* मी कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच्या पहिल्या वर्षांला शिकत आहे. मला महाराष्ट्र वनसेवेची परीक्षा द्यायची आहे. मात्र मी जेव्हा या परीक्षेचा अभ्यासक्रम बघितला तर मुख्य परीक्षेतील एक पेपर नेचर ऑफ कन्झव्‍‌र्हेशन असा दिसून आला. तो माझ्या अभ्यासाच्या क्षेत्रापासून वेगळा आहे. त्यामुळे मी आता या परीक्षेची कशी तयारी करू?

– शुभम श्रीवास्तव

नेचर ऑफ कन्झव्‍‌र्हेशन हा विषय फॉरेस्ट्रीशी संबंधित असल्याने तो तुझ्या संगणकीय क्षेत्रात येणार नाही. या विषयाच्या अभ्यासासाठी तुला पदवीस्तरीय फॉरेस्ट्री, कृषी या विषयाच्या विद्यापीठीय पुस्तकांचा अभ्यास करावा लागेल. याशिवाय महाराष्ट्र वन विभाग, भारतीय वन विभाग यांच्या संकेतस्थळावर भारतीय वन धोरण, भारतीय वन्य प्राण्यांचे महत्त्व, वनसंरक्षण कायदा १९८०, हवामान बदल, हरितगृह प्रभाव, पर्यावरण पद्धती किंवा प्रणाली, शोभिवंत वनस्पती, भारतीय वृक्ष प्रजातींचे महत्त्व, राष्ट्रीय अभयारण्ये आणि वन उद्याने, जागतिक वारसा स्थळ, मृदासंवर्धन, आद्र्रता, खते, भारतीय वन कायदा, वन्यजीव संरक्षण कायदा, कार्बन ट्रेडिंग या घटकांविषयी बरीच विस्तृत माहिती मिळू शकते. त्याचा अभ्यास करून स्वत:च्या घटकनिहाय नोंदी तयार कराव्यात.

* मी बी.एस्सी. स्टॅटिस्टिक्स करत आहे. सध्या दुसऱ्या वर्षांला आहे. मला कुठे  नोकरी मिळू शकते? मी एम.एस्सी केले तर कुठे नोकरी मिळेल? मी कोणत्या परीक्षा द्यायला हव्यात?

– शुभ्रा पाटील

बी.एस्सी स्टॅटिस्टिक्स हा अभ्यासक्रम केलेल्या उमेदवारांना बायोमेट्रिशियन, बायोस्टॅटिस्टिशियन, डेटा अ‍ॅनॅलिस्ट, डेटा इंटरप्रिटर्स, इकॉनॉमेट्रिशिन, रिसर्च अ‍ॅनॅलिस्ट, स्टॅटिस्टिशियन अशा नोकरीच्या संधी मिळू शकतात. मात्र त्यासाठी तुला व्यक्तिगतरीत्या सतत त्याचा शोध घ्यावा लागेल. मोठी वृत्तपत्रे, रोजगार समाचार साप्ताहिक, काही नोकरीविषयक संकेतस्थळं यावर लक्ष ठेवावे. यामध्ये अशा पदांसाठी जाहिराती येत असतात. महाराष्ट्र वित्त सेवेसाठीही ही शैक्षणिक अर्हता ग्राह्य़ धरली जाते. त्यासाठी राज्य सेवा परीक्षा द्यावी लागेल. चांगल्या सांख्यिकी तज्ज्ञांची वानवा आहे. त्यामुळे तू जर परिपूर्ण ज्ञान मिळवले असशील आणि तुझ्या संकल्पना स्वयंस्पष्ट झाल्या असतील तर तुला बी.एस्सी या अर्हतेवर सांख्यिकी तज्ज्ञ म्हणून करिअर करता येईल. हा विषय आकडेशास्त्र, त्याचे विश्लेषण आणि त्याद्वारे सुयोग्य निष्कर्ष काढण्यासाठी उपयुक्त ठरणारा आहे. त्यामुळे विषयाचे ज्ञान परिपूर्ण असल्यास कृषी संशोधन, बँका, डेटा सव्‍‌र्हे एजन्सीज, लोकसंख्याविषयक अभ्यास, वित्तीय संस्था, नियोजन आयोग, नॅशनल काउन्सिल फॉर अप्लाइड इकॉनॉमिक रिसर्च, स्टॅटिस्टिकल रिसर्च, इन्शुरन्स, इंडियन इकॉनॉमिक अँड स्टॅटिस्टिकल सव्‍‌र्हिस आदी ठिकाणी चांगली संधी उपलब्ध होऊ  शकते. एम.एस्सीनंतरही याच संधी अधिक सुलभतेने मिळू शकतात.

तुमचे अभ्यासक्रम अथवा करिअरसंबंधीचे प्रश्न career.vruttant@expressindia.com  या पत्त्यावर पाठवा.)

Story img Loader