मी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून १२ वी झालो आहे. मला महाराष्ट्रातील पोलीस शिपाई भरती परीक्षा देता येईल का?
– आकाश काळे
यशवतंराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे जे अभ्यासक्रम मान्यताप्राप्त आहेत, ते सर्व शासकीय परीक्षांसाठी ग्राह्य़ धरले जातात. त्यामुळे या विद्यापीठातून बारावी झाली असली तरीही पोलीस शिपाई पदभरतीची परीक्षा विद्यार्थ्यांना देता येते. या विद्यापीठातून पदवी घेऊन राज्यसेवा परीक्षा देण्याची संधीही विद्यार्थ्यांना मिळते.
माझी मुलगी नुकतीच १२ वी उत्तीर्ण झाली आहे. तिला अभियांत्रिकी व वैद्यकीय शाखेमध्ये रस नाही. तिला संघ लोकसेवा आयोगाची परीक्षा द्यायची आहे. तिने कोणत्या क्षेत्रात पदवी घ्यावी?
– जयश्री सुगरे
संघ लोकसेवा आयोगाच्या म्हणजेच यूपीएससीच्या परीक्षेसाठी कोणत्याही एका विशिष्ट पदवीची गरज नाही. या परीक्षांमध्ये यश मिळवणारे विद्यार्थी अनेक प्रकारच्या शाखांमधून शिक्षण घेऊन आलेले दिसतात. अमुक एका विद्याशाखेतल्याच विद्यार्थ्यांना यश मिळते असे नव्हे. त्यामुळे आपल्या पाल्याची आवड लक्षात घेऊन कला, वाणिज्य किंवा विज्ञान यापैकी कोणत्याही शाखेत तुम्ही प्रवेश घेऊ शकता. कलाशाखेतील विषयांकडे बऱ्याच मुलांचा ओढा दिसून येतो. या विषयांचे साहित्यही मोठय़ा प्रमाणावर उपलब्ध आहे. या पर्यायाचाही विचार करता येईल. मराठी, इंग्रजी भाषेची तयारी पदवीपर्यंतच्या काळात उत्तमरीत्या करता येऊ शकते. इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, सामान्य अध्ययन याविषयांच्या अनुषंगाने प्राथमिक व मुख्य परीक्षेत बरेच प्रश्न विचारले जातात. या बाबी लक्षात ठेऊनच विषयांची निवड करता येईल. आत्तापासूनच त्यानुसार अभ्यास केल्यास उत्तम फळ मिळेल.
मी. एम. कॉम झालो आहे. मला बँकिंग क्षेत्रात करिअर करायचे आहे. मार्गदर्शन करावे.
– नितीन पाटील
बँकिंग क्षेत्रात तुम्हाला लिपिक, प्रोबेशनरी ऑफिसर आणि स्पेश्ॉलिस्ट ऑफिसर म्हणून करिअरला सुरुवात करता येईल. या संधी तुला रिझव्र्ह बँक, सार्वजनिक बँका आणि खासगी बँकांमधून मिळू शकतील.
(१) रिझव्र्ह बँकेच्या निवड मंडळामार्फत या पदांच्या नियुक्तीसाठी प्राथमिक परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखती घेतल्या जातात.
(२) बहुतांश सार्वजनिक बँकामधील पदांच्या निवडीसाठी आयबीपीएस (इंडियन बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन ) मार्फत तीन टप्यांमध्ये परीक्षा घेतली जाते.
(३) काही सार्वजनिक बँका त्यांच्या प्रोबेशनरी ऑफसर्सच्या नियुक्तीसाठी स्वतंत्ररीत्या परीक्षा घेतात. या परीक्षेत उत्तीर्ण उमेदवारांना एक वर्षांचा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन बँकिंग अँड फायनान्स हा अभ्यासक्रम करावा लागतो. हा अभ्यासक्रम पूर्ण झाला की त्यांची निवड प्रोबेशनरी ऑफिसर्स म्हणून केली जाते.
(४) काही खासगी बँका चाळणी परीक्षेद्वारे उमेदवारांची निवड करतात. याविषयी संबंधित बँकांच्या संकेतस्थळावर वेळोवेळी माहिती दिली जाते.
(५) स्टेट बँक ऑफ इंडिया स्वत:ची परीक्षा घेते.
(६) बहुतेक सर्व खासगी आणि काही सार्वजनिक क्षेत्रातील बँका एमबीए इन फायनान्स हा अभ्यासक्रम केलेल्या विद्यार्थ्यांची निवड कॅम्पस प्लेसमेंटद्वारे करतात.
पुणेस्थित ‘नॅशनल इंस्टिटय़ूट ऑफ बँकिंग’ या संस्थेचा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन बँकिंग अँड फायनान्शिअल सव्र्हिस हा दोन वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांना कॅम्पस प्लेसमेंटमध्ये खासगी आणि शासकीय बँकांमध्ये चांगल्या संधी मिळतात. ‘जमनालाल बजाज इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट’ या संस्थेतील एम.एस्सी इन फायनान्स हा अभ्यासक्रमसुद्धा अशी संधी मिळवून देऊ शकतो. तसेच ‘टाइम्सेप्रो’ या संस्थेमध्येही एमबीए इन बँकिंग अँड फायनान्शिअल सव्र्हिस आणि पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन बँकिंग अँड फायनान्शिअल सव्र्हिस हे अभ्यासक्रम केल्यावर खासगी बँकांमध्ये संधी मिळू शकते.
ग्रामीण बँकांतील विविध पदांच्या निवडीसाठी आयबीपीएसमार्फत चाळणी परीक्षा घेतली जाते. येत्या काळात आपल्या देशातील बँकिंग सेवांची व्याप्ती फार मोठय़ा प्रमाणावर वाढणार आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून या क्षेत्रात मोठी भरती केली जात आहे. आयबीपीएसमार्फत पुढील काही महिन्यांत जवळपास काही हजार पदे भरली जातील.
तुमचे अभ्यासक्रम अथवा करिअरसंबंधीचे प्रश्न career.vruttant@expressindia.com या पत्त्यावर पाठवा.)