मी सध्या बारावी विज्ञान शाखेत शिकत असून मला पुढे नर्सिग क्षेत्रात करिअर करायचे आहे. मी काय करावे?

विनोद तिडके

तू आणि तुझ्या पालकांनी बी.एस्सी. नर्सिग होण्याचा निर्णय मनापासून घेतला असल्यास तुझे व तुझ्या पालकांचे अभिनंदन. नर्सिगच्या क्षेत्रात उत्तमोत्तम करिअर संधी मिळण्याचा सध्याचा काळ आहे. सर्वत्र मोठमोठी कॉर्पोरेट हॉस्पिटल्स उभी राहत आहेत. मोठय़ा शहरांतील हे लोण आता ब आणि क श्रेणीच्या शहरांतही पसरत आहे. त्यामुळे तज्ज्ञ महिला व पुरुष नर्सेसना अधिकाधिक संधी मिळू शकतात. तथापि आपल्याकडे पुरुषांनी या क्षेत्राकडे वळण्याबाबत फारशी उत्सुकता दाखवली जात नाही. पुरुषांनासुद्धा शासकीय/ निमशासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये संधी मिळू शकते. नर्सिग विषयातील स्पेशलायझेशन केल्यास संशोधन, अध्यापन वा वरिष्ठ श्रेणीच्या नोकरी मिळू शकतात.

मी बी.एस्सी.च्या (कृषी) द्वितीय वर्षांला आहे. ही पदवी पूर्ण केल्यावर कुठे आणि कशा प्रकारे नोकरी मिळेल?

वैभव उटाणे

शासकीय कृषी अधिकारी होण्यासाठी तुला राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी कृषी सेवा परीक्षा द्यावी लागेल. या परीक्षेद्वारे कृषी अधिकारी (गट अ), कृषी अधिकारी (गट ब), कृषी अधिकारी (गट ब कनिष्ठ) या पदांसाठी तुझी निवड होऊ  शकते. या परीक्षेचे तीन टप्पे आहेत.

(१) पूर्वपरीक्षा- २०० गुण, (२) मुख्य परीक्षा- ६०० गुण, (३) मुलाखत- ७५ गुण.

मुख्य परीक्षेसाठी निवड होण्यासाठी पूर्वपरीक्षेत आयोगाने निर्धारित केलेले वा त्यापेक्षाही अधिक गुण मिळायला हवेत. अंतिम निवड ही मुख्य परीक्षा आणि मुलाखतीमध्ये मिळालेल्या गुणांवर आधारित केली जाते. सार्वजनिक बँकांमार्फत कृषी पदवीधरांसाठी क्षेत्रीय अधिकाऱ्यांची निवड केली जाते. अहमदाबादस्थित इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट येथील पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन फूड अ‍ॅण्ड अ‍ॅग्री बिझेनस मॅनेजमेंट या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी बी.एस्सी. कृषी केलेल्या विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाते. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर कृषी उद्योगांमध्ये मोठय़ा पदाची नोकरी मिळू शकते.

संपर्क – www.iima.ac.in

मी अभियांत्रिकी पदवीधर आहे. मला इंटरनेट ऑफ थिंग्ज या क्षेत्रात करिअर करायचे आहे. या क्षेत्रात करिअरच्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत? या विषयात पदव्युत्तर अभ्यासक्रम केल्यास त्याचा फायदा होईल का?

ऋतुजा जव्हारकर

इंटरनेट ऑफ थिंग्ज याचा अर्थ अधिकाधिक बाबी या इंटरनेटशी जोडल्या जाणे. सध्या याचा वेग प्रचंड असा आहे. सगळे जग झपाटय़ाने आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या विविध साधनांनी जोडले जात आहे. डाटा (माहितीचा महाप्रचंड साठा) शोध, त्याचे विश्लेषण या ढिगाऱ्यातून काढलेल्या माहितीचा अचूक उपयोग, या माहितीस हवे तसे वाकवणे ही पुढील दशकातील सर्वात मोठी घटना घडामोड ठरू शकते.

एक मोठी क्रांती आपल्या दाराशी येऊन ठेपली आहे. त्यामुळे या विषयातील तज्ज्ञांना त्यांच्या कौशल्याप्रमाणे संधी मिळू शकते. पुढील प्रगतीही त्याच बळावर होऊ  शकते.

तुमचे अभ्यासक्रम अथवा करिअरसंबंधीचे प्रश्न career.vruttant@expressindia.com या पत्त्यावर पाठवा.

Story img Loader