मी आता एसएससी बोर्डातून दहावीची परीक्षा दिली आहे. मला पुढे जाऊन एव्हिएशन किंवा एरोस्पेस इंजिनीअरिंग टेक्नॉलॉजीमध्ये प्रवेश घ्यायची इच्छा आहे. १०वीनंतर पदवी किंवा पदविका अभ्यासक्रमांना प्रवेश मिळेल काय?
– मंदार राणे
मंदार, बीएस्सी एव्हिएशन किंवा बी.ई/बी.टेक एरोस्पेस इंजिनीअरिंग या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी बारावीची परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक असते. तसेच या परीक्षेत भौतिकशास्त्र आणि गणित हे विषय असणेही आवश्यक असते. त्यामुळे तू आधी विज्ञान शाखेत प्रवेश मिळव. त्यानंतर बारावीची परीक्षा उत्तम गुणांनी उत्तीर्ण हो.
मी यंदा कला शाखेतून बारावी झालो आहे. मला जिल्हाधिकारी व्हायचे आहे. त्यासाठी कोणती तयारी करावी लागेल?
– जितेंद्र आकरे
जितेंद्र, तुला पदवी घेतल्यानंतर नागरी सेवा परीक्षा द्यावी लागेल. या परीक्षेद्वारे भारतीय प्रशासकीय सेवतील जिल्हाधिकारी पदासाठी निवड केली जाते. सर्वोच्च गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवारांनाच भारतीय
प्रशासकीय सेवा मिळू शकते. त्यामुळे या क्षेत्रात प्रचंड स्पर्धा असते. ही बाब लक्षात घेऊनच या परीक्षेची तयारी तुला करावी लागणार आहे. तू आतापासूनच एक ऐच्छिक विषय, सामान्य अध्ययन, इंग्रजी भाषा या विषयांच्या तयारीला लाग. यासाठी बोर्ड किंवा विद्यापीठाने सुचवलेल्या मूळ साहित्याचाच अभ्यास करणे श्रेयस्कर ठरेल. पण सर्वप्रथम पदवी घेणे आवश्यक आहे. त्याकडे दुर्लक्ष करू नकोस.