मी पदविका पूर्ण केली. आता पदवीच्या तिसऱ्या वर्षांला आहे. माझे चार विषय राहिले आहेत. तीन ड्रॉप झाले आहेत. अशा परिस्थितीत मला यूपीएससीचा पेपर देता येईल का? मला आयएएस ऑफिसर व्हायचे आहे. मला खरं तर पदवी अभ्यासक्रमाचा खूपच कंटाळा आला आहे. मी काय करू

सुशांत दाते

सर्वप्रथम हे लक्षात घ्या, की शिक्षणाचा कंटाळा येऊन चालणार नाही. एखाद्या विद्यार्थ्यांला यूपीएससीची परीक्षा द्यायची असेल तर पदवी मिळवणे, आवश्यकच असते. ती प्रमुख अर्हता आहे. त्यामुळे यूपीएससी करायचे तर आळस, कंटाळा झटकून सर्व विषय सोडवायला हवेत. पदवी पूर्ण केली पाहिजे. केवळ पदविका मिळवली म्हणून यूपीएससी देता येणार नाही. जेव्हा ध्येय मोठे असते आणि वेगळा मार्ग निवडायचा असतो, तेव्हा कंटाळा करून चालत नाही. कष्ट हे करावेच लागतात. त्यामुळे अभ्यासाला पर्याय नाही.

मी अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केले आहे. गेल्या दोन वर्षांपासून अ‍ॅनॅलिटिक्स म्हणून कार्यरत आहे. मला परदेशात जाऊन एमबीए करायचे आहे. मला त्यासाठी कमी खर्चाचे आणि उत्तम गुणांकन (रँकिंग) असलेल्या  शैक्षणिक संस्थांची नावे सांगाल का?

सौरभ देशपांडे

परदेशातील दर्जेदार आणि गुणवत्ता पूर्ण शिक्षण देणाऱ्या संस्थांचे शुल्क कमी नसते ही बाब ध्यानात घ्यावी. चांगल्या संस्थेत प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांला पदवी वा पदव्युत्तर पदवीमध्ये चांगली टक्केवारी हवी. शैक्षणिक गुणवत्तेशिवाय कला / क्रीडा / लेखन / वक्र्तृत्व / अभिनय / संगीत / नृत्य यामध्ये प्रावीण्य मिळवलेले असल्यास त्याचा प्रवेशासाठी फायदा होतो. टॉफेल आणि जीमॅट (ग्रॅज्युएट मॅनेजमेंट अ‍ॅडमिशन टेस्ट) परीक्षेत उत्तम गुण मिळाल्यास चांगल्या संस्थेत प्रवेश मिळणे सुलभ जाते. शिवाय अशा विद्यार्थ्यांना शुल्कामध्ये सवलत वा प्रारंभीच शिष्यवृत्तीही दिली जाते. अनेक संस्था शैक्षणिक कर्जसुद्धा देतात. तुला कामाचा अनुभव असल्याने वरील बाबी साध्य केल्यास चांगल्या संस्थेत प्रवेश मिळू शकेल. अशा काही संस्था- हार्वर्ड बिझिनेस स्कूल(अमेरिका), स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी(अमेरिका), आयएमडी (स्वित्र्झलड), आय ई बिझिनेस स्कूल (स्पेन),  लंडन बिझिनेस स्कूल ( ब्रिटेन), युनिव्हर्सिटी ऑफ व्हर्जिनीया (अमेरिका), एमआयटी स्लोआन स्कूल ऑफ मॅनेजमेंट (अमेरिका), कॉर्नेल युनिव्हर्सिटी (अमेरिका)

तुमचे अभ्यासक्रम अथवा करिअरसंबंधीचे प्रश्न career.vruttant@expressindia.com या पत्त्यावर पाठवा.

Story img Loader