मला कृषी अधिकारी व्हायचे आहे. त्याबद्दल माहिती देऊ शकाल का?
– यश ठाकरे.
यश, कृषी अधिकारी पदासाठी राज्य लोकसेवा आयोगामार्फत निवड केली जाते. त्यासाठी स्वतंत्र परीक्षा घेतली जाते. शैक्षणिक अर्हता – बी.एस्सी कृषी / फलोज्ञान वा कृषीविषयक इतर विषय. त्यामुळे यापैकी कोणत्याही एका विषयात पदवी प्राप्त करणे आवश्यक आहे.
मला बारावीमध्ये ६५ टक्के मिळाले आहेत. तसेच दहावीमध्येही मला ७० टक्के मिळाले आहेत. मला संरक्षण सेवेत जायचे आहे. कृपया अधिक माहिती द्यावी व संकेतस्थळाची माहिती द्यावी.
– साहील केदारे
साहील, तुझ्याकडे दोन पर्याय आहेत.
(१) नॅशनल डिफेन्स एक्झामिनेशन ही परीक्षा देऊन भूदल, वायूदल किंवा नौदलात सामील होऊ शकतोस. ही परीक्षा संघ लोकसेवा आयोगामार्फत दरवर्षी दोनदा घेण्यात येते. या परीक्षेद्वारे निवड झाल्यावर तुला वरिष्ठ पदावर नियुक्ती मिळू शकते. संकेतस्थळ – http://upsc.gov.in/ आणि www.nda.nic.in
(२) एअर मॅनची परीक्षा देऊन तू वायुदलात कनिष्ठस्तरीय स्तरावर प्रवेश घेऊ शकतोस.
संकेतस्थळ- https://airmenselection.gov.In
मी डिप्लोमा पूर्ण केला असून मला अॅनिमेशन करायचे आहे. पण कोणत्या विषयात करावे, हे माहीत नाही. डिप्लोमा करावा की डिग्री करावी हेसुद्धा माहीत नाही. चांगल्या शिक्षण संस्थेचे नाव व कमी शुल्काबद्दल माहिती सांगावी.
– अमर किंगे
अमर, अॅनिमेशनचे क्षेत्र हे सर्जनशील क्षेत्र आहे. याचा अर्थ तुम्हास नव्या गोष्टी सुचल्या पाहिजेत आणि त्या प्रत्यक्षात आणता आल्या पाहिजेत. त्यामुळे या क्षेत्रात तुम्ही डिग्री करता की डिप्लोमा घेता हे तितकेसे महत्त्वाचे ठरत नाही. अभ्यासक्रमामधून जे ज्ञान प्राप्त केले त्याचा अत्यंत प्रभावी, हटके किंवा आऊट ऑफ बॉक्स जाऊन कसा उपयोग करता हे महत्त्वाचे आहे. अन्यथा शेकडो मुले अॅनिमेशनचा अभ्यासक्रम दरवर्षी करूनही संधीसाठी चाचपडत राहतात. संधी मिळाली तर स्वत:चे वेगळेपण सिद्ध करणे जमत नसल्याने तिथल्या तिथेच राहतात वा त्यांना कामातून मुक्तही केले जाते. या सर्व बाबी लक्षात ठेऊनच अॅनिमेशनचा अभ्यासक्रम करणे उपयुक्त ठरेल. स्वत:च्या आवडीनुसार स्पेशलायझेशनचा विचार करावा. सर्वच प्रकारच्या अॅनिमेटरला संधी मिळू शकते. इन्स्टिटय़ूट फॉर डिझाइन ऑफ इलेक्ट्रिकल मेजरिंग इंस्ट्रमेंटेशन या केंद्र शासनाच्या अखत्यारितील संस्थेने कमी शुल्क असलेला अॅनिमेशनचा अभ्यासक्रम सुरू केला आहे. संपर्क – http://www.idemi.org/
तुमचे अभ्यासक्रम अथवा करिअरसंबंधीचे प्रश्न career.vruttant@expressindia.com या पत्त्यावर पाठवा.)