मी बॅचलर ऑफ कॉम्प्युटर अॅप्लिकेशन या विषयात गेल्या वर्षी पदवी मिळवली आहे. आता मी बँकिंगची तयारी करत आहे. मी ही तयारी पुढे चालू ठेवू का एमबीए करू? एमबीएचे शिक्षण इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठातून घेऊ की नियमित कॉलेजातून हे शिक्षण घेऊ? -महेंद्र देशमुख
महेंद्र, बँकेच्या परीक्षेची तयारी आणि एमबीए प्रवेशाची तयारी या दोन भिन्न बाबी आहेत. तुला आताच थेट नोकरीत जायचे असल्यास या परीक्षेवर पूर्णपणे लक्ष केंद्रित कर. तरच तुला त्यात यश मिळू शकेल. सध्या लिपिक संवर्ग आणि प्रोबेशनरी ऑफिसर्स संवर्गासाठी बसणाऱ्या मुलांची संख्या खूप मोठी आहे. त्यामुळे प्राथमिक परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत अशा तीन टप्प्यांमधून उमेदवारांना जावे लागते. म्हणूनच या परीक्षेचा अभ्यास करताना इतर बाबींकडे लक्ष न देणेच श्रेयस्कर ठरते. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठातील एमबीए आणि इतर षक्षणिक संस्थांधील एमबीए यात तसा फार फरक नाही; पण नोकरी मिळवताना शैक्षणिक संस्थांमधून केलेल्या एमबीएला अधिक प्राधान्य मिळण्याची शक्यता असते. तथापि कोणत्याही संस्थेतून एमबीए केल्याने लगेच करिअर संधी मिळेल ही अपेक्षा ठेवू नको. हे शिक्षण देणाऱ्यापैकी पहिल्या २५ ते ३० क्रमांकांच्या संस्थांकडेच कॅम्पस प्लेसमेंटसाठी चांगल्या कंपन्या येतात.
माझ्या बहिणीने नुकतीच १२वीची परीक्षा दिली आहे. आता पुढे पदवी कशात घ्यावी, हेच कळत नाही. इंजिनीअरिंगला जावे की फार्मसी? पायलट बनण्यासाठी काय करावे लागेल? नेमका निर्णय कसा घ्यावा? -वीरेंद्र भट
वीरेंद्र, जेईईमार्फत दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळाला तरच करिअरच्या चांगल्या संधी मिळू शकतात. इलेक्ट्रिकल आणि सिव्हिल इंजिनीअर्सला शासकीय नोकऱ्यासुद्धा मिळू शकतात. इंडियन इंजिनीअरिंग सव्र्हिस ही परीक्षा देऊनसुद्धा तुम्हाला केंद्र शासनाच्या विविध आस्थापनांमध्ये वरिष्ठ पदे मिळू शकतील.
बी.फार्मनंतर मात्र शासकीय नोकरी लगेच मिळेल याची खात्री देता येत नाही. औषधीनिर्माण कंपन्यांमध्ये विविध स्वरूपाच्या नोकऱ्या मिळतात. बी.फार्मनंतर एमबीए केल्यास औषधनिर्मिती कंपन्यांमध्ये व्यवस्थापकीय पदांवर नियुक्ती मिळू शकते. बी.फार्मनंतर एम.फार्म केल्यास संशोधन कार्याकडे वळणे शक्य होते.
पायलट होण्यासाठी गणित आणि भौतिकशास्त्र या विषयांचा पाया मजबूत असणे, आवश्यक असते. त्यासाठी गुणांच्या बरोबरीनेच उत्तम शारीरिक क्षमतेचीही गरज असते. रायबरेली स्थित इंदिरा गांधी राष्ट्रीय उड्डाण संस्थेत पायलट होण्याचे प्रशिक्षण दिले जाते. चाळणीपरीक्षेद्वारे उमेदवारांची निवड केली जाते.
संपर्क – <http://igrua.gov.in/> परंतु कोणत्याही विषयातील पदवीची निवड करण्यापूर्वी तुम्ही आधी बहिणीची आवड आणि तिची इच्छा विचारात घ्या. तिचा कल पाहून मगच योग्य तो निर्णय घेणे श्रेयस्कर ठरेल.
तुमचे अभ्यासक्रम अथवा करिअरसंबंधीचे प्रश्न career.vruttant@expressindia.com या पत्त्यावर पाठवा.)