मी आता मेकॅनिकल अभियांत्रिकी पदविका केली आहे. मला सरकारी नोकरीच्या संधी आहेत का?
– प्रांजल धनवीह
प्रांजल, सरकारी नोकरीतील प्रत्येक पदासाठी विशिष्ट शैक्षणिक अर्हता निश्चित केली असते. या पदांच्या जाहिरातीत अशी अर्हता नमूद केली जाते. त्यामुळे अशा पदांकडे तुला लक्ष ठेवावे लागेल. पदविकाधारक ही अर्हता नमूद केली असल्यास तुला संबंधित पदासाठी अर्ज करता येईल. काही पदांसाठी केवळ पदविका हीच अर्हता ठेवण्यात येते. पदवीधारकांना या पदांसाठी अर्ज करता येत नाही.
माझी मुलगी १२वी विज्ञान शाखेत आहे. तिला पशू वैद्यकीय शाखेला जायचे आहे. समजा जर तिला प्रवेश नाही मिळाला तर या शाखेशी संबंधित कोणते पुढील अभ्यासक्रम आहेत? तिला प्राण्यांच्या संदर्भातच काहीतरी शिकायचे आहे. आम्ही काय करू?
– अरुणा एकबोटे
अरुणाताई, तुमच्या मुलीची पशू वैद्यकीय क्षेत्राकडे जाण्याची इच्छा असल्याने तिला नक्कीच या ज्ञानशाखेला प्रवेश मिळेल, अशी आशा ठेवू या. समजा असा प्रवेश नाही मिळालाच तर तिने प्राणीशास्त्रात बी.एस्सी करून पुढे एम.एस्सी करावे. यामुळे तिला तिच्या आवडीच्या विषयाचे ज्ञान मिळवणे सोपे जाईल.
तुमचे अभ्यासक्रम अथवा करिअरसंबंधीचे प्रश्न career.vruttant@expressindia.com या पत्त्यावर पाठवा.)