकली, इकॉनॉमिस्ट, योजना, कुरुक्षेत्र, भारत वार्षिकी यांसारख्या नियतकालिकांचे नियमित वाचन, स्वत:च्या नोट्स काढणे या बाबींकडे लक्ष पुरवावे.

 

मी बीएला शिकत आहे. मला विद्यापीठातून इंग्रजी विषयात एमए करायचे आहे. त्यासाठी प्रवेशप्रक्रिया कशी असेल?

रोहन शेळके

पुणे विद्यपीठातील डिपार्टमेंट ऑफ इंग्लिशमध्ये प्रवेशासाठी बी.ए. परीक्षेतील इंग्रजी विषयातील गुण ग्राह्य़ धरले जातात. त्यामुळे तू इंग्रजी विषयात अधिकाधिक गुण मिळवण्याचा प्रयत्न कर. शिवाय विद्यापीठाच्या या विभागाशिवाय इतर महाविद्यालयांतही प्रवेश अर्ज करावा. त्यामुळे प्रवेशाचे विविध पर्याय खुले राहतील.

संपर्क –  http://www.unipune.ac.in/

(तुमचे अभ्यासक्रम अथवा करिअरसंबंधीचे प्रश्न career.vruttant@expressindia.com या पत्त्यावर पाठवा.)

Story img Loader