मला वैमानिक व्हायचे आहे. त्यासाठी काय प्रक्रिया करावी लागेल?

संकेत निळे

वैमानिक होणे, हे एक चांगले करिअर होऊ शकते. त्यासाठी पुढीलप्रमाणे मार्ग आहेत.

१) भारत सरकारने इंदिरा गांधी राष्ट्रीय उड्डाण अकॅडमी या संस्थेत कमर्शिअल पायलट लायसन्स कोर्स सुरू केला आहे. या अभ्यासक्रमाचा कालावधी दीड वर्षांचा आहे. यात प्रामुख्यानं जमिनीवरील आणि हवेतील प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाते. हे प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना कमर्शिअल पायलट लायसन्स प्रदान केले जाते. त्यासाठी अर्हता – हा अभ्यासक्रम करू इच्छिणाऱ्या खुल्या संवर्गातील विद्यार्थ्यांला बारावी विज्ञान परीक्षेत गणित, भौतिक आणि रसायनशास्त्र या विषयांमध्ये सरासरी ५५ टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागासवर्ग संवर्गातील विद्यार्थ्यांना ५० टक्के गुण आवश्यक आहेत. सर्व संवर्गातील विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयात स्वतंत्रपणे उत्तीर्ण व्हावे लागेल. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी चाळणी परीक्षा घेतली जाते. लेखी परीक्षेच्या गुणांवर आधारित गुणवत्ता यादी तयार केली जाते. त्यातील निवडक विद्यार्थ्यांना पायलट ऑप्टिटय़ूड टेस्ट आणि सायकोमेट्रिक चाचणीसाठी बोलावले जाते.

संपर्क – द डायरेक्टर, इंदिरा गांधी राष्ट्रीय उड्डाण अकॅडमी, फुरसतगंज एअर फिल्ड, रायबरेली, २२९३०२, दूरध्वनी -०५३५ – २४४११४७ , फॅक्स – २४४१५२७

संकेतस्थळ – http://igrua.gov.in/

२) द बॉम्बे फ्लाइंग क्लब – अभ्यासक्रम – बॅचलर ऑफ सायन्स इन एव्हिएशन अ‍ॅण्ड कमíशअल पायलट (कालावधी – ३ वर्षे, अर्हता-फिजिक्स, मॅथेमॅटिक्स इंग्रजी विषयांसह बारावी उत्तीर्ण आणि कर्मशिअल पायलट लायसन्स), पत्ता – द बॉम्बे फ्लाइंग क्लब, जुहू एरोड्रम, जुहू विले-पार्ले, मुंबई – ५६

संकेतस्थळ – http://thebombayflyingclub.com/

दूरध्वनी – ०२२ – २६६०२१०० / ६४९९ / १८७१

तुमचे अभ्यासक्रम अथवा करिअरसंबंधीचे प्रश्न career.vruttant@expressindia.com या पत्त्यावर पाठवा.)

Story img Loader