मी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामधून मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी या विषयात बी.एस्सी केले आहे. मला याच विषयात पुढे करिअर करण्याची इच्छा आहे. यासाठी मी पुढे काय करू? नोकरीसाठी मला कुठे प्रयत्न करावे लागतील?

मोहम्मद इफ्तेकर

तुम्ही केलेला मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी हा अभ्यासक्रम रोजगार आणि स्वंयरोजगार उपलब्ध करून देणारा एक उत्तम अभ्यासक्रम आहे. सध्या बहुतेक सर्व शहरांमध्ये पॅथॅलॉजी लॅबोरेटरीज उघडण्यात येत आहेत. बहुतेक प्रत्येक डॉक्टर विविध प्रकारच्या तपासण्यांसाठी रुग्णांना या प्रयोगशाळांमध्ये पाठवत असतात. त्यामुळे अशा प्रयोगशाळांमध्ये प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज कायमच भासत असते. तथापी तुम्ही कशा प्रकारे या विषयात ज्ञान आणि कौशल्य प्राप्त करता आणि त्याचा प्रत्यक्ष कसा उपयोग करू शकता यावर तुम्हाला संधी मिळणे अवलंबून असते. साहजिकच तुमचा करिअर ग्राफ त्यावरच अवलंबून असतो. पुरेसा अनुभव घेतल्यानंतर स्वत:ची प्रयोगशाळा किंवा परीक्षणसंस्था स्थापन करणेसुद्धा तुम्हाला शक्य आहे. त्यासाठी बँकांकडून अर्थसाहाय्य मिळू शकते.

मी २०१४ साली कॉम्प्युटर सायन्समधून इंजिनीअरिंग केले. पण काही कारणास्तव नोकरी केली नाही. आता मला नोकरीची गरज आहे, पण ती मिळत नाही. माझ्या मनात न्यूनगंड तयार होतो आहे. मी काय करावे?

नितीन काळे

आपल्याला नोकरी का मिळत नाही हे शोधायला हवे. याचे कारण तुझे सादरीकरण कौशल्य, संवाद कौशल्य आणि विषयाचे ज्ञान कमी पडत असले पाहिजे. आत्मपरीक्षण करून त्यात काही सुधारणा करता येते का बघ. तुझे महाविद्यालयीन शिक्षण आता संपले आहे. त्यामुळे तुला कॅम्पसमधून येणाऱ्या नोकऱ्या मिळू शकत नाहीत. नोकरी मिळवून देणारी विविध संकेतस्थळे आहेत. त्यावर आपली प्रोफाइल टाकून ठेव. ते अद्ययावत करत राहा. त्याचा कधी कधी उपयोग होतो.

सी डॅक- सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अ‍ॅडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग या संस्थेने सुरू केलेले काही अभ्यासक्रमही करता येतील. ते पुढीलप्रमाणे –

अ‍ॅडव्हान्स्ड डिप्लोमा इन मल्टिलिंग्वल मल्टिमीडिया, अ‍ॅडव्हान्स्ड डिप्लोमा इन मल्टिलिंग्वल कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन्स, अ‍ॅडव्हान्स्ड डिप्लोमा इन मल्टिलिंग्वल कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंग, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मल्टिलिंग्वल कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन्स, पोस्ट ग्रॅज्यूएट डिप्लोमा इन अ‍ॅडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग, पोस्ट ग्रॅज्यूएट डिप्लोमा इन मोबाइल कॉम्प्युटिंग, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन व्हीएलएसआय डिझायनिंग, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन आयटी इन्फ्रास्ट्रक्चर सिस्टिम्स अँड सिक्युरिटी, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन जिओइन्फर्मेटिक्स पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन एम्बेडेड सिस्टिम डिझाइन, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन सिस्टिम सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन इंटरनेट ऑफ थिंग्ज, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन बिग डाटा अ‍ॅनॅलिटिक्स, हे अभ्यासक्रम चांगल्या करिअर संधी मिळवून देण्यासाठी उपयुक्त ठरतील.

संपर्क – https://cdac.in/index.aspx?id=edu_pgpd_pgd_programmes

सार्वजनिक बँकांमध्ये संगणक पदवीधर असलेल्या विद्यार्थ्यांना स्पेशल ऑफिसर म्हणून नियुक्त केले जाते. ही नियुक्ती चाळणी परीक्षेद्वारे केली जाते. ही परीक्षाही तुला देता येईल. GATE- (ग्रॅज्युएट अ‍ॅप्टिटय़ूड टेस्ट फॉर इंजिनीअर्स) ही परीक्षा देऊन चांगल्या संस्थेतील एम.टेकसाठी प्रयत्न करू शकता. गेट परीक्षेत चांगले गुण मिळाले तर तुला सार्वजनिक कंपन्यांमध्येसुद्धा नोकरी मिळू शकते.

तुमचे अभ्यासक्रम अथवा करिअरसंबंधीचे प्रश्न career.vruttant@expressindia.com या पत्त्यावर पाठवा.

Story img Loader