मी सध्या बारावीत शिकत आहे. मला बारावीनंतर पोलीस दलात जाण्याची इच्छा आहे. त्यासाठी मला काय करावे लागेल?
– प्रथमेश केरकर
महाराष्ट्र पोलीस दलामध्ये पुढील चार पद्धतीने सामील होता येते.
१) थेट शिपाई भरती- ही भरती प्रक्रिया पोलीस विभागामार्फत राबवली जाते. जिल्ह्य़ांच्या ठिकाणी ही भरती केली जाते. त्यासाठी स्थानिक व विभागीय वृत्तपत्रांमधून जाहिरात दिली जाते.
२) पोलीस उपनिरीक्षक – राज्य लोकसेवा आयोगामार्फत या पदाच्या भरतीसाठी परीक्षा घेतली जाते.
३) पोलीस उपअधीक्षक – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्य सेवा परीक्षेमार्फत विविध पदे भरली जातात. त्यात पोलीस उपअधीक्षक पदाचाही समावेश असतो. पदांची संख्या, उमेदवारांचे गुण आणि पसंतीक्रम यावर आधारित पोलीस उपअधीक्षकाची नियुक्ती केली जाते.
४) पोलीस अधीक्षक – संघ लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात येणाऱ्या नागरी सेवा परीक्षेद्वारे भारतीय पोलीस सेवेसाठी निवडलेल्या महाराष्ट्राच्या संवर्गातील अधिकाऱ्यांना जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून संधी दिली जाते. या सर्व परीक्षांसाठी तुला चांगली तयारी करावी लागेल. लेखी परीक्षेसोबतच शारीरिक चाळणीतही चांगले गुण मिळवावे लागतील. या सेवेसाठी शारीरिकदृष्टय़ा तंदुरुस्त असणे आवश्यक आहे. त्यासाठी आतापासूनच व्यायाम, योग्य खाणेपिणे, मानसिक सक्षमता याकडे लक्ष द्यावे लागेल.
मी बीई (सिव्हिल इंजिनीअरिंग) आहे. मला पर्यटन क्षेत्रात काम करायचे आहे. मी ते कसे करू शकतो?
– विनोद सूर्यवंशी
पर्यटनच्या क्षेत्रात येण्यासाठी तुला या विषयाशी निगडित अभ्यासक्रम करायला हवा. विशेषत: इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ ट्रॅव्हल आणि टुरिझम मॅनेजमेंट या संस्थेचा एमबीए अभ्यासक्रम या क्षेत्रात करिअर करण्यासाठी उत्तम संधी मिळवून देऊ शकतो. ही भारत सरकारच्या पर्यटन विभागांतर्गत कार्यरत असणारी संस्था आहे. संस्थेच्या शाखा ग्वाल्हेर, नॉयडा, भुवनेश्वर आणि नेल्लोर या ठिकाणी आहेत.
एमबीए इन ट्रॅव्हल अँड मॅनेजमेंट अॅप्टिटय़ूड टेस्ट (मॅट), कॉमन अॅडमिशन टेस्ट (कॅट), कॉमन मॅनेजमेंट अॅडमिशन टेस्ट (सी-मॅट), झेवियर अॅप्टिटय़ूड टेस्ट (झ्ॉट), ग्रॅज्युएट मॅनेजमेंट अॅडमिशन टेस्ट (जी-मॅट) यासारख्या परीक्षा द्याव्या लागतात. या परीक्षांमध्ये मिळालेल्या गुणांवर आधारित निवडक उमेदवारांची यादी गुणानुक्रमे तयार केली जाते. त्यांना समूह चर्चा आणि मुलाखतीसाठी बोलावले जाते. त्यानंतर अंतिम निवड होते. वर उल्लेख केलेल्यापैकी एकही परीक्षा न दिलेल्या उमेदवाराला या संस्थेमार्फत घेण्यात येणारी आयआयटीटीएम अॅडमिशन टेस्ट द्यावी लागेल. संपर्क : http://www.iittm.ac.in
तुमचे अभ्यासक्रम अथवा करिअरसंबंधीचे प्रश्न career.vruttant@expressindia.com या पत्त्यावर पाठवा.)