मी १२ वी झालेली आहे. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र हे माझे विषय आहेत. या पुढे एमबीबीएस, बीडीएस आणि बीएएमएस सोडून काय करावे, हे मला कळत नाही. माझ्यासाठी काय काय पर्याय असू शकतात?
– गीता यादव
गीता, तुझ्या प्रश्नावरून तुला वैद्यकीय क्षेत्रात जायचे नाही हे स्पष्ट आहे. तू औषधीनिर्माणशास्त्र म्हणजे बी.फार्म हा अभ्यासक्रम करू शकते. त्याचबरोबर बी.एस्सी नर्सिग हा पर्यायही उपलब्ध आहे. या क्षेत्रात जायचे नसल्यास तू विज्ञान विषयात पदवी घेऊ शकतेस. त्यानंतर तुझ्या आवडीच्या व गती असलेल्या विषयामध्ये पदव्युत्तर पदवी म्हणजेच एम.एस्सी करू शकतेस. सध्या भारत सरकार संशोधनाला खूप चालना आणि प्रोत्साहन देत आहे. त्यामुळे एम.एस्सीनंतर संशोधनाचे क्षेत्र निवडू शकतेस. या क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात.
मी सध्या बी.कॉमच्या तिसऱ्या वर्षांला आहे. मला आयआरएसची परीक्षा द्यायची आहे.त्याचा अभ्यासक्रम, अभ्यासाचे साहित्य आणि नियोजन कसे करावे?
– औदुसिद्ध चनेगाव
मित्रा, औदुसिद्ध, तुला आयआरएस म्हणजे इंडियन रेव्हेन्यू सव्र्हिसबद्दल माहिती हवी आहे, असे तुझ्या प्रश्नावरून दिसते. या सेवेसाठी कोणतीही स्वतंत्र परीक्षा घेतली जात नाही. संघ लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या नागरी सेवा परीक्षेद्वारेच या सेवेसाठी उमेदवारांची निवड केली जाते. मात्र तुमची नोकरी ही, तुमचा गुणवत्ता यादीतील क्रमांक ,उपलब्ध जागा आणि पसंतीक्रम यावर अवलंबून असते.
तुमचे अभ्यासक्रम अथवा करिअरसंबंधीचे प्रश्न career.vruttant@expressindia.com या पत्त्यावर पाठवा.)