मी बारावी झालो आहे. यापुढे बीएस्सी कॉम्प्युटर करू की बीसीए करू? कोणता अभ्यासक्रम उत्तम राहील?

वैभव उताने

बीसीए आणि बी.एस्सी कॉम्प्युटर हे दोन्ही अभ्यासक्रम चांगलेच आहेत. मात्र तुम्ही किती चांगल्या पद्धतीने या दोन्ही विषयांचा अभ्यास करता आणि संकल्पना समजून घेता यावरच पुढे करिअरमध्ये यश मिळवणे अवलंबून राहील. कारण या दोन्ही विषयांमध्ये तुम्हास प्रत्यक्ष काम करण्याची व उत्तम रिझल्ट देण्याची अपेक्षा असते. ती अपेक्षा पूर्ण करता आली नाही तर कोणताही अभ्यासक्रम केल्यास काहीच उपयोग होणार नाही.

मी बीएमएममध्ये पदवी घेतली आहे. जून २०१५ ते जून २०१६ या कालावधीत मार्केटिंग क्षेत्रात साहाय्यक व्यवस्थापक म्हणून काम केले आहे. मला दोन वर्षांचा अनुभव आहे. मी एमबीए-एमएमएस अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी एमएच-सीईटी २०१७ ही परीक्षा दिली. त्यात मला ९६.३८ टक्के पर्सेटाइल मिळाले. पण या गुणांवर मला सर्वोच्च चार संस्थांमध्ये प्रवेश मिळू शकला नाही. मी इतर संस्थांमध्ये प्रवेशासाठी प्रयत्न केला नाही. त्यामुळे आता काय करावे, या गोंधळात पडलो आहे. माझ्यासाठी काय योग्य राहील?

 – स्वप्निल शिंदे

मनाजोगत्या संस्थेत प्रवेश मिळाला नाही म्हणून निराश होऊ नकोस. तुझ्याकडे कार्यानुभव असल्याने तू एक वर्ष कालावधीच्या एक्झिक्युटिव्ह एमबीए या अभ्यासक्रमासाठी प्रयत्न करू शकतोस. सगळ्या दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण संस्थांतील एमबीएचे प्रवेश आता सुरू झालेले आहेत. काहींचे लवकरच सुरू होतील. त्याकडे लक्ष दे. असा अभ्यासक्रम तू तुझ्या आवडीच्या संस्थेमध्येसुद्धा करू शकतोस.

पुढच्या वर्षी माझे पदवीचे शिक्षण पूर्ण होईल. बीएसाठी मी राज्यशास्त्र, भूगोल, हिंदी हे विषय घेतलेले आहेत. मी केंद्रीय नागरी सेवा परीक्षेची तयारी करीत आहे. माझ्यासाठी इतर पर्याय काय असतील?

कृष्णा आष्टेकर

नागरी सेवा परीक्षा देऊन तुला केंद्र शासनाच्या उच्च श्रेणीच्या विविध पदांवर नियुक्त होण्याची संधी मिळणार आहे. मग त्या परीक्षांची तयारी मध्येच सोडून देण्याचे कारण काय? तू आत्तापर्यंत त्यासाठी घालवलेला बहुमूल्य वेळ आणि संसाधने वाया जातील. तुला ही तयारी खूपच कठीण वाटत असेल तर मग गोष्ट वेगळी आहे. चांगल्या प्रकारची नोकरी ही स्पर्धा परीक्षेद्वारे मिळू शकते. नागरी सेवा परीक्षा तुला द्यायची नसल्यास तू राज्य सेवा परीक्षा, बँक, रेल्वे, एलआयसी, इतर विमा कंपन्या, स्टॉफ सव्‍‌र्हिस सिलेक्शन या परीक्षा देऊ शकतोस. त्यायोगे तुला शासकीय सेवेत येता येईल. पदवीस्तरावरील एखाद्या विषयात पदव्युत्तर पदवी व त्यानंतर नेट / सेट देऊन व पीएचडी करून अध्यापनाच्या क्षेत्रात जाऊ शकतोस. भाषेवर उत्तम प्रभुत्व असेल आणि वाचन दांडगे असेल तर पत्रकारितेच्या क्षेत्रातही करिअर करू शकतोस. मात्र प्रत्येक ठिकाणी यशस्वी होण्यासाठी तुला मेहनत ही करावीच लागेल.

मी बारावी विज्ञान शाखेत शिकत आहे. मला पोलीस महानिरीक्षक व्हायचे आहे. त्यासाठी आत्तापासून तयारी करायला हवी का? कशा प्रकारे करू?

विक्रम शिंदे

पोलीस महानिरीक्षक होण्यासाठीचे टप्पे पुढीलप्रमाणे आहेत –

१)     पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे.

२)     पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर किंवा पदवी परीक्षेच्या अंतिम वर्षांला असताना संघ लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी नागरी सेवा परीक्षा देणे.

३)     या परीक्षेमधून भारतीय पोलीस सेवेसाठी निवड होण्यासाठी प्रयत्न करणे.

भारतीय पोलीस सेवेसाठी निवड झालेला उमेदवार जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून आपले करिअर सुरू करतो. त्यानंतर पोलीस उपायुक्त, पोलीस आयुक्त/ पोलीस महानिरीक्षक अशा पदोन्नती मिळतात.

तुमचे अभ्यासक्रम अथवा करिअरसंबंधीचे प्रश्न  career.vruttant@expressindia.com या पत्त्यावर पाठवा.

Story img Loader